News Flash

जावई नं. १

सासर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सासू- सुनेची जोडगोळी उभी राहते.

जावई नं. १

सासर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सासू- सुनेची जोडगोळी उभी राहते. पण लग्न झाल्यावर निर्माण होणारे आणखी एक नाते- जावई आणि सासर यावर मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा, पण दुर्लक्षित विषय आहे.
आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो त्याच्या चालीरीती, मूल्ये, विचारसरणी, जीवनशैली, भावनाविश्व हे सर्वच आपले होतात. या गोष्टींचा प्रत्येक नात्यावर कळत-नकळतपणे प्रभाव पडतो. लग्न व कुटुंब या संकल्पनाही येथेच आकार घेतात. त्याबाबतीतील आपल्या कल्पना, स्वप्न व अपेक्षा यांसोबतच आपण लग्नबंधनात आणि त्याबरोबर जोडल्या जाणाऱ्या नात्यांमध्ये शिरतो. दोन भिन्न विचारसरणींची माणसे एकत्र येऊन लग्नाच्या संस्कारात बांधली जाताच ‘सासर’ नावाचे नवे नाते त्यांना आपोआप जोडले जाते. त्यामुळे पती व पत्नीने एकमेकांच्या जन्मदात्या कुटुंबाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. सुनेने सासरी कसे नांदावे, सर्वाना कसे आपलेसे करावे, कसे सामावून व जुळवून घ्यावे, याबद्दल लोक अधिकाराने बोलताना दिसतात. पण हेच नियम व या बहुचर्चित कार्यपद्धती जावयानेही अवलंबिल्या तर ‘लग्न’ हे नाते खऱ्या अर्थाने दोन्ही कुटुंबांना व त्या पती-पत्नीच्या नात्यालाही साजेसे व पूरक ठरेल.
रोहन व रियाचा प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये प्रेमभावाचे व आदराचे नाते होते. एकमेकांच्या संमतीनेच सर्व निर्णय घेतले जातात असे भासत असे. परंतु खरा अंतिम निर्णय रोहनच घेई. रिया व तिच्या निर्णयप्रक्रियेवर तिच्या आई-वडिलांचा पगडा आहे असे गृहीत धरून तिने सुचवलेली कोणतीही गोष्ट ही तिची नसून तिच्या पालकांचीच आहे असे तो समजे. त्याचा अहंकार आड येई आणि मग ‘सासरकडच्यांची ढवळाढवळ’ या सदराखाली तो चिडचीड करत असे व त्यांना नावे ठेवत असे. रियाला हे स्वाभाविकरीत्या खटकायचे. रोहन जरी कॉर्पोरेट जगतात मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी करत असला, कामानिमित्त जगभर फिरत असला तरी काही अंशी त्याची मते नव्या युगाबरोबर पुढे चालणारी नव्हती. जावयाचा मान, लग्न झाले की मुलीने माहेरचा ओढा कमी करावा व तिच्या आई-वडिलांनीही जपून व्यवहार करावा, बायकोच्या माहेरी जावयाचा ओढा असणे हे कमीपणाचे लक्षण व दोस्तांमध्ये हा हास्यविनोदाचा विषय, लग्नानंतर सून म्हणून तिच्या काय त्या जबाबदाऱ्या; पण जावयाला मात्र कसलीच बांधिलकी नाही, त्याने कर्तव्ये केलीच तर त्याचे नवल व कौतुक, दुरून डोंगर साजरे यांसारख्या बुरसटलेल्या संकल्पना त्याच्या ओठांवर नसल्या तरी मनात जरूर होत्या. त्याच्या वर्तनातून त्या कळत-नकळत दिसून यायच्या. रियाच्या पालकांची साधी चौकशी करणेही त्याला गरजेचे वाटायचे नाही. रियाकडून खुशाली कळली तर ठीक! त्यांच्या संपर्कात तो असे; परंतु त्यांचा भावनिक आधार तो कधीच होऊ शकला नाही. आपले आई-वडील रोहनवर किती प्रेम करतात, पण रोहन त्यांना प्रतिसाद देत नाही याचे तिला वाईट वाटे. जशास तसे म्हणून काही वर्षांनी त्याच्या आई-वडिलांशी ती तुटक वागू लागली. पण तिच्या मनाला ते पटले