15 August 2020

News Flash

आता बस्स!

दिवसामागे दिवस असेच सरत गेले.

रियाने स्वत:च्या हिमतीवर निवडलेली ही नोकरी.. तिचा तिला खूप अभिमान होता. आनंदही वाटत होता. रोज घरातून सकाळी आठ वाजता निघणे, सव्वाआठची ट्रेन पकडणे, ऑफिसला पोहोचणे. तिथे पाच वाजेपर्यंत नेटाने काम करणे. पुन्हा ट्रेन पकडून सात वाजेपर्यंत घरी येणे.. स्वत:चे आवरून स्वयंपाक करून जेवणे. थोडा वेळ टीव्ही पाहणे आणि मग पुस्तक वाचत वाचत झोपणे; ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठणे.. पुन्हा दुसऱ्या दिवशीही तीच दिनचर्या. सुरुवातीला यात रिया खूश होती आणि तिचे पालकही. दिवसामागे दिवस असेच सरत गेले. दिनचर्येत काहीही बदल नाही. पण कालांतराने या दिनचर्येविषयी वाटणारा अभिमान  नाहीसा होत गेला आणि आनंदही लोप पावला. उरली ती फक्त रूक्ष दिनचर्या! रिया आता पूर्वीसारख्या उत्साहाने नाही तर सक्तीने ध्येय गाठते. नोकरीतील दैनंदिन कामांकडे आव्हान म्हणून पाहणारी, आपली कामे तडीस नेणारी रिया आता एखाद्या यंत्रासारखी वावरते. ती या दिनचर्येला कंटाळली आहे.. पार थकून गेली आहे..

गौरवने डॉक्टर होण्याचे स्वप्न शाळेत असल्यापासून पाहिले. स्वकष्टाने, हुशारीने ते स्वप्न साकारही केले. स्वत:चे क्लिनिक उघडले.. मग स्वत:चे मोठे हॉस्पिटलही. एक निष्णात, यशस्वी डॉक्टर म्हणून स्वत:ची ख्यातीही त्याने प्रस्थापित केली. सेवेचा वसा घेऊन त्यात स्वत:ला  झोकून दिले. कुटुंब बहरले, पण गौरव आता एक अतिव्यस्त डॉक्टर झाला होता. कुटुंबापेक्षा रुग्णांनाच जास्त वेळ द्यावा लागे. यात तो थकून जायचा, पण घेतलेला वसा आठवायचा आणि गाडे पुढे रेटत राहायचा. त्याच्या अनुपस्थितीमुळे घरात तणाव निर्माण होऊ लागले. सगळीकडून ओढाताण. त्याला अडकल्यासारखे वाटू लागले, अगदी पार थकून गेल्यासारखे..

मालतीचे जग म्हणजे तिचे कुटुंब- नवरा, मुले, सासू-सासरे. तिची दिनचर्या ठरलेली. खरे तर इतरांच्या दिनचर्येप्रमाणे स्वाभाविकरीत्या आखली गेलेली. घरातील कामे, स्वयंपाक, बाजारहाट, सणासुदीला ठरलेले उपचार, मुलांच्या शाळा,  पाहुणेमंडळी यांच्याभोवती फिरणारे तिचे विश्व. ‘गृहिणी’ असणे याचा तिला आनंद आहे. ती कुटुंबवत्सल आहे. तिचे नियोजन, कौशल्य आणि धोरण उत्तम असल्याने संसार अगदी उत्तम चाललाय. बरीच वर्षे हा दिनक्रम सुरू आहे. इतरांच्या गरजांना (स्वत:च्या इच्छा मागे सारून) दिलेले प्राधान्य आणि गृहीत धरले जाण्याची झालेली सवय, स्वत:साठी वेळच काढू न शकण्याचे दु:ख याने मालती कंटाळली आहे. यात रुतल्याची भावना तिला भेडसावत आहे. काही तरी बदल व्हावा, थोडा विसावा मिळावा ही तीव्र इच्छा बाळगून आहे. ती हताश, हतबल झाली आहे.

