श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘वृत्ती बनवणे म्हणजे परमार्थ!’’ आपली वृत्ती कशी आहे? तर ती भौतिक प्रपंचाकडे सहजपणे आहे. त्यामुळे आपल्याला प्रापंचिक गोष्टींमध्ये उपजत रस असतो. त्या गोष्टींच्या चर्चेत वेळ कसा जातो, ते उमगतही नाही. अगदी पोथी वाचायला कुणी कुणी बसतात आणि त्यातल्या एखाद्या ओवीच्या आधारावरही प्रापंचिक चर्चेचे निमित्त शोधतात! समर्थासारख्या संत-सत्पुरुषांची सहजवृत्ती मात्र अखंड परमात्म्याकडे असते. आपलीही वृत्ती त्यांच्याप्रमाणेच घडावी यासाठीच तर ते आपल्या मनाला हाताशी धरून त्याला वळण लावायचा अखंड प्रयत्न करतात. एक मेंढरू खड्डय़ात गेलं तर पाठोपाठ सर्वच मेंढरं डोळे झाकून खड्डय़ात जातात. त्यामुळे मेंढपाळाला त्या मेंढय़ांना काठीनं हाकत हाकत योग्य रस्त्यावर वळवत राहावं लागतं. श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’तील मनाचा प्रत्येक श्लोक जणू त्या काठीप्रमाणे आम्हां सर्वाना परमध्येयपथाकडे पुन:पुन्हा वळवीत आहे. आपली वृत्ती घडवायचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी प्रपंचाची आवड आणि शुद्ध परमार्थाची नावड, ही आजची वृत्ती प्रयत्नपूर्वक पालटावी लागेल. श्रीगोंदवलेकर महाराज यांची दोन वाक्यं आहेत. ते म्हणतात, ‘‘आपल्याला कृती करायची सवय आहे, वृत्ती बनवायची नाही’’ आणि ‘‘परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंच ही कृती आहे.’’ थोडक्यात प्रपंच करायला आपल्याला आवडतो, पण परमार्थाची वृत्ती घडवायची आणि भिनवायची आवड किंवा सवयही नाही. वृत्ती शुद्ध नाही म्हणून परमात्म प्राप्तीच्या खऱ्या इच्छेत, केवळ त्याच्याच धारणेत, ती धारणा ज्या योगे तयार होते त्या नामस्मरणात आणि नित्यनेमात आपला खरा विश्वासच नाही! परमार्थ नेमका कशासाठी हवा आहे? परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे काय? त्या साक्षात्कारानं नेमकं काय साधणार आहे? साधना का करायची? त्या साधनेतून नेमकं काय साधायचं आहे; या प्रश्नांची नीट उत्तरंही आपण जाणत नाही. त्यामुळे ना धड ठाम विश्वास जडतो, ना धड साधना ठामपणे होत, ना जे काही करतो त्यातून धड समाधान लाभतं! ‘‘मी इतकी र्वष इतका जप-बिप केला, पण माझी परिस्थिती काही पालटली नाही,’’ असं एका तरुणानं सहजभावानं सांगितलं. त्याला म्हटलं, ‘‘एकानं पोहोण्याची शिकवणी लावली. खूप दिवस पोहायला शिकल्यावर म्हणाला की, इतके दिवस पोहायला शिकतो आहे, पण एक रागसुद्धा धड गाता येत नाही,’’ अशी आपली गत आहे! चांगलं गाता यावं, ही इच्छा मनात ठेवून पोहोण्याची शिकवणी लावली आहे! प्रपंच चांगला व्हावा, ही इच्छा आहे आणि त्यासाठी जो त्रिगुणातीत आहे त्याची भक्ती करीत आहे! तेव्हा प्रथम दृष्टिपालटच झाला पाहिजे. मग हळूहळू वृत्तिपालट होऊ लागेल. वृत्तिपालट झाला की पारमार्थिक वृत्ती तयार होऊ लागेल. तिच्यावर विश्वास बसेल. या पालटाची अनोखी प्रक्रिया ‘मनोयोगा’च्या या दुसऱ्या टप्प्यात उलगडणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोका’तील ७७ व्या श्लोकात हा वृत्तिपालट आणि वृत्तिविश्वास कसा निर्माण होतो, याचं विवेचन आहे. हा श्लोक जणू पुढील १२८ श्लोकांचा पायाच आहे, म्हणा ना! कारण हा वृत्तिविश्वास निर्माण झाल्याशिवाय परमार्थात एकही पाऊल पडणं खरंतर कठीण आहे, असं समर्थ ७८ व्या श्लोकातच बजावतात आणि मग नामानं, कृतीनं, शुद्ध संवादानं, सत्संगानं, त्या सत्संगातून साधणाऱ्या नि:संगतेनं आणि खरा सद्गुरूसंग प्राप्त होताच सर्व संग सोडून त्याच्याच अनन्य आधारानं या मनाचंच सुमन आणि अमन कसं करता येतं, तो मार्ग प्रकाशित करतात. ‘श्रीमनाचे श्लोक’ अर्थात ‘मनोबोधा’च्या या विराट उत्तरार्धात आपण आता पाऊल टाकत आहोत!

-चैतन्य प्रेम