भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती ही सर्वोच्च स्थितीदर्शक मानली जाते. संत सर्वस्व भावानं परमात्म्यावर प्रेम करतात, ती आत्मनिवेदन भक्ती. आता हा सर्वस्व भाव जो आहे, तो आपल्याला शब्दानं माहीत आहे, स्थितीनं नव्हे! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवतो. एक जमीनदार होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानं आपल्या मुलाला स्वकर्तृत्वानं वाढवलं. मुलगा वयात आला तेव्हा त्याच्याशी बोलून त्यानं आपली सर्व मालमत्ता महाराजांना अर्पण करायचं ठरवलं. तसा कागदच तयार करून त्यानं मुलासमक्ष तो महाराजांच्या चरणी वाहिला. महाराजांनी तो वाचून मुलाकडे परत केला आणि म्हणाले, ‘‘बाळ, सारं काही रामाचं आहे या भावनेनं याचा सांभाळ कर. रामाला अर्पण करण्यासाठी कागदाची जरुरी नाही.’’ त्यानंतर काही र्वष गेली. जमीनदार थकला होता आणि रुग्णशय्येलाही खिळला होता. या दुखण्यातून काही आपण वाचत नाही, अशी त्याची खात्री झाली. त्यानं पुन्हा तसा कागद केला आणि महाराजांना कळकळीनं आपल्या घरी येण्यास विनवलं. श्रीमहाराज आले. त्यानं साऱ्या मालमत्तेचा कागद त्यांच्या हाती दिला. मी आजवर जे काही मिळवलं ते आता तुमच्या हवाली करीत आहे, असा रोख त्या पत्राचा होता. महाराजांनी तो कागद वाचून पाहिला आणि म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व काही दिलंत, पण ‘स्व’ दिलेला नाहीत! रामाला एकवेळ काही दिलं नाही तरी चालतं, पण ‘स्व’ द्यावाच लागतो. सर्व काही देऊन जर ‘स्व’ दिला नाही, तर उपयोग नाही आणि ‘स्व’ देऊन सर्व काही आपल्याकडेच ठेवलं तरी काही बिघडत नाही!’’ हा ‘स्व’ देण्याची कला शिकण्यासाठीच बहुधा तो जमीनदार त्या दुखण्यातून बरा झाला आणि दोन-तीन वर्षांत रामस्मरणात त्यानं आनंदात देह ठेवला. तर परमात्म्यावर सर्वस्व भावानं जे प्रेम करायचं आहे ते असं ‘स्व’जी जाणीवही नसलेलं प्रेम आहे. आणि खरं प्रेम, खरी भक्ती तेव्हाच साधते जेव्हा ‘मी’पणाचा लवलेशही उरत नाही. तेव्हा भक्तीपंथाची वाटचाल ही प्रथम आपल्या मनाचं देहबुद्धी पोसणारं, जपणारं बोलणं ऐकणं थांबवून संत काय सांगतात, ते ऐकण्यापासून सुरू होते. जे ऐकलं त्याची अंतर्मनात आवर्तनं करीत राहणं हे कीर्तन आहे. जगात वावरताना त्या बोधाचं क्षणभरही विस्मरण होऊ न देणं हे खरं स्मरण आहे. त्या बोधानुरूप, सद्गुरूंच्या वाटेवरून पायपीट करणं हे खरं पादसेवन आहे. या वाटचालीत जे काही संचित आहे, मग ते भौतिक असो की आध्यात्मिक असो ते मनानं सद्गुरूंना अर्पण करीत जाणं हे खरं अर्चन आहे. डावे-उजवे दोन्ही हात जोडल्यावर नमस्कार होतो. तसा मी बरा-वाईट कसाही असेन तुम्हाला शरण आहे, या भावानं ‘न मम आकार:’ या भावनेनं होणारा नमस्कार हे खरं वंदन आहे. मग उर्वरित जीवन हे त्यांच्या बोधानुरूप जगण्याच्या सेवेत घालवणं हे खरं दास्य आहे. त्यांनी जे सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीशी काया-वाचा आणि मनानं एकरूप होणं हे खरं सख्य आहे! जेव्हा अशी सद्गुरूंपासून कणमात्रही आणि क्षणमात्रही विभक्त न होणारी भक्ती साधते तेव्हाच सर्वस्व भावानं त्यांचंच होऊन राहणं होतं. ती सर्वोच्च स्थिती म्हणजे आत्मनिवेदन! तेव्हा आपल्याला सज्जनांच्या ज्या भक्तीपंथावरून जायचं आहे, तो भक्तीपंथ असा विराट आहे. ही वाटचाल संपूर्णपणे आंतरिक आहे. त्या अंतर्यात्रेनं आत्मनिवेदन स्थितीचं शिखर गाठायचं आहे. ही वाटचाल सोपी नाहीच, त्यासाठी प्रत्यक्ष आचरणाला कसं वळण लावावं, हे बिंबवण्यासाठी समर्थ सांगतात, ‘‘जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे।।’’ इथंही सर्व भावे आहेच, बरं का!

 

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

-चैतन्य प्रेम