इंद्रियगण आणि त्रिगुणांच्या प्रभावात अडकलेल्या साधकाच्या मनाला सद्गुरूकडे वळविणं आणि त्याला सद्गुरू समर्पण शिकवणं, हा ज्या मनोबोधाच्या श्लोकांचा हेतू आहे त्यांची सुरुवात अशी ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असलेल्या सद्गुरूच्या वंदनेनं झाली आहे. या सद्गुरूचं खरं महात्म्य, त्याचं विराट स्वरूप आपल्या लक्षात येत नाही. त्या विराट, सर्वव्यापी सद्गुरू स्वरूपाचाच संकेत पहिल्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात आहे.. ‘‘मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा!!’’ समर्थानी ‘दासबोधा’त सद्गुरूंना नमन करताना म्हटलं आहे की, ‘‘जय जया जि सद्गुरू राजा। विश्वंभरा विश्वबीजा।’’ म्हणजे विश्वाला व्यापून उरलेल्या आणि या विश्वाचं बीज असलेल्या सद्गुरूला नमन असो.. या ‘विश्वबीजा’ शब्दात या ‘मुळारंभ’चा संकेत आहे. हा मुळारंभ म्हणजे समस्त सृष्टीचाही मुळारंभ असला पाहिजे! या सृष्टीच्या आरंभी काय होतं? ‘विष्णु पुराणा’त म्हटलं आहे की, ‘‘नाहो न रात्रिर्न नभो न भूमिर्नासीत्तमो ज्योतिर्भूच्च नान्यत्। श्रोत्रादिबुद्धय़ानुपलभ्यमेकं प्राधानिकं ब्रह्म पुंमास्तदासीत्।।’’ म्हणजे तेव्हा ना दिवस होता ना रात्र, ना आकाश होतं ना वायु, ना अग्नि होता ना जल, ना पृथ्वी, ना प्रकाश आणि ना अंध:कारदेखील! श्रोत्रादि इंद्रियं तसंच मन, बुद्धी, चित्त आदिंनी जाणलं न जाणारं परब्रह्म केवळ होतं! ‘जुन्या करारा’ची (‘ओल्ड टेस्टामेन्ट’ची) सुरुवातही काहीसं हेच सांगते. ‘जुन्या करारा’नुसार परमेश्वरानं प्रथम स्वर्ग आणि पृथ्वी बनविली, पण ती पृथ्वी आकारविहीन होती. मग देवानं प्रकाश उत्पन्न केला, दिवस आणि रात्र उत्पन्न केली, जल आणि आकाश वेगळं केलं.. असो. तर केवळ परब्रह्म सृष्टीच्या आरंभाआधीही होतं. या ‘परब्रह्मा’ची उकल ‘गुरूगीते’च्या आधारानं होते. पार्वतीमातेनं भगवान शंकरांना एक प्रश्न केला की, ‘‘केन मार्गेण भो स्वामिन् देही ब्रह्ममयो भवेत्?’’ हे स्वामी, देहबुद्धीत अडकलेल्या या जिवाला  ब्रह्ममय स्थिती कशी लाभेल? त्यावर भगवान शंकरांनी सांगितलं की, जिवाला ब्रह्ममय स्थिती कशी लाभेल, हे सांगण्याआधी मुळात ब्रह्म म्हणजे काय, हे तर उमगलं पाहिजे! तर, ‘‘गुरूं विना ब्रह्म नान्यत्, सत्यं सत्यं वरानने!’’ हे वरानने, सद्गुरूशिवाय ब्रह्म दुसरं नाहीच! तेव्हा संकुचित जिवाला सर्वव्यापक ब्रह्ममयता हवी असेल तर त्याला सद्गुरूमयच व्हावं लागेल! तेव्हा या सृष्टीच्या मुळारंभी परब्रह्म अर्थात सद्गुरूच होते, असं गुरूगीताही सांगते. आता कुणी म्हणेल, ही सृष्टी तर ब्रह्मदेवानं उत्पन्न केली. मग तोच या सृष्टीच्या आरंभी कशावरून नसेल? त्यासाठी कल्पाआधी कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाची स्थिती काय होती, हे ‘श्रीमद्भागवता’वरून नाथांनी सांगितलेल्या ‘चतु:श्लोकी भागवता’त स्पष्ट नमूद आहे. नाथ सांगतात, ‘‘एवं नाभिकमळीं कमलासन। बैसला केवळ अज्ञान। तंव हृदयी झाली आठवण। मी येथें कोण कैंचा पां।। मज कैचें हे कमलासन। येथें याचें मूळ तें कवण। तें पाहावया आपण। जळीं निमग्न स्वयें जाहला।। सहस्त्रवरुषें बुडी देता। कमळमूळ नयेचि हाता। तेथें निरबुजला ये वरुता। बैसे मागुता कमळासनी।। विधाता विचारी चारी खाणी। चौऱ्यांसी लक्ष जीवयोनी। या चराचराची मांडणी। सृष्टी कैसेनी सृजावी हे।।’’ थोडक्यात सृष्टी ज्यानं निर्माण केली, त्या ब्रह्मदेवालाही आपण कोण आणि कसे आलो ते कळलं नाही! मग सृष्टीरचनेचं जे काम शिरी आलं होतं ते तरी कसं करावं, हेदेखील त्याला उमगेना! मग ब्रह्मदेवानं आर्त पुकारा केला. हा पुकारा अंतर्यामी जाणत्या अशा हरीला कळला! त्यानं तप करायची आज्ञा केली. आता ब्रह्मदेवाला तप करायची आज्ञा देणारा हा हरी कोण आणि हे खरं तप कोणतं, याचा शोध घेताना ‘निर्गुणाचा आरंभ’ही उकलत जाणार आहे!

चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…