नाही. तिच्या संस्कारांत ते बसत नव्हते. तिने तटस्थ वागणे सोडून दिले. पुन्हा ती त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. रोहनकडे हा विषय काढताच तो त्यास बगल देई, किंवा तिच्या पालकांच्या चुकांची शृंखला मांडे. यामुळे तिला अजून त्रास होई. विषय तेथेच थांबे. त्या दोघांच्या वैवाहिक नात्यात यामुळे तेढ निर्माण होऊ लागली. त्यांचे वैयक्तिक आयुष्य वरवर जरी सुरळीत चाललेले दिसत असले तरीही ‘या नात्यात आपल्या पालकांना मात्र जावयाच्या रूपात मुलगा मिळाला नाही’ याची खंत तिला सतत वाटत राही.
ही व्यथा आपल्यातील बऱ्याचजणांची असेल. हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरीही आपल्या अवतीभोवतीही असे अनेक रोहन-रिया आहेत. नात्यांचे स्वरूप आज बदलत चालले आहे हे जर आपण मान्य करतो, तर ते नवे स्वरूप कसे असावे, यावर चर्चा होणेही गरजेचे आहे. अशापैकीच जावई व सासू-सासरे हे नाते! आपल्या आई-वडिलांशी आपल्या पत्नीने आपुलकीने, प्रेमाने, आदराने वागावे व त्यांचा भावनिक आधार बनावा अशी बहुतांश नवऱ्यांची इच्छा व अपेक्षा असते. अगदी बोलून जरी दाखवली नाही, तरी मनात सुप्तपणे असतेच. पण लग्न या दुचाकी प्रक्रियेतील महत्त्वाचा व अविभाज्य घटक ‘पत्नी’- हिच्यासुद्धा आपल्या नवऱ्याकडून आपल्या आई-वडिलांसंदर्भात याच अपेक्षा असतात. जावईबापूंनी ‘जावई माझा लाडका’ कसे बनावे, त्यासाठी केवळ अधिकार व प्रथेनुसार ‘जावई’ या पदातून येणारे महत्त्व उपभोगून नव्हे, तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्याही कशा पार पाडाव्यात, यावर चर्चा व्हायला हवी. जन्मदात्या पालकांप्रति आपल्या जशा काही जबाबदाऱ्या आहेत, तशाच पत्नीच्या पालकांप्रतिही आहेत, ही बाब भावनिक व नैतिकदृष्टय़ा स्वीकारावी. या मौल्यवान स्वीकारावरच हे नाते टिकून असते. आपली पत्नी तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी असल्यास तर हे आवर्जूनच व्हायला हवे. आपला हा स्वीकार त्यांच्यापर्यंत आपल्या कृतींतून पोहोचवावा. त्यांनी आपल्यावर विश्वास टाकावा असे पारदर्शक वर्तन असावे. ही बाब त्यांना दिलासा देणारी ठरू शकते. पत्नीच्या तिच्या पालकांशी असलेल्या नात्याचा आदर करावा. ही गोष्ट लग्नाच्या प्रारंभीच्या काळात अधिक महत्त्वाची. यामुळे ‘लग्न’ या नवीन नात्यात स्वत:ला गुंफताना पत्नीस अधिक सोपे जाऊ शकते. या काळात आपण स्वत:हून त्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात. त्यांची खुशाली विचारावी. मुलीच्या सहवासास दुरावलेल्या त्यांच्या मानसिकतेकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांची चौकशी करावी. त्यांना मदतीची गरज असल्यास शक्य तितकी ती करावी. अर्थात अशाने त्यांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ होत नाही ना, याचाही विचार करावा. त्यांच्या काही गोष्टी वा मते पटत नसल्यास त्यांच्याशी मोकळेपणाने त्याबाबत चर्चा करण्याकरता त्यांच्याशी पारदर्शक नाते असावे यासाठी खास प्रयत्न करावे. त्यांचा तिरस्कार करण्याऐवजी व्यक्तिभिन्नतेचा सिद्धान्त ध्यानी ठेवून या नात्यातील आत्मीयता दक्षतेने जपावी.
