‘श्री मनाचे श्लोकां’ची जन्मकथा लक्षात घेतल्याशिवाय त्या श्लोकांचा हेतू, त्यांचा रोख आणि त्यांचा गूढार्थ लक्षात येणार नाही. ही कथा अशी सांगतात..
श्री क्षेत्र चाफळ! समर्थ रामदास स्वामी तिथं रामनवमीचा उत्सव दरवर्षी मोठय़ा भक्तिप्रेमानं साजरा करीत. छत्रपती शिवाजी महाराजांकडूनही या उत्सवासाठी धनधान्य येत असे. या निसरडय़ा कडय़ावरून जाताना आपल्या शिष्यांना सांभाळण्याची गरज मग समर्थाना जाणवली. कारण एकदा राजाश्रय प्राप्त झाला की, त्या आधाराचा प्रभाव आणि पगडा मनावर पडल्याशिवाय राहत नाही! राजाच पाठीशी आहे तर मग चिंता कसली, ही वृत्ती बनते. मग भगवंताच्या आधारापेक्षा भौतिकाचा आधार अधिक आश्वासक वाटू लागतो! शाश्वत आत्मकल्याणाच्या ओढीनं आपल्याकडे आलेल्या शिष्यांच्या मनात अशाश्वत भौतिकाचा आधार निर्माण होणं सद्गुरूला शिष्यांच्या मनात अशाश्वत भौतिकाचा आधार निर्माण होणं सद्गुरूला कसं रुचेल? शिष्यांच्या मनात भौतिक सुखाधीनतेचं तण माजलं असेल तर शुद्ध ज्ञानाचं बी पेरूनही आत्मसुखाचं खरं पीक येणं नाही! का ते उत्तम बीज परी समंध। खडकेंसी पाडिला।।’ (दासबोध, दशक ५) अशी गत व्हायची! म्हणजे बी उत्तम आहे, पण ते खडकाळ, दगडगोटय़ांनी भरलेल्या, तण माजलेल्या जमिनीत पेरून काही उपयोग नाही! आपल्या शिष्यांच्या मनात भौतिक आधाराचं तण माजू नये म्हणून समर्थानीच एक लीला केली.
एका उत्सवाआधी ठरलेल्या मुदतीत महाराजांकडून धनधान्य पोहोचू शकलं नाही. आता उत्सवाचं काय होणार, या चिंतेचा ज्वालामुखी शिष्यांच्या मनात उसळला. समर्थापर्यंत ही चिंता गेली, ते हसून म्हणाले, ‘ज्याचा उत्सव आहे तो पाहील!’ चिंता नव्हती ती एकाच शिष्याला.. कल्याण स्वामींना! ‘सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण। अनन्यभावे शरण।।’ असं सद्शिष्याचं एक लक्षण ‘दासबोधा’च्या पाचव्या दशकात सांगितलंय. तसे कल्याण स्वामी होते. समर्थानी एके रात्री त्यांना बोलावून घेतलं आणि आज्ञा केली.. ‘लिहून घे!’
रात्रीचा तो नीरव प्रहर. समर्थाच्या घनगंभीर विरक्त पण मनुष्य मात्राच्या मुक्तीसाठी कारुण्य भावानं ओथंबलेल्या स्वरापाठोपाठ बोरूतून अवतरत असलेल्या अक्षर पावलांचाच काय तो आवाज!
‘श्रीमनाचे श्लोक’ असे जन्मले!! एकापाठोपाठ एक असे दोनशे पाच श्लोक समर्थानी सांगितले आणि कल्याणानं लिहिले. मग त्याच रात्री त्याच्या प्रती काढल्या गेल्या. शिष्यांमध्ये वाटल्या गेल्या. भल्या पहाटे घराघराबाहेर खडय़ा आवाजात ते श्लोक शिष्यांच्या मुखातून निनादले.. त्या श्लोकांनी निद्रिस्त मनं जागी झाली.. धनधान्याची भिक्षा झोळीत पडू लागली. नेहमीपेक्षा अधिक शिधा जमला आणि पाठोपाठ महाराजांकडूनही धनधान्य आलंच! त्या वर्षीचा उत्सव अधिकच थाटात झाला, कारण जन्म केवळ श्रीरामांचा नव्हता तर श्रीसद्गुरू मयना शिकविणाऱ्या ‘श्री मनाचे श्लोकां’चाही होता! खरा सत्संग आणि खरी नि:संगता शिकविणाऱ्या दिव्य स्तोत्राचा होता!!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramnavmi celebrations
First published on: 05-01-2016 at 01:29 IST