अरब आक्रमक हे सुसंस्कृत आणि ज्ञानपरंपरांची बूज राखणारेच नव्हे तर त्यांच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी कसे आग्रही होते, याचे तपशीलवार वर्णन सर मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांच्या ‘हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ या ग्रंथात केले आहे. भारतात आलेल्या मोगल आक्रमकांबद्दल लिहिताना मात्र ते नकळतपणे सांगतात की, ‘‘ऐहिक विलासाने अवनत झालेल्या इराण व मध्य आशियातील रानटी अनुयायांनीच हिंदुस्थानच्या भूमीवर आपला ध्वज रोवला, क्रांतिकारक अरबांनी नव्हे!’’ याच रानटी टोळ्यांनी महम्मदांच्या संस्मरणीय अरबी साम्राज्याचा विनाश केला होता, असंही सर रॉय नमूद करतात. समर्थानीही देशभ्रमण केलं त्यात या रानटीपणाच्या खुणा जागोजाग दिसल्या. अनेकानेक मोगल आक्रमकांनी अनेक ठिकाणी घडविलेला विध्वंस, अनाचार, अत्याचार त्यांनी टिपला. अनेक ठिकाणी मंदिरं पाडली गेली होती, काही ठिकाणी तर ‘काफिर’ कैद्यांची अडगळ वाटून त्यांच्या कत्तली झाल्या होत्या. एका बाजूला हा विध्वंस पाहत असतानाच आपल्याच माणसांचं खचलेलं मनोबल आणि त्याच जोडीला वाढत असलेली स्वार्थलोलुपता, मत्सर परायणताही त्यांनी पाहिली. धर्माबाबतच्या चुकीच्या कल्पना, साधनेबाबतचं चुकीचं आकलन, अनास्था, आळस आणि सुस्तावलेपण, हे सारं त्यांनी पाहिलं. भक्तीचा डिंडिम वाजत आहे, पण खरा देव शोधायची इच्छाच कुणात उरलेली नाही.. ‘‘कोणकोणासि सांगावें। सर्वही भ्रांत जाहले। भ्रांत देवाळयासाठीं। देवची सांडिती जनीं।।’’ ही अवस्था होती. ‘‘मोडली जीर्ण देवाल्यें। तेंचि लोकांसि मानती। भांडती देवळासाठीं। देव चुकोनि राहिला।।’’ देवाऐवजी देवळाकडे जास्त लक्ष होतं.. आत्मस्वरूपाऐवजी बाह्य़ आवरणाकडे जास्त लक्ष होतं.. या बाह्य़ आवरणासाठीच लोक झुंजत होते आणि त्यात खऱ्या आत्मस्वरूपाचं भान पूर्णपणे लोपलं होतं. त्यामुळे या समाजाला भानावर आणण्यासाठी ‘‘देहदेवालयामध्यें। पाहणें देव तो बरा।’’ हे सांगणं आवश्यक होतं. आकारात अडकू नका, आतमध्ये वळा, हे सांगणं आवश्यक होतं. तुमचा देहच देवालय आहे, त्यातल्या देवाला ओळखा, हे शिकवणं आवश्यक होतं. आता आजही आपल्याला वाटतं की या देहरूपी देवालयात देव आहे, मग तो दिसत का नाही? उत्तर अगदी सोपं आहे. देवळाभोवती घिरटय़ा घातल्या, पण आत पाऊलही टाकलं नाही, तर देवाची मूर्ती दिसेल का? अगदी त्याचप्रमाणे देहाच्या आवरणालाच चिकटून जन्म घालवला तर अंतरंगातील देवाला कसं पाहता येईल? त्यासाठी देहबुद्धी घालवून आत्मबुद्धी जागी करणं आवश्यक असतं. ती कला शिकवणाऱ्या सद्गुरूचा संग आवश्यक असतो. कारण याच देहात देव असूनही देहबुद्धीमुळे वासना आणि विकारांच्या जाळ्यात सापडून आपल्या अंतरंगात असुरच विराजमान झाला आहे. दशमुखी रावणाप्रमाणे दशेंद्रियांचा रावण या हृदयावर राज्य करीत आहे. मग देहातल्या देवाचं दर्शन कसं शक्य आहे? त्यासाठी आसुरी शक्ती नष्ट करून आपल्यातलं देवत्व, दिव्यत्व जागं करण्याची गरज आहे. ते जागं करायचं तर ज्या मनात वासना विकारांचं थैमान आहे त्याच मनाला हाताशी धरावं लागतं. म्हणूनच समर्थानी मनोबोधाचे श्लोक अवतरित केले.
सर्वसामान्य माणूस मनाच्याच कलानं वागत आणि वावरत असला तरी त्याला त्याची प्रत्यक्ष जाणीव असतेच, असं नाही. साधकाला मात्र साधनेतही मनच किती विक्षेप आणि व्यत्यय आणत असतं, ते उमगत असतं. म्हणूनच ज्यांना साधनामार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करायची आहे, अशा साधकांसाठी हा प्रत्येक श्लोक म्हणजे जणू वाटेवरला दीपस्तंभ आहे.

– चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी