ऐन तारुण्यात देवाधर्माला लागून देहधर्माला तिलांजली देणं, हा वेडेपणा नाही का, असा मुख्य प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. थोडक्यात तारुण्यात माणूस देहपिसा झालेला चालतो, ते स्वाभाविक-नैसर्गिक वाटतं, पण तो देवपिसा होणं अस्वाभाविक वाटतं! आणि हे सर्वकाळी घडतं! ‘‘सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी,’’ असं समर्थ सांगतात, पण ‘‘मुखे बोलिल्यासारिखें चालताहे।’’ (मनाचे श्लोक १८२) हा श्रीसद्गुरूंचा सहज स्वभाव असल्यानं समर्थानीही तारुण्यकाळी ‘अरण्य सेवन’ केलं होतंच! वयाच्या बाराव्या वर्षांपासून नाशिकलगतच्या टाकळीत समर्थ तपस्थ होते. तेथे वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत म्हणजे तब्बल १२ वर्षे त्यांनी तपाचरण केलं. मग पुढील चार वर्षे देशाटन केलं. त्यांचं हे ‘देवपिसे’पण त्याकाळीही कुठं मंजूर होतं? समर्थकृपांकित श्री शंकरराव देव यांनी ‘श्रीसमर्थावतार’ (ढवळे प्रकाशन) या ग्रंथात टाकळी मठातील एका बाडातला अप्रकाशित अभंग नोंदला आहे. समर्थाचं ऐन तारुण्यातलं तपाचरण पाहून प्रापंचिक लोकांना काय वाटत होतं, ते या अभंगातून दिसतं. अभंग असा आहे :

‘‘विषयांची सोयरीं प्रपंचाचीं सखीं। मिळोनि येकमेकीं करिती मात।। १।।’’ प्रपंच विषयांचीच गोडी असलेले जे सखेसोयरे आहेत ते एकमेकांत अशा गोष्टी करीत आहेत की, ‘‘यासी काय जालें धडचि का विघडलें। वयेवीण लागलें देवपीसें।। २।।’’ याला झालंय तरी काय? सगळं धड असताना आणि वय झालं नसताना देवाचं पीसं, देवाचं प्रेम लागण्याचा बिघाड का झालाय? ‘‘देव काय आम्हां सकळांपासीं नसे। जनावेगळें कैसें भजन याचें।। ३।।’’ आम्ही काय देवाचं करीत नाही का? देव काय आमच्यापासून दूर का आहे? मग आमच्यासारखं जमेल तितपत भजन-पूजन करायचं सोडून ही कसली भक्ती आहे याची? मग यावर तर्क काय करतात.. ‘‘यासी कोण्ही मोहाचें वडिलधारें नाहीं। म्हणउनियां पाहीं छंद करी।। ५।।’’ समर्थ टाकळीस एकटेच राहात होते ना? तर म्हणतात, याच्यावर लक्ष ठेवणारं कोणी वडीलधारं नाही ना, म्हणून हा भक्तीचा छंद चाललाय. आता त्यापुढे पाऊल टाकत म्हणतात, ‘‘न करवे म्हणउनि तजिला विषयधंदा। जल्पतसे सदा रामनाम।। ६।। रामी रामदास पिसाळलें माय। म्हणौनि मोकली धाय विषयजनु।। ७।।’’ याला बहुधा विषयधंदा झेपतच नसावा म्हणून आपलं जप-तप करतोय. रामदास म्हणतात, मायेनं पिसाळलेले हे विषयीजन धाय मोकलून माझ्यासाठी रडत आहेत! तर काळ कोणताही असो, जनरीत सोडून वय झालं नसताना म्हणजे म्हातारपण आलं नसताना, सर्व गात्रांची शक्ती क्षीण झाली नसताना कुणी भक्ती करू लागला की लोकांना ते स्वाभाविकपणे अस्वाभाविक वाटतं!

पण आपण जे ‘अरण्य’ आणि ‘तारूण्य’ पाहात आहोत ते केवळ शारीरिक स्थितीपुरतं नाही. हा जो तारूण्यकाळ आहे तो म्हणजे शरीराच्या क्षमता पूर्ण झाल्यावरचाच केवळ तारूण्यकाळ नाही. हा आंतरिक क्षमता पूर्ण विकसित होत असलेला काळही आहे! ‘‘सदा सेवि आरण्य तारूण्यकाळी’’ या चरणाचा अर्थ ‘‘मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं।’’ हा जोडचरण ध्यानात घेतल्याशिवाय उकलत नाही! साधनपथावर वाटचाल करताना आंतरिक क्षमता विकसित होऊ लागल्यावर ज्या सुप्त शक्ती, सुप्त क्षमता प्रकट होऊ लागतात, त्यांच्या आधारे लोकेषणेत जो अडकत नाही तोच खरा अरण्याचं सेवन करतो! ‘

आरण्य’ म्हणजे जनांपासून दूर, लोकांतातली तपश्चर्या! ‘आरण्य’ म्हणजे स्वत:चं स्वत:शी सुरू असलेलं निर्णायक युद्ध! तो सदोदित अंतरंगात उत्पन्न होणाऱ्या लोकेषणेशी झुंजत तिला नष्ट करतो आणि आपण कुणीतरी झालो आहोत, अशा कल्पनेत तो क्षणभरही अडकत नाही!

पूर्वी जंगलात राहून योगी जशी उग्र तपस्या करीत असे तसा हा साधक जनांत राहूनही लोककिर्ती, लोकसन्मान यापासून स्वत:ला दूर ठेवून तपाचरणातच व्यग्र असतो. या तपाचरणाच्या निश्चयापासून तो लेशमात्रही ढळत नाही. सर्वोत्तमाचा हा दास जगात धन्य असतो.

– चैतन्य प्रेम