रिया, गौरव आणि मालती हे मानसशास्त्रीय दृष्टय़ा ‘बर्न आऊट’ (Burn out) च्या उंबरठय़ावर उभे आहेत. बर्न आऊट या संकल्पनेचा तात्त्विक अर्थ असा की, एखाद्या प्रक्रियेत वा घटनेत होरपळून निघाल्यावर- आत्मिक बळ, भावनिक शक्ती, वैचारिक  क्षमता आणि त्यामुळे कृतीवरही होणारा विपरीत परिणाम! ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. अति ताणाची आणि प्रलंबित ताणाचीही. ही स्थिती आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त करू शकते. संपुष्टात आणू शकते. आपल्याला एक प्रकारची विचित्र तटस्थता, नैराश्य, चीडचीड, अकार्यक्षम असल्याची भावना देऊ पाहणारी ही स्थिती. बर्न आऊटच्या कचाटय़ात सापडताच आपले खासगी आयुष्य आणि व्यावसायिक जीवन दोन्हींमध्ये संघर्ष होण्याचा संभव असतो. ताण आणि दमणूक यांचा उच्चांक  गाठला जातो. मानसशास्त्रज्ञ डेव्हिड बॅलार्ड यांच्या मते, कामातील बर्न आऊट म्हणजे एक प्रदीर्घ काळ टिकलेली स्थिती, ज्यात व्यक्तीला आपले सर्वस्व (विचार – भावना – संवेदना आदींचा संचय) संपुष्टात आल्याची भावना निर्माण होते, जीवन नीरस वाटते आणि त्यामुळे कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. या बर्न आऊटचा वणवा आपल्या जीवनवर्तुळातील विविध घटकांमध्ये पसरू शकतो. नातेसंबंधात, नोकरी-व्यवसायात,  शारीरिक-मानसिक स्वास्थ्यात बर्न आऊटचे परिणाम दिसून येतात. ऊर्जा, उत्साह, उत्तेजन आणि आत्मविश्वास या महत्त्वाच्या घटकांना बर्न आऊटमुळे छेद बसतो. आपण एखाद्या सकाळी उठावे आणि या अतिताणाच्या स्थितीने आपल्याला अचानक गाठावे, हे घडणे दुर्मीळ. पण छोटय़ा-छोटय़ा क्षणांतून, घटनांतून, परिस्थितींतून सरपटत येत मग आपला फणा काढणारी ही स्थिती आहे. ती अकस्मात न येता, दबक्या पावलांनी येत असल्याने तिचा शिरकाव अचूक ओळखणे अवघड होऊन बसते.

परिस्थितीच्या आपल्याकडून असलेल्या मागण्या, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण अपुरे पडत असल्याची जाणीव होताच ‘ताण’ निर्माण होतो. हा ताण दीर्घकाळ मनावर राहिल्यास आपले या बाबींवर व स्वत:वर काही नियंत्रण नाही, अशा स्वरूपाची हतबल-दुर्बलतेची भावना निर्माण होते. म्हणजे ताण आणि बर्न आऊट ही एका दोरीची दोन टोके म्हणूयात. त्यात फक्त तीव्रतेचाच काय तो फरक!  पेलता येते त्याहून अधिक कामाची जबाबदारी अंगावर येऊन पडणे, कष्टांचे कौतुक न होणे, आपल्याला गृहीत धरल्याची भावना असणे, मोबदला अयोग्य किंवा अपुरा मिळाल्यासारखे वाटणे, कामातील तोचतोचपणा, कामाची- सहभागाची नोंद न घेतली जाणे, इतरांकडून भेदभावाची वागणूक सहन करायला लागणे, आपल्या कामाबद्दल, कर्तृत्वाबद्दल कोणत्याच प्रकारचा अभिप्राय न मिळणे, ही बर्न आऊटची काही कारणे आहेत. थोडक्यात, दरवाजा ठोठावत बसणे आणि कोणीही तो न उघडणे, अन् तरीही तो ठोठावत राहण्याची सक्ती.. म्हणजे काहीशी बर्न आऊटची स्थिती. आपण या मानसिक अवस्थेतून जात आहोत का, ते पडताळून पाहावे. त्याची मुख्य खूण म्हणजे, आपली संपूर्ण ऊर्जा संपुष्टात आल्याची भावना, सतत दमल्याचा अनुभव. ही दमणूक- भावनिक, बौद्धिक किंवा शारीरिक असू शकते. आत्मिक उत्तेजनाचा अभाव इतका असतो, की दिवसभरातील कार्यभागसुद्धा सांभाळणे कठीण वाटते. कसेबसे स्वत:ला पुढे ढकलणे, कोणत्याही क्षणी कोलमडून पडण्याची वाटणारी शक्यता, हीसुद्धा बर्न आऊटची  एक सूचक खूण आहे. आपण जे करत आहोत त्याच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह म्हणजे बर्न आऊटच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल समजावे. एकाग्रता भंग होणे, प्रत्येक गोष्टीतील  नकारात्मक बाबींवर जास्त लक्ष केंद्रित होणे हीसुद्धा बर्न आऊटची  लक्षणे असू शकतात. नातेसंबंधांमध्ये तणाव, भांडण, वाद यांचे वाढते प्रमाण व एकदम कोषात जाऊन किमान व्यवहारही थांबवणे, हेही एक भीतीदायक लक्षण मानले जाते. अशा मन:स्थितीमुळे व्यसनाधीनता, अस्थिरता, निष्क्रियता हेसुद्धा घातकच. स्वत:च्या व इतरांच्या बाबतीत निष्काळजीपणा म्हणजेसुद्धा धोक्याची सूचना ठरू शकते. कोणत्याही गोष्टीत समाधानी नसणे किंवा त्याचे प्रमाण कमी होणे, हे लक्षणही आढळते.

