देह आहे म्हणून जगणं आहे, यात शंका नाही. पण हाच देह तारणारा जसा आहे तसाच तो गोवणारा, भोवणाराही आहे! अर्थात आपण मागेच पाहिलं की देह हा नुसता उपकरण मात्र आहे. देहाच्या इंद्रियांत मन मिसळल्यानंच देहभाव निर्माण झाला आहे. तेव्हा खरं तारणारं किंवा बुडवणारं आहे ते मनच. पण या मनालाच चुचकारत वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं देहाकडे बोट दाखवलं आहे! असो. मग हे जे देहभावानं जगणं आहे त्यात सत्य असं काय आहे? समर्थ विचारतात, ‘‘येथील येथें अवघेंचि राहातें। ऐसें प्रत्ययास येतें। कोण काये घेऊन जातें। सांगाना कां।।’’ (दासबोध, दशक १२ समास ८) . या जगात आपण जे काही मिळवतो ते इथंच राहातं. त्यातलं काहीही बरोबर नेता येत नाही. हे सर्वानाच अनुभवानंही माहीत आहे. तरीही मिळवण्याची, टिकवण्याची आस काही सुटत नाही. बरं तीही एकवेळ असू दे. भौतिक मिळवण्याचे प्रयत्नही करायला हरकत नाही, त्या प्रयत्नांनी जे मिळेल त्याचा उपभोग घ्यायलाही हरकत नाही, पण त्यातलं गुंतणं, त्याचाच आधार वाटणं, त्याच्याशिवाय जीवन निर्थक वाटणं, हे चुकीचं आहे. जे काही भौतिक मिळवू ते बरोबर येत नाही. मग बरोबर काय येतं? तर ती येते आंतरिक वासना, अपूर्ण इच्छा-अपेक्षांचं गाठोडं. या आंतरिक वासना अत्यंत सूक्ष्म असतात, पण त्या स्थूल अशा भौतिक जगाशीच जखडलेल्या असतात. त्यामुळेच या भौतिक जगाची आस कमी करण्यावरच सर्व संतांचा भर आहे. प्रपंचात, भौतिकात गुंतलेल्या, गुरफटलेल्या या मनाला सावध करून त्याला परमार्थाकडे नेण्यासाठीच तर मनोबोधाचे श्लोक अवतरले आहेत. त्यामुळे जगत असतानाच या जगण्यात सत्य काय आणि मिथ्या काय, याचा शोध घ्यायला समर्थासकट सर्वच संत सांगत आहेत. त्यासाठी आधी जगण्याकडे तरी बारकाईनं, दक्षतेनं, सावधतेनं पाहावं लागेल! पण आपली गत कशी असते? समर्थ सांगतात, ‘‘देश काळ वर्तमान। सर्व ही अवेवधान। कोणते विधी विधान। सावधान सावधान।।’’ देश, काळ कोणताही असू दे, वर्तमानातली परिस्थिती कशीही असू दे आपण सर्वत्र अव्यवधानानं जगत असतो. अर्थात आपलं लक्ष सर्वत्र विखुरलेलं असतं. व्यग्र असतं. एकाग्र नसतं. त्यामुळे सावधानता हीच खरी साधना आहे. विधीचं विधान म्हणजे प्रारब्धाचा प्रभाव बदलण्याचं तेच एकमेव माध्यम आहे. पण माणसाला हे उमगत नाही आणि रुचत तर त्याहून नाही.. ‘‘मनास लागली सवें। विधी विधान तें नव्हे। चुकोन होत जातसे। जनांस घात होतसे।।’’ मनास सवे म्हणजे सवय अशी लागली आहे की ते सावधान राहातच नाही. त्यामुळे वागू नये ते वागण्याची, बोलू नये ते बोलण्याची, करू नये ते करण्याची चूक सतत होते आणि त्यामुळे आत्मघातच होतो. त्यासाठी जगण्यातल्या सत्य आणि मिथ्यत्वाकडे लक्ष दिलंच पाहिजे. त्यासाठी जगण्यातच सावधानता पाहिजे. समर्थ सांगतात, ‘‘प्रपंचीं जो सावधान। तो परमार्थ करील जाण। प्रपंचीं जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।’’ जो प्रपंच सावधतेनं करतो, अर्थात जेवढा जरूर आहे तेवढाच प्रपंच करतो तोच परमार्थ करू शकतो. नाहीतर दिवसाचे चोवीस तास देऊनही प्रपंच पुरा होणार नाही, मग परमार्थासाठी वेळ कुठून देता येणार? तर जो प्रपंचातल्या कर्तव्यांसाठी आवश्यक तेवढाच वेळ देतो त्याचा प्रपंच हा प्रमाणात राहातो. प्रपंचात मन, बुद्धी, चित्त किती प्रमाणात जुंपलं पाहिजे, या प्रमाणाचं भान ज्याला उरत नाही त्यानं परमार्थाचं कितीही नाटक केलं तरी त्याचा परमार्थ खोटाच असतो. नव्हे, परमार्थाच्या नावावर तो प्रपंचच करत असतो. परमार्थाच्या जिवावर प्रपंचातल्या अडचणी सोडवण्याची धडपड करत असतो!
– चैतन्य प्रेम

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
summer
सुसह्य उन्हाळा!
pune, Summer, Heat, Affects, fruit Vegetable, Prices, Potato, Peas, prices Up, Garlic, Cucumber, marathi news,
उन्हाळा वाढला, फळभाज्यांचे दरही वाढले