एक अशी गोष्ट- जी आपल्याला अगदी नकोशी असते. कधी तिची भीती वाटते, राग येतो, तर कधी ती निरुपयोगीही भासते. आवडत तर कधीच नाही; पण अवलंब मात्र नियमित! मत, अभिप्राय, भूमिका, उपहास, प्रस्ताव, सूचना या मुखवटय़ांमागे लपलेली. राग, अनिश्चितता, अस्थिरता या भावनांना वाट खुली करून देणारी. प्रेरणेत अडथळे आणू पाहणारी. आत्मविश्वासाला छेद देऊ शकणारी. प्रत्येकाच्या मनात असणारी. काहींच्या ओठांपर्यंत येऊन थांबणारी. तर काहींच्या मुखातून लीलया बाहेर पडणारी. काहींच्या सवयीचा भाग असणारी, तर काहींना ‘ती आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हक्कसुद्धा’ हे मानण्याची मुभा देणारी. कधी तथ्य असणारी, तर कधी कसलाच आधार नसणारी. कधी बोचरी, तर कधी कोपरखळी मारणारी. विसरायचे म्हटले तरी सहजी विसरता न येणारी. कधी नुसतं खरचटणं, तर कधी मोठे घाव घालणारी.. टीका!
आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं यावर नमनचा ठाम विश्वास होता. त्यामुळे इतरांवर, त्यांच्या कृतींवर भाष्य करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, हे त्याचे त्यानेच स्वत:ला पटवून दिले होते. त्यामुळे त्याच्या तावडीत सापडलेल्या कोणत्याही ‘बिचाऱ्या’ व्यक्तीला त्याच्या टीकास्त्रांचे घाव सहन करावे लागत. मग तो एखादा चित्रपट असो, नाटक असो, एखादा नृत्याविष्कार असो वा गाणे, भाषण असो वा लिखाण, एखादी नवी कल्पना/संकल्पना असो वा जुन्यातच नवे काही शोधण्याचा किंवा जुने नव्याने साकारण्याचा प्रयत्न असो; नमन प्रत्येक गोष्टीवर टीकेचे आसूड ओढल्याशिवाय राहत नसे. लोकांना त्याचा हा स्वभाव आवडत नसे. लोक सुरुवातीच्या काळात त्याचा अभिप्राय विचारीत असत. परंतु त्याने नेहमी टीकास्त्र सोडणे सुरू केल्यावर ते त्याला टाळू लागले. आता तर त्याला कोणीच काही विचारत नाहीत. सांगत नाहीत. कारण त्याच्या टीकेत प्रसंगी तथ्य जरी असलं, तरी ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ या म्हणीसारखी काहीशी ऐकणाऱ्याची गत होते. त्यामुळे सतत अट्टहासाने ‘क्रिटिक’ची भूमिका बजावणाऱ्या नमनला हल्ली कुणीही विचारत नाही.
आपल्यालाही आयुष्यात असे नमुने (नमन!) बरेच भेटतात. कधी कधी आपणही ती भूमिका बजावतो. टीका ही नकारात्मकतेशीच जोडली गेलेली आहे का? टीका म्हणजे नक्की काय? लोक टीका का करतात? ती पचवणे कठीण का असते? यातून मार्ग काय? या प्रश्नांची उत्तरे शोधली तर कदाचित या काटय़ांवरच्या रस्त्यावर आपण फुले वेचू शकू.
कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्याचा, मोकळेपणी, दबाव-दडपणरहित मत व अभिप्राय व्यक्त करण्याचा अधिकार आपले संविधान आपल्याला देते. या अधिकाराचा आपण आवर्जून उपभोग घेतो. भाष्य करणे व टीका करणे या परस्परसंबंधित संकल्पना असल्या तरी त्यांत मूलभूत फरक आहे. टीका म्हणजे गुणदोषविवेचन. कधी हेतुपुरस्सर, तर कधी अनवधानाने दोषांवर अधिक प्रमाणावर केलेले जहाल भाष्य. टीकेला दोन टोकं असतात. एक नकारात्मकतेचं व दुसरं सकारात्मकतेचं. एक विध्वंसक, तर दुसरं विधायक. परंतु आपणा सर्वाना माहीत असलेलं/ अवगत असलेलं विध्वंसक व हानीकारक टोक आधी जाणून घेऊ. टीका करण्यामागे ती करणाऱ्याची काही विशिष्ट कारणं असतात.