काम आणि नातलग या दोन्ही विश्वातील बर्न आऊटपासून कसे लांब राहावे, हे पाहू या.

आधी म्हटल्याप्रमाणे, आपण त्या वाटेवर प्रवास सुरू केला आहे का, याचा आपल्या भावना, हालचालींवरून आढावा घ्यावा. प्रत्येकच दिवस ‘Bad, dull day’ म्हणून अनुभवत आहोत का? कायम  थकल्याची भावना सतावत आहे का? दिवसभरातील अधिक काळ आपण ज्या गोष्टी करत आहोत, त्या ऊर्जा नमवणाऱ्या किंवा दडपणाऱ्या आहेत का? आपण काहीही आणि कितीही केले तरीही त्याने फारसा काही फरक पडत नाही. किंवा कोणी कौतुक सोडाच साधी दखलही घेत नाही, या भावनेने मन ग्रासून टाकते का? अशा स्वरूपाच्या प्रश्नांच्या उत्तरांतून आपण बर्न आऊटच्या कितपत जवळ येऊन पोहोचलो आहोत हे कळेल. या सर्वाचा आपल्या झोपेवर, खण्या-पिण्याच्या सवयींवर काही परिणाम झाला आहे का, ते पाहावे. आपल्या स्वभावातील काही गोष्टी आपल्या या स्थितीला कारणीभूत ठरत नाहीत ना, हेही पाहावे. उदा. ‘Perfectionist’ असण्या किंवा होण्याच्या प्रक्रियेत, कधीच काहीच परिपूर्ण वा ठीक झाल्यासारखे न वाटणे, स्वत:बद्दल नकारात्मक दृष्टी बाळगणे, सतत सत्ता आपल्या हातात असावी म्हणून स्वत:वर झेपतील त्यापेक्षा अधिक जबाबदाऱ्या घेणे आणि इतरांना नियंत्रणात ठेवणे, जबाबदाऱ्यांचे वाटप न करणे व हे सर्व करण्याने आपली प्रतिमा उजळेल  हा भ्रम बाळगणे, इ.

