नवे वर्ष नव्या उमेदीने येत असते. परंतु प्रश्न मात्र सदा जुनाच : ‘नववर्षांचे संकल्प काय?’ या प्रश्नाचे उत्तर आपल्यातले काहीजण अगदी उत्साहाने व हिरीरीने देतात, तर काही जण हा प्रश्न टाळतात. पण उत्साहाने आणि उमेदीने उत्तरे देणारे लोकसुद्धा वर्षांच्या मध्यावर कुठेतरी हा प्रश्न सोडून देतात. परिणामी त्यांच्याबरोबर त्यांचे संकल्पही दृष्टीआड जातात. वर्षांनुवष्रे चालत आलेल्या या घटनेचे निश्चित कारण काय, हे शोधून काढणे हाही मजेदार प्रवास ठरेल. कोणत्या प्रेरणेतून आपण नवे संकल्प करतो? दरवर्षी ते पूर्ण करण्याचा चंग का बांधतो? कधी त्या संकल्पाला आलेल्या यशाला, तसेच अधिककरून आलेल्या अपयशाला कसे सामोरे जातो? एकंदरच संकल्पपूर्तीचा माणसाच्या मानसिकतेशी काय संबंध आहे? हे अभ्यासणे त्यामुळेच गरजेचे आहे.
आपला मेंदू सतत कोणत्या ना कोणत्या नवलाईच्या शोधात असतो. एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय होऊन ती नियमित ओळखीची झाली की त्यातले नावीन्य नाहीसे होते. एकेकाळी नूतन वाटणारी गोष्ट काही काळाने जुनाट झालेली आपल्या अनुभवास येते. आणि मग आपण नव्या उत्साहाने नावीन्याचा शोध घेऊ लागतो. हे चक्र सुरूच राहते.. आणि त्या दिशेचे आपले मार्गक्रमणही! कोणतीही नावीन्यपूर्ण गोष्ट तसेच इतर सामान्य व परिचित गोष्टींपेक्षा आपली भिन्नता जपणारी अपूर्व गोष्ट आपले लक्ष वेधून घेते. ही प्रक्रिया बऱ्याचदा अनवधानाने घडते. नावीन्य हा मग एक अनोखा आणि प्रेरक अनुभव ठरतो. त्यातून उत्पन्न होणाऱ्या प्रोत्साहनाचा आपल्यातले बरेचजण नियमित पुरस्कार करतात. नावीन्य शोधणे व जीवनात त्याचा कायमस्वरूपी समावेश करणे, हे त्यांचे ध्येय बनते. नावीन्याचा ध्यास हा प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न प्रमाणात आढळून येतो. आणि त्या प्रमाणानुसार त्यांच्या जीवनविषयक निवडी व दृष्टिकोनही! हे प्रमाण ठरवण्यात व्यक्तिमत्त्वावर होणाऱ्या आनुवंशिकतेचा, संगोपनाचा, संस्कृती व इतर सामाजिक घटकांचा परिणाम महत्त्वाचा ठरतो. काही संशोधकांनी नावीन्याचा अति आग्रह याचा संबंध काही प्रकारच्या मानसिक आजार/प्रवृत्तींशी जोडलेला दिसतो. परंतु हेच नावीन्य मानसिक स्वास्थ्यास व व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक आहे, हेही संशोधकांच्या अभ्यासातून दिसून येते. या परस्परविरोधी निष्कर्षांतून हेच स्पष्ट होते, की या वर्तनाचे प्रमाण व कक्षा ठरवल्या गेल्या आणि परिचित गोष्टींचा अवलंब व नावीन्याचा शोध यांचा योग्य तो समतोल राखला गेला तर ही सकारात्मक बाब ठरू शकेल. हा समतोल महत्त्वाचा; कारण नावीन्याचा अति आग्रह आपल्याला अस्वस्थ आणि विचलित करूशकतो. नावीन्याचे ध्येय योग्य रीतीने योजल्यास आपण आपले जीवनविषयक योग्य पर्याय निवडू शकू. यशाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
