News Flash

२०५. बोले तैसा चाले..

सदा बोलण्यासारिखें चालताहे।

स्वरूपस्थ राहणे, याच खऱ्या स्वधर्माचे संस्कार सद्गुरू करीत असतात आणि स्वरूपाची खरी ओळख नसताना साधकानं त्यांच्या बोधात स्थित राहाणं हीच स्वरूप-स्थ होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे! तो बोध दुसऱ्याला सांगण्यासाठी ऐकायचा नाही, तर त्यानुसार आचरण घडविण्याचा अविरत अभ्यास करायचा आहे! मनोबोधाच्या पुढील म्हणजे ४९व्या श्लोकाचा प्रारंभच या विचाराने आहे. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

सदा बोलण्यासारिखें चालताहे।

अनेकीं सदा येक देवासि पाहे।

सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।४९।।

प्रचलित अर्थ : तो बोलतो तसाच चालतो, अनेक देवांत तो एका मुख्य देवालाच पाहात असतो. पूर्ण भ्रमातीत असून तो सगुणाची भक्ती प्रेमपूर्वक करीत असतो.

आता मननार्थाकडे वळू. ‘तो जसं बोलतो तसंच वागतो,’ हा इथं विशेष गुण सांगितला आहे. आणि यात एक मेखही आहे. नुसतं जसं बोलतो तसं वागणं पुरेसं नाही. त्याचं कौतुक नाही. कारण एखादा म्हणेल, मी अमक्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जन्मभर बदला घेण्यासाठीच वागत राहील, तर तो गुण नव्हे! तेव्हा सद्गुरू बोलतात ते कसं? तर ‘सदा रामनामें वदे नित्य वाचा।’ त्यांची वाणी अखंड शाश्वताशीच जोडली असते. शाश्वताचाच उच्चार ते करतात आणि मग सदा बोलण्यासारिखें चालताहे। म्हणजे, शाश्वताचाच उच्चार करतात आणि त्या शाश्वताशी सुसंगत असंच ते वागतात! श्रीनिसर्गदत्त महाराज यांचे भावतन्मय सुपुत्र चित्तरंजन यांना मी एकदा विचारलं की आपले वडील फार विलक्षण आहेत, हे तुम्हाला कधी जाणवलं? त्यांनी सांगितलं की, लहानपणी आई गेली. आम्ही मुलं रडू लागलो, तेव्हा बाबांनी आम्हाला जवळ घेतलं आणि म्हणाले, ‘‘ती गेली आहे. आता रडून काय उपयोग? संध्याकाळी लोक येतील तेव्हा थोडंसं रडा!’’ मग म्हणाले बाबा दुकानाबाहेरच्या फळीवर जाऊन बसले. दुकान बंद होतं. तोच एकजण आला आणि महाराजांना त्यानं एक मोठा तात्त्विक प्रश्न विचारला. महाराज त्याचं उत्तर देऊ लागले. कितीतरी वेळ महाराजांनी फार गहन तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत त्याला सांगितलं. तो जायला निघाला तेव्हा त्याला विचारलं, ‘‘संध्याकाळी काही काम आहे का?’’ तो म्हणाला, नाही. त्यावर महाराजांनी संध्याकाळी वेळ असेल तर या, पत्नीची अंत्ययात्रा आहे, असं सांगितलं! तो माणूस आश्चर्यचकित झाला की संपूर्ण बोलण्यात महाराजांच्या चेहऱ्यावर घरात असं काही झालं आहे, याची पुसटशी छायाही नव्हती. चित्तरंजन म्हणाले, तेव्हा आम्हाला त्या वयातही वडिलांचं वेगळेपण जाणवलं! तेव्हा नुसतं उंचच उंच बोलणं सोपं आहे हो.. पण प्रत्यक्ष वागण्यातही ती उंची आली पाहिजे ना? रामकृष्ण परमहंस म्हणत की गिधाडं उडतात खूप उंच, पण सगळं लक्ष असतं ते जमिनीवर कुठं सडकं प्रेत पडलंय का त्याकडे! तसं उच्च पातळीवर बोलत असूनही लक्ष जर अगदी हीन सडक्या पातळीवरच असेल तर त्याचा काय उपयोग? सद्गुरूंच्या जीवनात जसा उच्चार तसाच आचार, हे पदोपदी दिसून येतं. कोणत्याही क्षणी ते भौतिक मायेच्या पकडीत येत नाहीत. बोलताना अंतरंगातली त्यांची धारण कधीही सुटत नाही. मुखानं शाश्वताचाच उच्चार असतो आणि जगणंही शाश्वताच्याच प्रकाशात असतं. तसं साधकाचं जीवनही घडावं, हीच त्यांना आस असते.

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:04 am

Web Title: samarth ramdas philosophy 106
Next Stories
1 २०४. त्रिवेणी संगम
2 २०३. स्वधर्म-संस्कार : ३
3 २०२. स्वधर्म-संस्कार : २
Just Now!
X