उत्तम जनसंपर्क हा या मन:स्थितीशी लढा देण्यास खूपच उपयुक्त ठरू शकतो. परंतु संगत निवडताना विचारपूर्वक पाऊल टाकावे. प्रगल्भ श्रोत्यासारखं ऐकून घेणाऱ्या, समजून घेणाऱ्या लोकांमध्ये वावरणे अशावेळी लाभदायक ठरू शकते. अतिताणामुळे आपण इतर व्यक्तींशी बोलणे टाळतो, कारण आपले मन निराश असते. ते आपणास मागे खेचत राहते. परंतु वस्तुनिष्ठ दृष्टीकोन असणाऱ्या आणि भावनांचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींची संगत कायम धरावी. वेळप्रसंगी स्वत:ला सक्तीने यासाठी झोकून द्यावे लागू शकते. परंतु सजगतेने कोषात जाणे टाळावे. वेळोवेळी कामातून ‘ब्रेक’ घ्यावा. त्या वेळेत आपल्या ‘स्वत्वा’ला उत्तेजन मिळेल अशा गोष्टी आखाव्यात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची आणि घरात कुटुंबीयांची व मित्रपरिवाराची घट्ट वीण बांधावी. ही ‘सपोर्ट सीस्टीम’ आपला अमूल्य आधार ठरू शकते, किंबहुना ठरतेच! आपल्या कामाचा, त्यातील आपल्या भूमिकेचा, ध्येयांचा आढावा घ्यावा. कोठे आपण गरजेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करत आहोत- ज्या कारणाने दमछाक होते आहे, हे वेळीच ओळखा. कोणत्या अधिक महत्त्वाच्या कामात ऊर्जा गुंतवण्याची गरज आहे, तेथे मोर्चा वळवा. नात्यांमध्येही आपण बजावत असलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा आलेख मांडा. नात्याचे स्वरूप केवळ आपण केंद्रस्थानी राहत आहोत किंवा एकाच बाजूने भावनिक गुंतवणूक करत आहोत का, आपल्याला गृहीत धरलं जाण्याची भावना सतावत आहे का, समोरच्या व्यक्तीचा या बाबतीत योग्य प्रतिसाद आहे का, हे समजून घ्यावे.  अशावेळी आहे तीच परिस्थिती पुढे रेटण्यापेक्षा सुसंवाद साधावा, नम्रपणे  स्पष्टवक्तेपणा अवलंबावा. तरीही ध्येय न गाठता आल्यास  इतरांची (उदा. मानसशास्त्रज्ञ, प्रगल्भ कुटुंबीय, सहकारी) मदत जरूर घ्यावी. कामात आणि नात्यात  आपल्या सहभागाच्या योग्य रेषा आखाव्यात. कधी तरी रेषेपलीकडे जाऊन इतरांसाठी वागावे, त्यागावे हे जरी काही अंशी खरे असले, तरीही ही आपली कार्यपद्धती बनू नये याची दक्षता बाळगावी. बऱ्याचदा मर्यादा आखली की वागण्यात सुबकता येण्यास मदत होते, असा अनुभव आहे. म्हणजेच कुठपर्यंत पोहोचायचे आहे हे साधारणत: निश्चित असले, त्याप्रमाणे प्रवासाची आखणी करता येते. छंदांना, व्यक्तिमत्त्वातील कलात्मक गुणांना आपल्या दिनक्रमात स्थान द्यावे. आपला आहार-निद्राचक्र शक्य तितके नियमित आणि सुयोग्य स्वरूपाचे राखावे.

शारीरिक व मानसिक व्यायामावर आग्रही राहावे. मानसिक व्यायाम म्हणजे वेळोवेळी आपल्या भावनांचा, त्यात होणाऱ्या बदलांचा, आपल्या नियंत्रणात असणाऱ्या-नसणाऱ्या बाबींचा, विचार-आचारांचा सजगपणे, धीराने नियमितपणे आढावा घ्यावा. तसेच अहंकार बाजूला सारून गरजेप्रमाणे बदल करावेत. बर्न आऊट आपल्याला  नैराश्याच्या, निष्क्रियतेच्या, नकारात्मकतेच्या दिशेने फरफटत नेत असल्याचे जाणवल्यास मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्यास विलंब करू नये.

पुढे चालत जाण्यात, ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यात एक वेगळी ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्याला तालात आणि लयीत पावले टाकण्यास मदत करते. परंतु या तालात, लयीत जराजरी गडबड झाली की हाती उरते फक्त फरफट. ही स्थिती धोक्याची घंटा म्हणून ओळखावी. अशावेळी वेळ न दवडता योग्य ते उपचार करून आपली चाल पुन्हा डौलदार करण्यासाठी पावले टाकावी.

ketki.gadre@yahoo.com

डॉ. केतकी गद्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2016 1:06 am

Web Title: enough now
Next Stories
1 भावनाओं को समझो!
2 ‘निर्णया’चा महामेरू
3 ‘जीवन’शाळा
Just Now!
X