04 March 2021

News Flash

६४. कीर्ती

याचा प्रचलित अर्थ असा की- हे मना, जन्मभर अशी सत्क्रिया करावी की देहत्यागानंतर लोक आपली कीर्तिच गातील.

सद्गुरू बोधाचं अवधान बाळगून जगताना वृत्ती आपोआप अशी घडत जाईल आणि साधकाचं मन इतकं शांत होत जाईल की सहवासात येणाऱ्यांची मनंही शांतीचा अनुभव घेतील. हे ध्येय मात्र नाही! ही सहज स्थिती आहे. याहीपुढची महत्त्वाची स्थिती कोणती, हे समर्थानी मनोबोधाच्या पुढच्या आठव्या श्लोकात सांगितलं आहे. समर्थ म्हणतात :
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें।
परी अंतरीं सज्जना नीववावें।। ८।।
याचा प्रचलित अर्थ असा की- हे मना, जन्मभर अशी सत्क्रिया करावी की देहत्यागानंतर लोक आपली कीर्तिच गातील. स्वत: काया, वाचा आणि मनाने परकार्यार्थ चंदनासारखं झिजून सज्जनांचे अंत:करण तोषव, संतुष्ट कर.
या श्लोकात साधकाच्या जीवनाचा एक मोठा अभ्यास सांगितला आहे आणि शेवटच्या चरणातील ‘परी’ या शब्दांतून अगदी ठामपणे सांगितलंय की, सारं काही कर, पण सज्जनांचं अंत:करण दुखावेल असं एकही कृत्य काया, वाचा, मनानं करू नकोस! या श्लोकाचा मननार्थ आता पाहू.
माणूस दुसऱ्यांसाठी अनेक गोष्टी करतो. त्यामागे त्याचा एक हेतू, दुसऱ्यानं आपल्या कृत्यांची जाण ठेवावी, आपली स्तुती करावी आणि आपल्याला गरज पडेल तर मदत करावी, असा असतो. साधनपथावर आल्यावर मन अधिकच हळवं होऊ लागतं. त्यामुळे दुसऱ्याच्या दु:खानं आपणही हेलावतो. त्याला मदत करायला सरसावतो. या टप्प्यावर एक सूक्ष्म धोकाही असतो. आपलं मन साधनेनं हळवं होतं त्याचं खरं कारण अंत:करणाला भक्तीसाठीची भावतन्मयता साधावी, हे असतं. अंत:करणातील भावतन्मयतेचा हा प्रवाह जगाशी तन्मय होण्यातून भवगाळात आणखी रूतण्याचा धोकाही बळावतो! ते पटकन लक्षात मात्र येत नाही. तेव्हा साधना सुरू झाल्यावर माणूस दुसऱ्यासाठी जे काही करतो त्यामागे निस्वार्थीपणाचा आभास असतो. एक खरं, अनेकदा दुसऱ्याकडून साधकाला काही हवंसं वाटत नाही, पण त्याच्याकडून स्तुती मात्र हवीशी वाटते. अशा साधकाला सावध करताना समर्थ म्हणूनच बजावतात.. देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी।। कीर्ती हा शब्द आपल्याला पूर्ण परिचयाचा वाटतो, पण त्याचा खरा अर्थ लक्षात येत नाही. चंदन उगाळल्यावर त्याचा जो सुगंध दरवळतो, त्याला कीर्ती म्हणतात! थोडक्यात चंदनाचं खोड पूर्ण पडून असलं तरी तसा सुगंध दरवळत नाही, जो ते उगाळल्यावर दरवळू लागतो. याचाच अर्थ चंदन झिजू लागतं तेव्हाच कीर्ती दरवळते! तसा माणसानं देह ठेवल्यावर जर त्याच्या सत्कृत्यांच्या आठवणी लोकांच्या मनात दरवळू लागल्या तरच त्याला कीर्ती म्हणता येईल. आपल्याला वाटतं जिवंतपणीच जो नावलौकिक होतो तो म्हणजे कीर्ती! ती कीर्ती नव्हे, हे सांगताना समर्थ सांगतात की हे मना जन्मभर कर्म कर, पण कसं? सज्जनांच्या सांगण्यानुसार, सद्गुरूंच्या बोधानुसार! त्या चौकटीबाहेर जाऊन कर्माच्या ओढीत अडकू नकोस. सद्गुरूंनी आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेबाहेर पाऊल टाकलंस तर दशेंद्रियरूपी जगओढीचा रावण अंतरंगातील भक्तीभावाचं तात्काळ हरण करील! थोडक्यात आपण जे काही करीत आहोत त्याबाबतची स्तुती आपल्या कानांनी ऐकायची नाही. स्वस्तुती करायची नाही. श्रीगोंदवलेकर महाराजांनीही असंच सांगितलं आहे की, साधकानं आपली स्तुती आपल्या कानांनी ऐकायला थांबूही नये! जो सद्गुरूंच्या आज्ञेनुसार जगतो त्याचं प्रत्येक कर्म हे तो गेल्यावरही अनंतकाळ लोकांच्या मनात दरवळत राहातं.
-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2016 1:07 am

Web Title: positive attitude of living
टॅग : God,Live
Next Stories
1 ६३. नम्र वाचा झ्र् २
2 ६३. नम्र वाचा..
3 ६१. अंतर्बा त्याग : २
Just Now!
X