पत्नी तिच्या माहेरी एखाद्या समारंभाचे नियोजन करत असल्यास त्यात आपलाही सक्रिय सहभाग असावा. काही अपरिहार्य कामामुळे हे न जमल्यास ‘ते समजून घेतील’ किंवा ‘त्यांनी समजून घेतलेच पाहिजे’ असे न मानता आपली अडचण त्यांना सांगावी. तथापि सासरच्या समारंभांमध्ये जमेल तेव्हा उपस्थित राहावे. आपली नित्याची अनुपस्थिती ही ‘आपल्या मुलीच्या व तिच्या नवऱ्याच्या वैवाहिक जीवनात काहीतरी समस्या आहे की काय?’ अशा शंकेचे व काळजीचे कारण बनू शकते. खुला सुसंवाद नाते बहरण्यासाठी अनिवार्य आहे. तसा तो नसल्यास, किंवा तणाव-तंटायुक्त वर्तन असल्यास, किंवा उभयतांत शीतयुद्धसदृश्य स्थिती असल्यास पत्नीचा कोंडमारा होऊ शकतो व याचा दुष्परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.
मुलगी तिच्या आई-वडिलांसाठी लाडकीच असते. आपला जावई आपल्या मुलीशी प्रेमाने व आदरपूर्वक वागतो आहे ना, तिच्यातील क्षमता, कलाकौशल्यांची जोपासना करतो आहे ना, तिला सुरक्षित व शोषणरहित वातावरणात नांदवत आहे ना, याबाबत ते सतत सतर्क व बऱ्याचदा काळजीत असतात. सुदृढ वैवाहिक नाते (व त्यासाठी घेतलेले विशेष कष्ट) हे जावयाला सासू-सासऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. आपली मुलगी विश्वसनीय व प्रेमळ संगतीत आहे, या भावनेने त्यांना दिलासा मिळतो. त्यांच्या इच्छांचा मान ठेवून व आपल्या संसाराच्या सशक्तीकरणासाठी जमतील तितके परिश्रम.. होय- परिश्रम घ्यावेत. आपल्या अहंकारापेक्षा, अनिष्ट व बुरसटलेल्या संकल्पना जोपासण्यापेक्षा वैवाहिक नाते व कुटुंबसौख्य जास्त महत्त्वाचे समजावे.
हे सर्व करत असताना पती-पत्नी म्हणून आपले काही खासगी व वैयक्तिक निर्णय असतात. त्यांमध्ये एकमेकांच्या दृष्टिकोनांना व मतांना महत्त्व द्यावे. कोणत्याही प्रकारची व कोणाकडचीच ढवळाढवळ त्यात नसावी, हे खरे. अशा मर्यादा जोडपे म्हणून घालून घेण्यास काहीच हरकत नाही. कोणते विषय फक्त आपले आपणच हाताळायचे, हे संगनमताने ठरवावे व ठरवल्याप्रमाणे हाताळावत. विनयशीलतेने आपली बाजू मांडून या मर्यादा आपापल्या सासरी स्पष्ट कराव्यात.
जावई म्हणून सासू-सासऱ्यांचे प्रेम व आदर मिळण्याचा आपला जसा अधिकार असतो, तसेच त्यांच्याशी मनापासून केलेल्या प्रयत्नांद्वारे विश्वासाचे नाते प्रस्थापित करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी! आपल्या पत्नीच्या कुटुंबाचा महत्त्वाचा व लाडका सदस्य बनण्यासाठी उचललेली पावले आपल्या वैवाहिक जीवनाच्या सुदृढतेसाठी व मुलांचे आजी- आजोबांप्रति नाते बहरावे यासाठी, त्या व आपल्या कुटुंबांच्या आनंदासाठी महत्त्वाची ठरतील. याने दोन्ही कुटुंबांतील व्यक्तींना नातेसंबंधांची गोडी अनुभवता येईल. दोन्ही कुटुंबांच्या एकत्रपणामुळे नात्यांची घट्ट वीण बसवता येईल. अशाने आपल्यावर प्रेम करणारे तर वाढतीलच. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन ताणतणावांशी झुंज देण्यासही बळ लाभेल.
जे आपल्या पत्नीसोबतचे नाते गृहीत धरत नाहीत, ज्यांना ते सुदृढ, प्रेमपूर्ण व विश्वसनीय बनवायचे आहे, ते सासरच्यांप्रतीच्या आपल्या वर्तनाकडे दक्षतेने पाहतील आणि त्या अनुषंगाने सकारात्मक पावलेही निश्चितपणे उचलतील!

केतकी गद्रे
ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 1:26 am

Web Title: relationship of son in law
Next Stories
1 भूतकाळ.. : रमणे की रुतणे?!
2 ऐका.. सौख्य भरे!
3 जावे कृतज्ञतेच्या गावा..
Just Now!
X