20 November 2017

News Flash

४१९.  ध्येय-साधना : १

थोडक्यात पूर्ण तृप्त होणं हेच आपल्याला आयुष्यात साधायचं आहे, हाच आपल्या जगण्याचा हेतू आहे,

- चैतन्य प्रेम | Updated: August 28, 2017 1:22 AM

मनुष्य जन्माचं नेमकं ध्येय काय? आत्मकल्याण, आत्मोद्धार, स्वरूपस्थितीची प्राप्ती हेच मनुष्य जन्माचं ध्येय आहे, असं अध्यात्म सांगतं. सर्वसाधारणपणे या ध्येयाची जाणीव माणसाला जन्मापासून नसते. ज्या आर्थिक, सामाजिक चौकटीत आपण जन्मलो त्याच चौकटीत किंवा ती चौकट मोडून आपल्या सर्व शारीरिक, मानसिक क्षमतांनिशी प्रयत्न करीत प्रगती करणं, हेच आपल्या जन्माचं ध्येय आहे, अशी माणसाची साधारण कल्पना असते. ही प्रगती अर्थातच भौतिकातली म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा अशा बाह्य़ तर लैंगिक, भावनिक व मानसिक अशा आंतरिक गोष्टींशीच निगडित असते. या गोष्टींची अपेक्षित प्रमाणात प्राप्ती झाली की आपण सुखी होऊ, अशीही माणसाची कल्पना असते. मात्र माणसाची अपेक्षा एकसमान राहात नसल्यानं आणि जे मिळालं त्यातली गोडी खालावून आणखी काही मिळवण्याची ओढ लागत असल्यानं भौतिकात कितीही प्राप्ती झाली तरी माणूस पूर्ण तृप्त कधीच होत नाही. थोडक्यात पूर्ण तृप्त होणं हेच आपल्याला आयुष्यात साधायचं आहे, हाच आपल्या जगण्याचा हेतू आहे, हेच आपलं जीवन ध्येय आहे, याची जाणीव माणसाला होते. मग भौतिकातलं कितीही मिळवलं तरी आणखी मिळवण्याची ओढ कायम राहात असल्यानं आपण कधीच तृप्त होत नाही, याचीही जाणीव माणसाला होते. मग भौतिकातही मी पूर्ण सुखी होईन असा भौतिकापलीकडचा काही मार्ग आहे का, याचा शोध घेत माणूस तत्त्वज्ञानाच्या मार्गावर येतो. नीट लक्षात घ्या हं, या मार्गावर येण्यामागचा त्याचा मूळ आणि सूक्ष्म उद्देश भौतिकात पूर्ण सुखी होणं हाच असतो. देवाच्या किंवा गुरूच्या कृपेनं आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील, याच भावनेनं माणूस तिकडे धावतो ना? तुमच्या भौतिकाचं मी पूर्ण वाटोळं करीन, पण तुम्हाला त्यातच पूर्ण सुखी करीन, अशी ग्वाही कुणी दिली तर कुणी फिरकेल तरी का त्याच्याकडे? तेव्हा काडीमात्र काहीच न गमावता कुणाकडून अखंड सुखाच्या खजिन्याची मालकी मिळतेय का, याचा शोध माणूस अध्यात्माच्या मार्गावर घेऊ  लागतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, ‘‘काशीला जाणाऱ्या गाडीत कुणीही कुठल्याही कारणानं का शिरेना, गाडी सोडली नाही तर तो काशीला पोहोचतोच,’’ तसं आहे हे! कोणत्याही कारणानं का होईना या मार्गावर पाऊल टाकलं तर खरी वाट आणि खरा वाटाडय़ा सापडल्याशिवाय राहात नाही. ही खरी वाट कोणती, त्या वाटेवरचं खरं चालणं कोणतं, त्या वाटेनं चालून काय साध्य होतं आणि त्या वाटेचा खरा वाटाडय़ा कोण, हेच समर्थ कळकळीनं उलगडून दाखवताना म्हणतात की, ‘‘जगीं धन्य तो रामसूखें निवाला, कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली, मनोवासना रामरूपीं बुडाली!!’’ समर्थ सांगत आहेत की, रामसुखानं जो तृप्त झाला तोच या जगात धन्य आहे, त्याच्या कथांमध्ये जो तल्लीन झाला तोच धन्य आहे, ज्याचा देहभाव रामभावानं उडून गेला तोच धन्य आहे आणि ज्याच्या मनाचं हवं-नकोपण रामरूपातच लय पावलं, तो धन्य आहे! थोडक्यात खरी तृप्ती हवी असेल तर ती रामाच्याच भक्तीनं म्हणजेच रामाच्याच संयोगानं शक्य आहे, त्या भक्तीनं जे सुख प्राप्त होईल त्यानंच धन्यता लाभेल. जेव्हा मन त्या रामाच्याच कथा ऐकण्यात आणि सांगण्यात तल्लीन होईल तेव्हाच खरी धन्यता लाभेल.  मनाच्या समस्त इच्छा रामरूपातच लय पावतील.

– चैतन्य प्रेम

First Published on August 28, 2017 1:22 am

Web Title: goal of a human being
टॅग God