समोरच्या व्यक्तीची आवड-निवड, जीवनशैली, विचारसरणी आपल्याशी जुळत नसल्यास टीका केली जाते. मतभिन्नता असल्यास टीका केली जाते आणि आपले मतच योग्य व ग्रा धरले जावे, ही आग्रही भूमिका मांडली जाते. एखाद्यास केवळ विरोध करायचा, कमी लेखायचे, खच्चीकरण करायचे म्हणूनही टीका केली जाते. एखाद्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी, त्याच्या प्रेरणेत अडथळे आणण्यासाठी, प्रगतीत बाधा आणण्यासाठी टीका केली जाते. एखाद्या व्यक्तीसंदर्भात मनात अढी असल्यास तिची कोणतीही कृती व विचार टीकेस पात्र ठरवला जातो. (कोणते निष्पक्ष मूल्यमापन न करता!) आपण एखाद्या व्यक्तीइतके यश मिळवू शकत नाही हे उमगल्यावर केवळ ईष्र्येतून आणि स्वत:च्या न्यूनगंडातूनही टीकास्त्र सोडले जाते. अशी टीका स्वत:ला सिद्ध करू न शकल्याच्या मानसिकतेतून जन्म घेते. त्यामुळे अशी टीका टीकाकाराला प्रगतिपथावर नेण्याऐवजी वैफल्याच्या गर्तेत ढकलते. अशा टीकाकारांना इतरांचे मनमोकळे कौतुक करण्याचे वावडेच असते. त्यातूनच काहीही समोर आले तरीही त्यात प्रथम काय चुकीचं, अयोग्य, अपुरं आहे हे सांगण्यास ते टपलेले असतात. काहींचा तर हा स्वभावच बनतो. नकारात्मक अभिप्राय दिला (म्हणजे टीका केली) की त्यांना आपण अतिशय बुद्धिमान समीक्षक आहोत असा भास होत राहतो. हा भास सत्य मानून मग ते आपला टीकानाद सुरूच ठेवतात. ‘टीकेतून माणूस घडतो, कौतुकाने तो शेफारतो’ या प्रचलित समजामुळे त्यांचे बोलणे कठोर शब्द व देहबोलीने ओतप्रोत भरलेले असते. दुसऱ्याच्या चुका, त्रुटी स्पष्टपणे मांडणे हा त्यांनी आपल्या हुशारीला लावलेला मापदंड.. ही त्यांची सन्मान मिळवण्याची रीत व धडपड असते. काय ‘आहे’ यापेक्षा काय ‘नाही’ यावरच ते चर्चा करतात.
हे वाचून ‘टीका करूच नये का?’ असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. टीकेपेक्षाही ती समोरच्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली जाते, यात सगळी गोम आहे. हेच ते दुसरे टोक.. विधायक, साहाय्यक भाष्याचे. याचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींचा हेतू निखळ असतो. प्रतिक्रिया प्रामाणिक असते. समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेनुसार शब्द अणि देहबोलीची निवड केलेली असते. आपल्या कलाकृती आदीबद्दल जे आणि जसे आपल्याला ऐकायला आवडणार नाही, ते या व्यक्ती दुसऱ्यालाही बोलत/ऐकवत नाहीत. ऐकणारी व्यक्ती भावनिकरीत्या आपल्यापासून तुटण्यापेक्षा विचार करण्यास प्रवृत्त होईल अशी शब्दमांडणी ते करतात. तिच्या प्रयत्नांबद्दल योग्य तो आदर राखून आपले मत मांडतात. समोरच्याने प्रगती करावी, हा आपला सद्हेतू ते योग्य शब्दांत आणि देहबोलीतून समोरच्यापर्यंत पोहोचवतात.
