मानसिक हिंसेनं मन अधिकच अस्थिर, अशांत होतं. त्या दाहानं मनाचा सत्त्वभावही नष्ट होत जातो. आध्यात्मिक वाटचालीसाठी आवश्यक असलेली मनाची ऋजुता नष्ट होते. मन नकारात्मक विचारानं व्यापून जातं आणि सहज समत्वभावाची स्थिती कधीच न उमलण्याचा मोठा धोका निर्माण होतो, हे आपण पाहिलं. नाम घेऊ  लागल्यावर आंतरिक पालटाची सूक्ष्म प्रक्रिया सुरू होते. नाम जसजसं खोलवर जातं, तसतशी वाचिक आणि मानसिक हिंसेबद्दल सजगता येऊ  लागते. ही हिंसा थांबत नाही, पण तिच्यामुळे होणारी आंतरिक हानी उमगू लागते. अहिंसेनंतर येतं सत्य! सत्य म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं सत्याची धारणा न सोडणे! आता ‘सत्य’ म्हणजे काय? जे सतत शाश्वत अपरिवर्तनीय असतं ते. जे जे खंडित आहे, बदलणारं आहे, अशाश्वत आहे त्यात मनानं न गुंतणं ही सत्याची धारणाच आहे. थोडक्यात, आपल्या जीवनातल्या प्रसंगांचं, माणसांचं खरं रूप ओळखून त्या त्या प्रसंगात योग्य ते करणं, आपल्या माणसांप्रति सर्व कर्तव्यं प्रेमानं पार पाडणं, पण मनानं त्यात अडकून न राहणं, ही सत्याचीच धारणा आहे. आपल्यासमोर अनेक जण जन्मले, जगले आणि काळाच्या पडद्याआड गेले, पण जीवनाचा प्रवाह थांबला का? तो कायमच आहे. हा जो ‘आहेपणा’ आहे, अस्तित्व आहे ते टिकून आहे. त्याचा पाया सत्य शाश्वत आहे. संत सांगतात, हा पाया केवळ भगवंत आहे. आता हा भगवंत पाहणं काही सोपं नाही, पण त्याच्याशी एकरूप झालेला त्याचा परमभक्त असा जो सद्गुरू आहे त्याची धारणा ही सत्याचीच धारणा आहे. आता हा सद्गुरू त्या परम तत्त्वात स्थिर झालेला, एकरूप झालेला मात्र हवा. आणि हे जाणता येणं कठीण नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना? ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी!’ तसा हा भक्त परम भावात स्थित आहे की संकुचित भावात स्थित आहे, हे सहज जाणवू शकतं. भ्रम, मोह आणि मायेत तो स्वत: रुतला आहे का, त्यालाही प्रसिद्धी, द्रव्य यांची ओढ आहे का, हे समजू शकतं. तेव्हा सत्याची धारणा जर साधायची असेल, तर जो सत्याशी एकरूप आहे त्याची धारणा हाच त्याचा सहज उपाय आहे. आता सद्गुरूंची धारणा म्हणजे तरी काय? तर त्यांचा विचार तोच माझा विचार होणं, त्यांची इच्छा हीच माझी इच्छा होणं, त्यांचा संकल्प हाच माझा संकल्प होणं, त्यांचा उद्देश हाच माझा उद्देश होणं! अर्थात वैचारिक, भावनिक, मानसिक ऐक्य होणं. असं झालं तरच त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होईल. त्यांच्या वागण्या-बोलण्यात जे असत्य आहे, त्याला थारा नाही. जे अशाश्वत आहे त्याची ओढ नाही. जे खण्डित आहे, त्याच्यासाठी तळमळणं नाही. त्यामुळे त्यांच्या बोधानुरूप आचरणाचा अभ्यास सुरू झाला की माझ्या आचरणातही असत्याला वाव उरणार नाही. सत्याची व्याख्या आपण केली होती की, काया, वाचा आणि मनानं जे सत्य आहे त्याचंच ग्रहण आणि त्याचाच उच्चार, हे सत्य आहे. तर जेव्हा सत्याशी एकरूप अशा सद्गुरूच्या बोधाशी आपण प्रामाणिकपणे संलग्न होऊ  तेव्हा आपोआप जे सत्य आहे त्याचंच ग्रहण सुरू होईल. आपल्या जीवनातील चढ-उतारातूनही जीवनाच्या खऱ्या स्वरूपाचं आकलन आपल्याला होऊ  लागेल. मनाची घडण एकदम बदलणार नाही, मनातल्या अपेक्षा एकदम संपणार नाहीत, पण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवून जगणं, दुसऱ्यावर भावनिकदृष्टय़ा अवलंबून जगणं यामुळे आपल्याच मनावर होणारे आघात जाणवू लागतात. गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यावर पाणी स्वच्छ व्हावं त्याप्रमाणे नाम मनात फिरू लागलं की भ्रामक ओढीचं गढूळपण ओसरू लागतं. सद्भाव खऱ्या अर्थानं जागा होऊ  लागतो. जीवनाचं, व्यक्ती आणि वस्तुमात्राचं खरं रूप आणि त्यातलं आपलं गुंतणं स्वच्छ उमगत जातं. जीवनातलं असत्य आधारांवरचं अवलंबणं कमी होऊ  लागतं. -चैतन्य प्रेम

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…