ऐकणे व ऐकवणे या दोन्ही क्रिया संवादशास्त्राच्या मूलभूत प्रक्रियांपैकी आहेत. या दोन्ही क्रियांचे तात्त्विक स्वरूप व त्यांची शास्त्रीय बांधणी त्यांच्या दैनंदिन संदर्भामुळे आणि उपयुक्ततेमुळे अभ्यासण्याजोगी आहे. या दोन्ही क्रियांना सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक छटाही आढळतात. संगीत ऐकणे- ऐकवणे, थोरामोठय़ांचे ऐकणे, भांडणात समोरच्या व्यक्तीच्या चुका ऐकवणे, कधी इतरांसाठी केलेले वा त्यांच्यासाठी झटलेले ऐकवून दाखवणे, दुसऱ्याचे मनोगत ऐकणे, तर कधी आपलेही ऐकवणे अशा प्रत्येक वर्तनाशी ‘ऐकणे-ऐकवणे’ या प्रक्रियेचे स्वरूप व त्याचे परिणाम भिन्न प्रकारे जोडले गेलेले दिसतात. या दोन प्रक्रियांमधील ‘ऐकणे’ या प्रक्रियेचा अवलंब ‘ऐकवणे’ या प्रक्रियेपेक्षा कमी प्रमाणात होतो असे दिसते. खरं तर या दोन्ही प्रक्रियांचा शास्त्रीय सिद्धान्ताच्या आधारावर केलेला समतोल वापर उपयुक्त ठरेल.
आपल्याला काय ऐकायला आवडत नाही, याचा विचार केला तर आपल्याला काही विशिष्ट गोष्टी आढळतील. समोरच्या व्यक्तीच्या ‘ऐकवण्या’मध्ये (वागण्या-बोलण्यात या गोष्टी आढळल्यास आपण ‘ऐकणे’ टाळतो. ध्वनि-नादशास्त्राचे अभ्यासक ज्युलियन ट्रेजर यांनी अशा काही कारणांचा अभ्यास केला. त्यांच्या मते, ‘ऐकणे’ ही कला लोप पावत असल्याची काही कारणे (त्यातून आपल्याला लावता येणारा अर्थ) म्हणजे आपल्या आजूबाजूची वाढती कलकल, ऑडिओ व व्हिडीओच्या मार्फत आवाज रेकॉर्ड करता येणारी सामुग्री (ज्याने तत्क्षणी येणारा ‘ऐकण्या’चा अनुभव नंतरवर ढकलणे), आपला उतावळेपणा- ज्यामुळे आपल्याला इतरांचे दीर्घस्वरूप बोलणे ‘ऐकण्या’पेक्षा थोडेथोडके व झटपट (निर्माण होणाऱ्या नादसंवादाचे अल्प तुकडे) म्हणणे ऐकण्याकडे वाढता कल, इत्यादी.
याबरोबरीने त्यांनी ‘ऐकणे-ऐकवण्याची सात पापं’ याअंतर्गत सुचवलेली सूचीही मजेदार आहे. त्यांच्या मते, ही सात पापं म्हणजे अशा सात सवयींचे लोक आहेत- ज्यांच्यापासून इतर लोक दूर पळतात.. ऐकणे टाळतात.
प्रथम- चहाडय़ा करणाऱ्या व्यक्ती; इतरांना त्यांच्या अपरोक्ष नावे ठेवणाऱ्या व्यक्ती! यांचे सततचे अशा प्रकारचे बोलणे-वागणे आपल्याला त्यांचे म्हणणे ऐकण्यापासून दूर नेते. आपल्या मनात सहजच हा विचार येतो की, यांच्या नावे ठेवण्याच्या उपक्रमात उद्या आपलाही समावेश असेल. या कारणाने काही काळानंतर आपण त्यांना टाळतो.
दुसरा प्रकार- आपल्या प्रत्येक वागण्या- बोलण्याकडे परीक्षकासारख्या पाहणाऱ्या व्यक्ती. यांच्या सान्निध्यात आपल्याला अस्वस्थ वाटते व आपल्या ‘ऐकण्या’च्या प्रक्रि येवर परिणाम होतो.
तिसरा प्रकार म्हणजे नकारात्मक मानसिकता. प्रत्येक गोष्टीत नकारार्थी पैलू शोधून किंवा निर्माण करून संवाद साधणाऱ्या व्यक्तींबरोबर ‘ऐकणे’ ही प्रक्रिया राबविणे आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जड जाऊ शकते.
चौथा प्रकार हा सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तींचा. या व्यक्तींना तक्रार करण्याकरता राजकारण ते पर्यावरण- कोणतेही कारण पुरते. अशा व्यक्तींच्या नकारात्मक बोलण्यामुळे ‘ऐकणे’ कठीण बनते.
पाचवा प्रकार म्हणजे इतरांवर खापर फोडणाऱ्या व्यक्ती. आपल्या स्वत:कडे कोणत्याच प्रकारची जबाबदारी न घेता प्रत्येक परिस्थिती व परिणामांसाठी इतरांना दोष देत बसणे हा त्यांचा स्थायीभाव. अशांचे ‘ऐकणे’ ही मोठीच कठीण कामगिरी!
