शारीरिक आणि आंतरिक क्षमता परिपक्व असतानाही ज्यांचं अंत:करण लोकेषणेपासून दूर, आंतरिक निर्जन एकांत स्थितीत सदा स्थिर असतं (सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।) ज्यांचं मन प्रापंचिक कल्पनांमागे वाहात जाऊन ऐहिक प्रगतीलाच आध्यात्मिक प्रगतीचा मापदंड लावत नाही (मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी।) आणि आपला जन्म परमार्थासाठीच आहे, या निश्चयापासून ज्यांचं मन क्षणमात्रही चळत नाही (चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।) असा तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य असतो (जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥) हा ‘मनोबोधा’च्या ५४ व्या श्लोकाचा गूढार्थ आहे. श्रीसद्गुरू हा दृढनिश्चय शिष्यावर िबबवतात. जन्मापासूनचा आपला निश्चय काय होता? तर सुख मिळविण्याचा! जन्मापासून आपण प्रत्येक गोष्ट केवळ आणि केवळ सुख मिळावं, या हेतूनंच केली. सुखाच्या हेतूनं आपण माणसांवर, परिस्थितीवर आणि वस्तूंवर अवलंबत होतो; पण काळानुरूप व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तूमध्ये बदल होतो. त्यांची अनुकूलता-प्रतिकूलता, लाभ-हानी, संयोग-वियोग हे सारं काळानुरूप बदलत असतं. जिथं अवलंबन आहे तिथं परावलंबन आहे. परावलंबन आहे तिथं पारतंत्र्य आहे. जगणं स्वतंत्रपणे नव्हे तर परतंत्रानुसार होतं. ‘सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं’ यात ही परतंत्रापासूनची, परावलंबनापासूनची मुक्तीच सूचित आहे. जीवनात सुख आहे तसंच दु:खही आहे. जीवनात अनपेक्षित तेच घडत असतं, कारण आपल्या बऱ्याचशा अपेक्षा अवास्तवच असतात. याची एकदा जाणीव झाली की, अपेक्षांच्या जंजाळातून सुटण्याची इच्छा उत्पन्न होईल. मग सुखाच्या आशेनं अन्य आधारांचं जे लाचार दास्य सुरू होतं ते संपेल. माझ्यासकट संपूर्ण जग हे आपल्या स्वार्थाला अग्रक्रम देणारं असल्याने ते सदोदित ‘चांगलं’ म्हणजे माझ्या मनाजोगतं राहू शकत नाही, हे उमगलं, की सुखाच्या अनेक कल्पना मावळतील. त्या कल्पनांना मनाची साथ देणं थांबेल (मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी). मग खऱ्या सुखाचा, खऱ्या शाश्वत शांतीचा शोध घेण्याचा निश्चय मनात दृढ होईल!  उस्ताद दिलशाद खाँ यांच्या मुलाखतीतलं एक वाक्य फार मार्मिक आहे. त्यांचे गुरू त्यांना म्हणाले, ‘‘जो रियाज करेगा वो राज करेगा!’’ हे साधनेलाही लागू आहे. साधना म्हणजे मनानं अशाश्वत सोडविण्याचा आणि शाश्वत तत्त्व रुजविण्याचा रियाजच आहे! जगताना पदोपदी आपल्या आचरणाकडे, आंतरिक विचार तरंगांकडे, वृत्तीकडे, वासना तरंगांकडे तटस्थतेनं लक्ष देणं, ही साधना आहे. सद्गुरूंच्या बोधानुरूप जगूनच खरं सुख मिळेल, या विचाराची आणि त्यानुरूप निश्चयपूर्वक जगण्याची वृत्ती घडवणं ही खरी साधना आहे. असा जो साधक आहे तोच खऱ्या अर्थानं मुक्तपणे, निर्भयपणे आणि नि:शंकपणे जगात वावरतो. जगाचं दास्य सुटतं आणि तो सर्वोत्तमाचा दास होतो. जेव्हा शिष्याच्या अंतरंगातलं जगाचं दास्यत्व, जगासाठीची लाचारी, जगासाठी स्वार्थप्रेरित तळमळ संपते तेव्हाच खऱ्या सद्गुरूभक्तीला सुरुवात होते. श्रीसद्गुरूही याच जगात वावरतात, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात जगाकडूनची अपेक्षा कधीच डोकावत नाही. जगाच्या आधारासाठी ते कधीच तळमळत नाहीत. त्यांचं चित्त सदोदित परम तत्त्वाशीच एकरूप असतं. चित्ताच्या चिंतनाचा, मनाच्या मननाचा, बुद्धीच्या बोधाचा एकमात्र विषय परमात्माच असला पाहिजे, हे ते शिष्यावर िबबवतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनच हे संस्कार होत असतात. जगाचा हा भ्रम आणि मोहयुक्त पसारा ते सदोदित आवरत असतात म्हणून तो परमात्माही श्रीसद्गुरूंचा सदैव ऋणी असतो, असं श्रीसमर्थ मनोबोधाच्या ५५ व्या श्लोकात सांगतात. त्या श्लोकाकडे आता वळू.

reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
savarkar
सर्वसमावेशक दृष्टिकोन
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

चैतन्य प्रेम