मत्सर किती हानीकारक आहे, हे जाणलं. आता प्रश्न असा की मत्सराच्या खोडय़ात आपण अडकू नये, यासाठी साधकानं काय करायला हवं? पहिली गोष्ट ही, की मत्सर हा इतका सूक्ष्म आहे की आपल्यात मत्सर उत्पन्न झाला आहे, हे सुरुवातीला लक्षातच येत नाही. कर्करोग जसा अगदी शेवटच्या टप्प्यावर उघड होतो ना, त्याप्रमाणे आपला मत्सरही सुरुवातीला जाणवतही नाही. समर्थही सांगतात की, ‘‘मत्सरें लाविलें वेढा ज्याचें त्याला कळेचिना।।’’ एखादा राजा बेफिकिर असला, गाफील असला तर शत्रूनं राज्याला वेढा घातल्याचं त्याला उमगतही नाही. राज्याला वेढा घालण्यात यश मिळवून शत्रूनं अर्धी लढाई जिंकली असते. त्या वेढय़ामुळे राज्याकडे येणारे रसदीचे सगळे मार्गच खुंटतात. तसं मत्सरानं आपल्याला कसा पुरता वेढा घातला आहे हे ‘मी’पणानं गाफील झालेल्या आपल्याला पटकन लक्षातच येत नाही. मत्सराचा हा वेढा इतका पक्का असतो की त्यामुळे सद्बुद्धी, सद्विचार, सद्कल्पनांची रसदच खुंटते! मत्सराविरुद्ध लढण्यापेक्षा त्याला शरणागत होऊनच, त्याचं मांडलिक होऊनच जगणं सुरू होतं! साधकांपुरता विचार केला तरी अनेक गोष्टी जाणवतील. आपल्याही अंतर्मनात डोकावून पाहू. सहसाधक किंवा गुरुबंधूंचे दोष आपल्याला दिसतात, ते खरंच दोष असतात की आपल्या मनाचंही खतपाणी त्यात मिसळलं असतं? आपल्यापेक्षा अधिक ‘ज्ञान’, आपल्यापेक्षा अधिक ‘अनुभव’ (इथे आध्यात्मिक साक्षात्कार या अर्थानं), आपल्यापेक्षा अधिक ‘साधना’ दुसऱ्याला साधत आहे, याचा आपल्याला आनंद होतो की विषाद वाटतो? तो जे ज्ञानाचं, त्याच्या अनुभवाचं, त्याच्या साधनेचं आणि त्यातून त्याला मिळत असलेल्या आनंदाचं वर्णन करीत आहे ते ऐकताना आपलं मन त्याला अनुकूल असतं की प्रतिकूल असतं? तो आनंद हा आपल्याला त्याचा भ्रम वाटतो का? त्याच्या या ‘आध्यात्मिक स्थिती’पेक्षा त्याच्यातले ‘दोष’ आपल्याला तीव्रतेनं जाणवत असतात का? इथं एक लक्षात घ्या. खरं ज्ञान, खरी साधना, खरा अनुभव हा त्या साधकाला झाला असेल, असं अभिप्रेत नाही. या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत, हे खरंच. तरीही साधनेत दुसऱ्याची या अर्थानं आपल्यापेक्षा अधिक प्रगती झाली असली तरी आपल्याला सुप्त मत्सर वाटतो का? तो खोटं सांगत आहे, असंच वाटतं असेल तर ते वाटण्यामागे मत्सराचा प्रभाव आहे का? तेव्हा सर्वसामान्य जगण्यात मत्सर पदोपदी मला कवेत घेतोच, पण साधनेच्या मार्गावरही मत्सराची ठिणगी मनात पडणं कठीण नसतं. तेव्हा साधकानं तर अतिशय सांभाळून स्वत:च्या मनातील भावावेगांचं निरीक्षण केलं पाहिजे. आता हा मत्सरभाव कमी कसा होईल? पहिली गोष्ट म्हणजे, माझ्या जीवनात मला जे काही मिळालं आहे ते माझ्या प्रारब्धानुसार आणि माझ्या प्रयत्नांनुसार, हे जर सत्य आहे तर मग दुसऱ्यालाही त्याच्या जीवनात जे काही मिळालं आहे त्याला त्याचं प्रारब्ध आणि त्याचे प्रयत्नच कारणीभूत आहेत, हे मला का उमगू नये? हे उमगलं तर मग मत्सराची गरजच काय? दुसऱ्याकडे मी दोषभावनेनं न पाहाता, मला त्याच्याकडून काय शिकण्यासारखं आहे, या भावनेनं पाहिलं, तर हरकत नाही. पण ते साधत नसेल, तर मग दुसऱ्याकडे पाहण्याऐवजी मी स्वत:कडेच अधिक काटेकोर लक्ष का देऊ नये? असं लक्ष जेव्हा द्यायला सुरुवात होईल तेव्हाच माझ्या मनातील चुकीच्या धारणा, कल्पना आणि विचारांबद्दल सजगता येऊ लागेल. आपण पत्ते खेळत असलो तर आपल्या हातात जे पत्ते आहेत त्यांनीच खेळावं लागतं. मग दुसऱ्याच्या हातातच चांगले पत्ते आहेत, या जाणिवेनं मत्सरग्रस्त होऊन आपण जिंकू का? तेव्हा मत्सरानं काही साधत नाही. वेळ आणि मानसिक शक्ती तेवढी वाया जाते, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
-चैतन्य प्रेम

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!