एखादी गोष्ट सामान्य व छोटी करून सांगणे- हा सहावा प्रकार. याने खोटे बोलण्याकडे कल वाढतो व आपल्याला खोटे बोलणाऱ्या व्यक्तींचे ‘ऐकणे’ नकोसे वाटते.
सातवा प्रकार म्हणजे घडलेला प्रसंग वस्तुस्थितीच्या आधारे न सांगता आपली मते व अभिप्राय यांनाच जास्त महत्त्व देऊन कथन करणे. आपण अशा व्यक्तींचे ‘ऐकणे’ टाळतो. आवाजाची पट्टी व शब्दांची निवड याकडे दुर्लक्ष करून आपले बोलणे व वागणे इतरांवर लादणाऱ्या व्यक्तींचे ऐकून घेणेही कठीणच.
या सात प्रकारच्या व्यक्तींच्या अवतीभवती सतत राहिल्यास आपल्या ‘ऐकण्या’च्या कलेला प्रोत्साहन मिळणे अवघडच. बऱ्याचदा आपण स्वत:सुद्धा या सप्तरंगांत आपल्या छटा मिसळत असू यात दुमत नसावे. आपणही इतरांबद्दल वावगे बोलून, नकारात्मक धोरण ठेवून, सतत तक्रारी करून, परीक्षकाची भूमिका बजावून, इतरांना दोष देऊन, खोटे बोलून आणि घडलेल्या गोष्टी डावलून, आपलेच मत पुढे रेटून इतरांना आपले म्हणणे ऐकण्यापासून दूर लोटले असेल. अशा प्रकारांवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे, आपण यात अडकलेलो तर नाही ना, हे सतत पडताळून पाहिल्यास आपली ऐकण्याची आणि ऐकवण्याची प्रक्रिया सुदृढ होईल. त्वरित प्रतिक्रिया देऊन सल्ला देण्यापेक्षा इतरांचे म्हणणे आणि भूमिका समजून घेण्याकडे कल ठेवला तर समोरच्या व्यक्तीला सजग, सक्रिय आणि संवेदनशील श्रोता मिळाल्याचा आनंद मिळू शकेल.. आणि आपल्यालाही संयमी भूमिका बजावल्याचा!

असा श्रोता बनण्यासाठी प्रथम समोरची व्यक्ती काय सांगते आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे. काय व कसे सांगितले जात आहे, कोणते विचार, भावना व शब्दांवर जोर दिला आहे, ते पाहावे. आपला प्रतिसाद ‘बरं’, ‘अच्छा’, ‘हं’ अशा शब्दांतून, देहबोलीतून द्यावा. समोरची व्यक्ती बोलत असताना आपण इतरत्र न पाहता, विचलित न होता त्या व्यक्तीकडे आदरपूर्वक नजरेला नजर देत पाहावे. शांत व संयमी देहबोली ठेवण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करावा. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्ण झाल्यावर त्याची उजळणी करावी, योग्य ते प्रश्न विचारावेत व आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. यामुळे आपल्या समजुतीत तफावत नाही ना, हे पाहता येईल. आपल्या समजुतीत काही तफावत असल्यास त्यामध्ये बदल करण्याची मुभा त्या व्यक्तीला द्यावी. स्वत: कमीत कमी बोलून समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलू देण्याकडे सक्रिय श्रोत्याचा कल असतो. दीर्घ प्रतिसाद किंवा उत्तर देण्याची विलक्षण इच्छा असूनही ती नियंत्रित करून समोरच्या व्यक्तीला बोलते ठेवणे म्हणजे आपल्या सातत्याचा, सरावाचा व संयमाचा विजय ठरू शकतो. बऱ्याच संशोधकांचे हे मानणे आहे की, ‘ऐकण्याची कला’ ही नैसर्गिक बाब आहे. यात जरी तथ्य असले तरीही आत्मपरीक्षणाद्वारे आपण सहेतुक पावले उचलून आपल्या गुण-अवगुणांचे योग्य ते मोजमाप करून ‘समजून घेण्यासाठी व योग्य निर्णय व्हावा यासाठी जाणीवपूर्वक ऐकणे’ हे धोरण ठेवले तर आपल्यातला प्रत्येकजण खऱ्या अर्थाने उत्तम श्रोता बनू शकतो.
ऐकण्याची कला व कौशल्य अवगत असणे हा व्यक्तिमत्त्वाचा मौल्यवान ठेवा आहे. हा ठेवा वाढवण्यासाठी सतत कार्यरत असणे फार गरजेचे आहे. कारण ‘ऐकण्या’ने आपण आपल्या स्वत:प्रति, इतरांप्रति आणि आपल्या अवतीभोवतीच्या घटना, परिस्थिती व एकंदर जगाप्रति सजग होतो; आकलन करण्याची इच्छा व क्षमता वाढू शकते; अधिक माहिती तर मिळतेच, आणि नातेसंबंधांमध्येही सकारात्मक घटक अधिक प्रमाणात आढळू लागतात; व्यक्ती म्हणून ‘स्व’त्व विकसित व वृद्धिंगत व्हायला मदत होते. खरंच, दोन कर्ण व एक मुख यांचे हेच प्रयोजन- बोलण्याच्या दुप्पट ऐकणे- हे एकच सांगणे!
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)