नवे वर्ष म्हणजे अशीच एक नवलाईची गोष्ट. नव्याने सुरुवात करून जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत त्याची नवबांधणी करण्याच्या प्रेरणेतून आपण नवे संकल्प करतो. मुळात ही इच्छा निर्माण होण्यामागेही काही कारणे आहेत. गतजीवनात झालेल्या वैचारिक, भावनिक आणि वर्तनात्मक ऊहापोहाच्या पाश्र्वभूमीवर सद्य: जीवनात स्थर्य लाभावे, त्यात सहजता यावी, यश संपादन करण्याच्या संधी वाढाव्यात, घडलेल्या चुकांचे व निर्माण झालेल्या समस्यांचे निरसन व्हावे, व्यक्तिमत्त्व तसेच कौटुंबिक व सामाजिक विकास झाल्याचे अनुभव यावेत यासाठी आपण स्वत:ला वेळोवेळी सज्ज करत असतो. नववर्षांचे संकल्प योजतानासुद्धा हेच तर्क लागू पडताना दिसतात व बदलत्या कॅलेंडरबरोबर आपणही जीवनाचे नवे पान नव्या उमेदीने, नव्या योजनेने उलगडू पाहतो.
अशी प्रेरक सुरुवात होऊनही जसजसे महिने सरतात, तसतशी आपण केलेले संकल्प आणि त्यांची पकड सल होत जाताना दिसते. नवीन संकल्प म्हणजे आपण जे काही करत होतो त्यात बदल करणे, किंवा ते पूर्णपणे बदलून नवे काहीतरी निर्माण करणे. या प्रक्रियेसाठी आपल्याला आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर यावे लागते व नेमके हेच आपल्याला कठीण जाते. निग्रहाने व कष्टाने आपण हे केले जरी; तरीही ही धडाडी दीर्घकाळ टिकत नाही, हा आपल्यातला बऱ्याचजणांचा अनुभव असेल. याची काही कारणे म्हणजे आपली निष्क्रियता, आळस, ‘उद्यापासून संकल्प पाळू’ ही चालढकल करण्याची वृत्ती, सुरुवातीच्या संकल्पपूर्तीतून अनुकूल निकाल चटकन् न मिळाल्यामुळे, अपयशामुळे आपल्या प्रेरणेवर होणारा प्रतिकूल परिणाम, विस्मृती, जीवनविषयक इतर बाबींनी दिनक्रम व्यापून जाणे, इच्छाशक्तीची कमतरतेकडे होत चाललेली वाटचाल, यापूर्वी दिरंगाई झाली म्हणून आताही तेच होईल- ही ठाम समजूत आणि त्यामुळे आत्मविश्वासावर होणारा अनिष्ट परिणाम, नवे संकल्प व त्यासाठी आवश्यक असणारे नवे विचार- भावना- कृतिचक्र यांच्या यशाप्रती होणारी अशाश्वततेची भावना आणि त्यांच्या समावेशामुळे होणाऱ्या जीवनविषयक बदलांप्रती प्रतिकार!
आपण आपल्या संकल्पांचे स्वरूप काय प्रकारचे योजतो यावर बरेच काही अवलंबून असते. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे संकल्प हे अवाजवी, विचारहीन संकल्पांपेक्षा सरस ठरतात, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यातील घटकांचा, जीवन- परिस्थिती व प्रवासाचा आणि एकंदरच ‘स्व’त्वाचा विचारपूर्वक अभ्यास करून केलेले संकल्प दीर्घकाळ टिकाव धरतात. नवे संकल्प म्हणजे आपल्या मेंदूलाही (मेंदूतील मज्जासंस्था पथांना) नवीन कामगिरी! हे मार्गक्रमण सुरळीत होण्यासाठी आपण आपल्यालाच थोडा वेळ देणे उपयुक्त ठरेल. ‘झटकन ठरवले व पटकन झाले’ ही इच्छा बाळगणे तसे कठीणच. संकल्पाचे स्वरूप जसे व्यक्तीच्या जीवन-परिस्थितीला साजेसे असावे, तशीच त्यांची संख्या थोडकी व बांधणी स्पष्ट असायला हवी. ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या कृतींचा समावेश करावा, दिनक्रम कसा असावा, हे ठरवता येते. या प्रवासातील कोणत्या बाबी आपल्या नियंत्रणात आहेत किंवा नाहीत, याचा आढावा घेणे शक्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठरवलेले ध्येय आपण साध्य करूशकलो आहोत की नाही, याचा निश्चित निष्कर्ष काढणे शक्य होते.
केलेल्या संकल्पांचा आढावा नियमित स्वरूपात घेणे गरजेचे आहे. एकदम वर्षअखेरीस घेतलेला आकस्मिक आढावा कितपत उपयुक्त ठरेल, याबद्दल साशंकताच आहे. या अकस्मात घेतलेल्या आढाव्यात आपली संकल्पपूर्ती न झालेली आढळल्यास आपल्याला निराश, दोषी वाटायला पुरेसे ठरेल आणि पुढच्या वर्षीच्या योजनेवर व योजना तयार करण्याच्या प्रेरणेवर याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे अगदी रोज न जमल्यास निदान दर आठवडय़ाला संकल्पपूर्तीचा आढावा घ्यावा आणि आपण त्यात कितपत यशस्वी झालो, कोणत्या कमतरता आपल्याला भरून काढायच्या आहेत, याचा विचार करावा.
नावीन्याच्या प्रदेशात झेप घेताना आत्मविश्वास बाळगावा. त्याचा आनंद अनुभवावा. आपण आपल्या ‘कम्फर्ट झोन’ला मागे सारून विचारपूर्वक पुढच्या दिशेने पाऊल टाकताना संकल्पपूर्तीच्या प्रक्रियेत विचार-भावना-कृतीच्या स्वाभाविक अस्तित्वाचा स्वीकार करून त्यात योग्य ती डागडुजी करावी. चिकाटीने आणि आशावादी दृष्टिकोनातून आपल्याला संकल्पपूर्तीची प्रक्रिया राबवायची आहे याची आठवण सतत स्वत:ला करत राहावी. या प्रक्रियेत आप्तेष्टांचा प्रेरणास्रोत म्हणून समावेश करून घ्यायलाही हरकत नाही. भारंभार संख्या ठेवण्यापेक्षा थोडके संकल्प निवडावे, त्यांचा नियमित व वर्षभर पाठपुरावा करावा; संकल्पांची शाब्दिक व कृतीतील बांधणी इतकी सोपी-सुलभ ठेवावी, की ती टाळणे कठीण जाईल. संकल्पपूर्तीच्या प्रक्रियेत एखाद्या कृतीची सवय लागण्यावर जास्त भर असावा; परिणाम अपोआप दिसतीलच. आपली आजूबाजूची परिस्थिती संकल्पपूर्तीच्या प्रक्रियेसाठी पोषक आहे ना, याची खबरदारी घ्यावी. कारण बऱ्याचदा आपली प्रतिक्रिया व कृती ही आपल्या आजूबाजूच्या घटकांप्रती दिलेला प्रतिसाद असतो. शक्य असतील ते व तेवढे बदल करावेत. या विशिष्ट बदलांसाठी आपल्याला आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या मतांचाही समावेश करावा लागेल. असे छोटे छोटे बदल आणि ध्येयाच्या दिशेने टाकलेली चिमुकली पावलेही मोठे बदल घडवून आणू शकतात यावर ठाम विश्वास ठेवावा आणि संकल्पपूर्तीची प्रक्रिया चिकाटीने यशस्वी करण्याचा संकल्प करावा.
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man mentality with new resolution
First published on: 07-02-2016 at 01:01 IST