News Flash

५४. षट्विकारदर्शन : लोभ-मोह

मत्सरानंतर दंभाकडे वळण्याआधी लोभ आणि मोह या विकारांचा आपण मागोवा घेणार आहोत.

मत्सरानंतर दंभाकडे वळण्याआधी लोभ आणि मोह या विकारांचा आपण मागोवा घेणार आहोत. हे विकार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिक अचूकतेनं सांगायचं तर हे सहाही विकार परस्परांतूनच उत्पन्न होणारे, परस्परांवर अवलंबून असणारे आणि परस्परांना जोपासणारेच आहेत. लोभ आणि मोहापुरतं बोलायचं तर ज्या ज्या गोष्टींचा लोभ वाटतो, त्या त्या गोष्टींचा मोहही असतोच आणि ज्या ज्या गोष्टींचा मोह वाटतो, त्या त्या गोष्टींचा लोभही असतोच. समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात या लोभ-मोहाचं वर्णन ‘प्रपंच’ म्हणून केलं आहे. समर्थ म्हणतात, ‘‘प्रपंच साहवा वैरी परत्र अंतरी दुरीं। अवघा तोचि तो जाला तेणें देव दुरावला।।’’ हा जो प्रपंच आहे तो अंतरंगातून परमतत्त्वाला दूर करीत असतो. ‘अवघा तोचि तो जाला’ हा प्रपंच अवघं जीवन व्यापून टाकतो, जीवनसर्वस्व होतो. या प्रपंचाशिवाय मनाला, चित्ताला, बुद्धीला दुसरं स्फुरणच उरत नाही. दुसरा विचारच शिवत नाही. दुसरी कल्पनाच करवत नाही. दुसरं चिंतनच भावत नाही. त्यामुळे त्या परमतत्त्वाचा विचार, चिंतन, मनन दुरावतं. हा प्रपंच तरी कसा आहे? समर्थाच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘‘ प्रपंच शेवटीं कैंचा गेल्या देहेच हातिंचा।।’’ हा प्रपंच या देहाला चिकटून आहे, देहबुद्धीचाच पसारा आहे आणि हा जो देह आहे तोही कसा आहे? हा देह जाणाराच आहे आणि त्या देहाबरोबरच देहाचा हा प्रपंचही संपणारच आहे! देह आहे तोवर हा देह ज्या सामाजिक, आर्थिक पातळीवर जन्मला आणि जगत आहे त्या पातळीचा मान त्या देहाला आहे. त्या पातळीचा प्रपंच त्या देहाला आहे. नंतर? ‘यात्रा’ या माझ्या कादंबरीत अनेकानेक व्यक्तिरेखा आहेत. त्यातलीच एक व्यक्तिरेखा आहे एका तांत्रिकाची आणि त्याचा चेला चरण याची. एका पोरक्या पोराला या तांत्रिकानं चेला म्हणूनच वाढवलंय आणि त्याचं नाव ठेवलंय कालिचरणदास अर्थात चरण. या कादंबरीच्या ‘स्मशानशाळा’ या प्रकरणातला एक प्रसंग आहे. तो असा :
एकदा एका मोठय़ा सरदाराची अंत्ययात्रा आली. जिथे तिथे वैभव आणि शानशौकतचं प्रदर्शन अंत्ययात्रेतही होतं. शेवटी प्रेताला अग्नी दिला गेला. सारे निघून गेल्यावर धगधगत्या चितेजवळ गुरुनं चरणला नेलं. म्हणाले- ‘‘पाहा चरण – ही चिता पाहा. एका सरदाराची. त्याला जाळणारी लाकडं चंदनाची आहेत. तुपाचा खरपूस वास आताही दरवळतोय. त्याच्या जवळची साध्या लाकडाची चिता पाहा. एका निर्धन शेतकऱ्याची. पण लाकडं साधी असोत की चंदनाची शेवटी आग तीच ना? एक सरदार असेल, एक शेतकरी, पण शेवटी मढं ते मढंच ना? दोघांच्या अस्थी त्याच. कवटीचं तडकणं तसंच. ही चिता दोघांची शान एका पातळीवर आणते. म्हणून हे सम-शान!!
तर देह आहे तोवर त्या देहाच्या अनुरूप देहाचा प्रपंच आहे. त्या देहाचे मान-अपमान आहेत. त्या देहाची स्तुती-निंदा आहे, त्या देहाचं यश-अपयश आहे, त्या देहाची लाभ-हानी आहे. तो देह गेला की प्रपंच परिघाचा केंद्रबिंदूच गेला. मग कुठला मान-अपमान, कुठली लाभ-हानी, कुठलं यश-अपयश? मग अशाश्वत देहाच्या आधारावर जन्मभर जो प्रपंच सुरू आहे तो शाश्वत कसा होईल? शाश्वत सुख देणारा कसा होईल? त्यात शाश्वत यश कसं मिळेल? समर्थही सांगतात, ‘‘अपेशीं सदाचा जाला मायाजाळेंचि भुलला। आपुलें मानिलें जें जें तें तें सर्वत्र राहिलें।।’’ मायेमुळे लोभ-मोहात भुलून जीव सदा अपयशाचा धनी मात्र झाला. जे जे आपलं मानलं ते ते सर्वकाही इथंच सोडून जावं लागलं! लोभ आणि मोहाचा ठसा सोडला तर, त्यातलं काहीही बरोबर आलं नाही!!

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 3:52 am

Web Title: ramdas swami philosophy 17
Next Stories
1 ५३. षट्विकारदर्शन : मत्सर – २
2 ५२. षट्विकारदर्शन : मत्सर – १
3 ५१. षट्विकारदर्शन : मद – २
Just Now!
X