तारेवरची कसरत या टोकावर टिकून राहण्याची आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊ आणि ठेवू. प्रथम म्हणजे आपण टीका करणे अपेक्षित आहे का? सद्य:स्थितीची ती गरज आहे का? आपण जे क्षेत्र/ कलाकृती/ संपादकीयाबद्दल टीका करू इच्छितो, त्यातलं आपल्याला ज्ञान आणि अनुभव कितपत आहे? टीका करण्याने सद्य:स्थितीत व भविष्यकाळात सकारात्मक बदल घडणार आहेत का? टीका करण्यामागे आपला हेतू निखळ आहे का, की आपले वैयक्तिक स्वार्थ त्यात दडले आहेत? टीका करणे हा आपला नित्यनेम तर बनला नाहीए ना? आपण सर्व गोष्टींतले सौंदर्य, वैविध्य न्याहाळायचे/अनुभवायचे सोडून त्यातील त्रुटींचीच उजळणी करत बसलो आहोत का? म्हणजे कमावण्यापेक्षा गमावणेच अधिक होत आहे का? शब्द निवडताना दक्षता बाळगणे- म्हणजे ‘पण’पेक्षा ‘आणि’ या शब्दाचा वापर उपयुक्त ठरेल का? उदा. ‘हे चित्र मला बरे वाटले, पण रंगसंगतीत काही मजा नाही..’ यापेक्षा ‘हे चित्र मला आवडले, त्यामागे खूप मेहनत आहे आणि रंगसंगतीत हिरव्या रंगाचा अधिक वापर केला गेला असता तर चित्रातील अप्रतिम संकल्पना आणखीन खुलून आली असती असं माझं वैयक्तिक मत आहे. हे चित्र रेखाटताना तू अनुभवलेला आनंद, त्याचा स्वाद तुलाच माहीत.. नाही का?’
सकारात्मक विधाने तसंच ‘आणि’ या शब्दाचा वापर याने ऐकणारा तिटकाऱ्याने/ नैराश्याने अभिप्राय ऐकण्याऐवजी सखोल विचाराच्या दिशेने पुढे सरकतो असा अनुभव आहे. सद्हेतूने, प्रामाणिक आस्थेने व नेमकेपणाने केलेले आदरयुक्त भाष्य महत्त्वाचे.
टीका झेलणाऱ्यांनीही काही खूणगाठी मनाशी बांधल्यास आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि पुढील वाटचाल करता येईल. कोणतीही गोष्ट ‘परफेक्ट’ नसते आणि त्यामुळे एखादी गोष्ट (कलाकृती इ.) जी ‘अ’ व्यक्तीला योग्य वाटते/ आवडते- ती व तितकीच ‘ब’ला रुचेल असे नाही. टीकाकाराचा हेतू लक्षात घ्यावा. शब्दांच्या धारेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यात तात्त्विकरीत्या काही अर्थ आहे का, किंवा त्यात आपल्या उपयोगाचे काही आहे का, हे पाहावे.. वेचावे. म्हणजेच ‘कसे’ म्हटले जात आहे यापेक्षा ‘काय’ म्हटले जात आहे, याकडे लक्ष द्यावे. मुद्दा पटल्यास खुल्या दिलाने, कोणताही कमीपणा न बाळगता त्याचा स्वीकार करावा. टीका करणाऱ्याकडे टीकेच्याच नजरेतून पाहणे टाळावे व स्वत:लाही अशी भूमिका बजावण्यापासून रोखावे. इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की, सामान्यजनांची टीका सहन करत, ती न जुमानता कैक थोर समाजसुधारकांनी आपली संकल्पना, आपला दृष्टिकोन जिद्दीने राबवला. त्याची फळे आज आपण उपभोगतो आहोत. अवसान न गाळता, निर्धार पक्का ठेवून, प्रामाणिक कार्य आणि प्रयत्न करत राहावे. कारण टीका करणे अतिशय सोपे आणि कोणालाही जमणारे आहे. काहीजण त्याकडे व्यावसायिक भूमिका म्हणूनही पाहतात. तो अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण या सहजप्राप्त बाजूस राहून धन्यता मानणार आहोत की आव्हाने स्वीकारून काही नवे निर्माण करण्याचा ध्यास धरणार आहोत, हे आपले आपल्यालाच ठरवायचे आहे.
डॉ. केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)