‘देहच मी’ या भावनेतून देहाशीच जखडलेली देहबुद्धी जोवर कायम आहे तोवर देहाचं प्रेम, देहाची आसक्ती आणि देहाचा आधार यांचा प्रभाव सुटणार नाही. हा देह नष्ट होणारा अर्थात अशाश्वत आहे. त्यामुळे या अशाश्वत देहाच्या आधारावर तग धरण्याचा प्रयत्न करणारी ही देहबुद्धीही खरं तर तकलादूच असते.  पण तरी ती माणसाच्या भौतिक जीवनातही बराच उत्पात घडवते. तिच्याच आधारावर माणसातला अहंकार, आसक्ती, लोभ, मोह, भ्रम, अज्ञान वाढत असतं. त्यामुळे रोजच्या जगण्यातही या देहबुद्धीपायी माणूस स्वत:वर अनवस्था प्रसंगही ओढवून घेतो. अनेकदा अहंकारातून तो मतभेद, वाद, भांडणं, वैर या साऱ्या गोष्टींना जन्म देतो आणि त्यातून चिंता, भीती आणि दु:खच भोगतो. मग जी देहबुद्धी अविवेकच वाढविते तिच्या आधारावर विवेक साधूच शकत नाही. तिच्या आधारावर विदेही म्हणजे देहचिंतारहित स्थिती येऊच शकत नाही.  समर्थ दासबोधात सांगतात, ‘‘देहचि होऊन राहिजे। तेणें देहदु:ख साहिजे। देहातीत होतां पाविजे। परब्रह्म तें।।’’ (दशक ८, समास ८, ओवी २५). जो देहभावनेनंच जगत आहे त्याला पदोपदी देहदु:खच येणार. आता इथं देहदु:ख म्हणजे केवळ देहाला होणाऱ्या आजाराचं दु:ख एवढंच अभिप्रेत नाही, तर देहाच्या वाटय़ाला जो अपमान, उपेक्षा, अवहेलना येते त्यानंही होणारं जे दु:ख आहे तेही अधिक व्यापक असं देहदु:खच आहे. कारण देहबुद्धीपायीच अर्थात ‘मी’च्या आसक्तीपायी तो अपमान, ती उपेक्षा आणि अवहेलना जास्त बोचरी होते. हे दु:ख वरकरणी जरी मानसिक भासत असलं तरी देहावरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. आता जो देहभावनेनंच जगत आहे, देहालाच सर्वस्व मानून जगत आहे त्याला स्वत:हून देहबुद्धी सोडता येणं, देहातीत होता येणं कठीण आहेच, पण खरा विवेकही त्याला उमगणं आणि त्यानुसार आचरण होणंही कठीण आहे. मग समर्थ जे सांगतात, ‘‘विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी।’’  हे कसं साधणार? उलट देहबुद्धी सोडून देण्यासाठी तो जे जे प्रयत्न करील त्यातून त्याची देहबुद्धीच वाढत जाईल. म्हणूनच स्वत:च्या आकलनानुसार होणारा जप, तप, साधना ही अहंकार अर्थात देहबुद्धीच तर वाढवते. खरी साधना म्हणजे भाव विकसित होणं आणि भाव पक्व होणं हीच  साधनेतली प्रगती आहे. पण जिथे भवच भावतं तिथं भावही भवाचाच असणार ना? तोच विकसित होत जाणार ना? तेव्हा ‘‘विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी।’’ हे जरी खरंच असलं तरी आपल्याला स्वत:हून, स्वबळावर ते साधणं शक्य नाही. विवेकानं देहबुद्धी सोडली जात नसल्यानं शोक, चिंता आणि दु:खाच्या कचाटय़ातूनही आपल्याला स्वबळावर सुटता येणं शक्य नाही. समर्थाचं देहभूत नावाचं एक श्लोकबद्ध प्रकरणं आहे. त्याच्या दुसऱ्या ओवीत ते सांगतात : ‘‘म्हणे दास रे वास जेथें भुतांचा। भुतें सांडुनी शोध घ्या अद्भुताचा। नसे भूत अद्भुत त्यातें म्हणावें। विवेकें देहेभूत सर्वै जिणावें।।’’ जिथे भूतांचा म्हणजे देहबुद्धीने लिप्त असलेल्यांचा वास आहे तो सोडून जे अद्भुत आहे त्याचा शोध घ्या! आता हा वास नेमका कुठे आहे आणि हे अद्भुत काय आहे? फार मार्मिक आहे ते. भूत म्हणजे पंचमहाभूत. या पंचमहाभूतांचा वास ज्या मनात, ज्या चित्तात, ज्या बुद्धीत आहे त्या मननाची, चिंतनाची आणि विचाराची रीत सोडून जे अद्भुत आहे, त्याचा शोध घ्यायला समर्थ सांगत आहेत. पंचमहाभुतांचा वाराही ज्याला लागत नाही तोच खरा अद्भुत आहे. जो खरा विवेकी आहे, ज्याच्यात देहबुद्धीचा लवलेश नाही आणि जो विदेहीपणे मुक्ती भोगत आहे, आत्मस्थ आहे , तोच खरा अद्भुत आहे. हा अद्भुत म्हणजे खरा सद्गुरू. त्यांच्या आधाराशिवाय विवेकाचं आकलन अशक्यच आहे!

-चैतन्य प्रेम