आपल्या हाडीमांसी खिळलेला अहंभाव सोडता येणं, हे स्वबळावर अशक्यच असलं तरी तशी इच्छा मात्र हवी. ‘इच्छा तिथं मार्ग’, असं म्हणतातच ना? मग त्या इच्छेनुसार आपल्या कृतीकडे लक्ष देणं हा पहिला अभ्यास आहे. एकदा का आपल्या कृतीकडे आपण बारकाईनं लक्ष देऊ  लागलो ना, की त्या कृतीत अहंभाव किती भरून आहे, याची जाणीव होऊ  लागेल. मग वाचिक दोष टाळण्यासाठी प्रथम परनिंदा आणि आत्मस्तुती या गोष्टी थांबवाव्या लागतील. दुसऱ्याच्या भाषिक, वैचारिक आणि बौद्धिक आकलनावरून त्याला कमी लेखणं किंवा त्याची थट्टा करणं, ही नकळत होणारी परनिंदा मोठी हीन आणि घातक आहे. त्याचबरोबर दुसरा कसा चुकत आहे, याबद्दल चवीनं गप्पा मारण्यातूनही मोठी परनिंदा सुरू होते. तेव्हा परनिंदेची आवड प्रथम सोडली पाहिजे. आपण दुसऱ्याची यथेच्छ निंदा किंवा टवाळी करतो तेव्हा आपण जणू संपूर्ण दोषमुक्त आहोत, सद्गुणांनी युक्त आहोत, असं मानत असतो. ‘गुरुचालिसे’त म्हटलं आहे की, ‘‘अस एकहु गुन मोरे नाही, जेंही तोषवु गुरूवर तोहीं कांहीं!’’ म्हणजे हे सद्गुरो, माझ्यात असा एकही गुण नाही, की ज्यायोगे तू संतुष्ट होशील! यावर श्रीसद्गुरू म्हणाले की, ‘‘याचा अर्थ आपल्यात गुण नाहीत, असं नाही, पण असा एकही गुण नाही जो अध्यात्म मार्गात आपल्याला पुढे नेईल!’’ म्हणजे काय? तर एक जरी गुण आपल्यात असला की त्याच्या बळावर लगेच अहंकार फोफावू लागतो. मग दुसऱ्यात जर तो गुण नसला तर त्याची निंदा करायचा अधिकार जणू आपल्याला लाभला आहे, या तोऱ्यात परनिंदा सुरू होते. मग तो गुण म्हणावा की अवगुण? तेव्हा एकदा का परनिंदेची आवड सुटत गेली की आत्मस्तुतीची आवडही कशी हास्यास्पद आहे, हे उमगू लागतं. वाचिक दोष लक्षात आला, की मग कृतीतल्या दोषांकडे हळूहळू लक्ष जातं. वागण्या-बोलण्यातले हे दोष दूर करण्याचा राजमार्ग समर्थ सांगतात. तो म्हणजे, ‘‘जनीं बोलण्यासारिखें आचरावें!’’ याचे दोन अर्थ आहेत. पहिला म्हणजे संतजनांमध्ये जसं बोलतोस तसं वागायला लाग आणि दुसरा अर्थ म्हणजे संतजन जसं सांगतात तसं आचरण सुरू कर! वाचिक दोष दूर करण्याचा उपाय म्हणजे मौनाचा अभ्यास आणि कृतीतले दोष टाळण्याचा उपाय म्हणजे जे बोलू ते सगळं आचरणात आणण्यावर भर देणं. मौनाचा अभ्यास मागेच सांगितला होता. त्यानुसार काहीही बोलण्याआधी हे बोललंच पाहिजे का, याचा बोलण्याआधी विचार करणं! एकदा असा विचार सुरू झाला, की मग निम्मं बोलणं आपोआप संपेल. समजा, आपल्यासमोर एखाद्याची निंदा सुरू असेल तर पूर्वी आपण त्यात नकळत सामील व्हायचो आणि मोठय़ा चवीनं त्यात भर घालायचो. मौनाचा अभ्यास सुरू झाला, की मग या अशा हीन आणि निर्थक निंदेनं काय साध्य होणार आहे, हा विचार मनात प्रथम येईल. मग वेळ तसंच मानसिक आणि वाचिक क्षमता वाया घालविणाऱ्या या परनिंदेतली गोडी आटू लागेल. दुसऱ्यापेक्षा आपल्यातच असलेले दोष दिसू लागतील आणि ते कधी दूर होतात, ही तळमळ लागेल. मग प्रत्यक्ष कृतीतले दोषही जाणवू लागतील आणि आपल्या कृतीला अहंकाराचा स्पर्श नसावा, अशी इच्छाही तीव्र होईल.

      – चैतन्य प्रेम