खुदा से खुदी को किया दूर हमने.. या अहम्मुळे- अहंकारामुळे आपण स्वत:ला परमात्म्यापासून दूर केलं आहे. जर त्या परमात्म्यात स्वत:ला लीन केलं तरच खरी आनंदमय, अद्वय स्थिती लाभेल, हे सद्गुरू बिंबवतात. हे पसारा आवरणच आहे, जगाला परमस्थितीकडे वळवणंच आहे. म्हणूनच परमात्मा सद्गुरूंचा अखंड ऋणी असतो. आता सद्गुरूंचं हे विराट कार्य कसं चालतं हे ‘मनोबोधा’च्या ५५व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत सांगितलं आहे. ‘नसे मानसी नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा।’ इथं आशा, दुराशा आणि नष्ट हे तिन्ही शब्द फार महत्त्वाचे आहेत. आशा म्हणजे चांगल्या इच्छा, दुराशा म्हणजे वाईट इच्छा आणि नष्ट म्हणजे नश्वर होणाऱ्या. म्हणजे नश्वर अशा चांगल्या व वाईट इच्छा. माणसाचं जीवन म्हणजे अनंत इच्छांचा पसारा आहे. अपूर्त इच्छांच्या पूर्तीसाठीच जीव जन्मतो, इच्छांच्या प्रवाहात वाहातच जगतो आणि अपूर्त इच्छांची खंत बाळगतच अखेरचा श्वास घेतो. यातील बहुतेक सर्वच इच्छा या त्याच्या देहबुद्धीतूनच उगम पावल्या असतात. ‘मी’ आणि ‘माझे’च्या संकुचित आकलनाशीच त्या जखडलेल्या असतात. भ्रम, मोह, आसक्ती आणि अज्ञान यामुळे इच्छेची योग्यता किंवा अयोग्यताही माणसाला उमगत नाही. यात काही इच्छा या स्वाभाविकपणे चांगल्या वाटतात, तर काही इच्छा या वाईट असतात. आपलं जीवन सुखाचं असावं, चांगली नोकरी मिळावी, पगार उत्तम असावा, लग्नात सुयोग्य जोडीदार मिळावा, मुलं चांगली असावीत, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांची लग्नं नीट व्हावीत, नातवंडं चांगली असावीत.. सर्वसाधारणपणे इच्छांचा क्रम असा वाहत असतो. वरकरणी या सर्वच इच्छा स्वाभाविकपणे चांगल्याच वाटतात. आता या जोडीला काही वाईट इच्छाही आपल्या मनात सुप्तपणे वावरतात. दुसऱ्याची ऐहिक प्रगती वा भरभराट पाहून आपल्यालाही आनंद होतो, पण हा दुसरा जर आपल्या मतानुसार वाईट, अयोग्य असेल, आपल्या विरोधातला असेल तर त्याच्या प्रगतीचा आनंद होणं कठीणच असतं! मग द्वेष, मत्सर, निंदा यातून मनातल्या वाईट इच्छा बळावतात. बरेचदा इच्छा वरकरणी वाईट नसते. मुलानं जन्मभर आपल्या मनानुसार वागावं, ही इच्छा वाईट भासत नाही; पण मुलाला त्यापायी जाच होऊ  लागला तर ती इच्छा वाईटच ठरते. दुसऱ्याचं जीवन चांगलं घडावं, या इच्छेत गैर काही नाही; पण आपल्या मतानुसारचं जीवन हेच चांगलं जीवन, असं मानून त्यानं तसंच जगावं, ही सक्ती करू लागलो तर ती दुराशाच आहे. तर आपल्या मनातल्या समस्त इच्छा या ‘मी’केंद्रितच असतात. ‘मी’ हाच मुळात ठिसूळ पायावर उभा असल्यानं त्या इच्छाही ठिसूळच असतात. मोह, भ्रम आणि अज्ञानातून उपजलेल्या या इच्छा मनातली आसक्ती, हट्टाग्रह, दुराग्रहच वाढवतात आणि म्हणून आपल्या आंतरिक वाटचालीतला मोठा अडथळा ठरतात. श्रीनिसर्गदत्त महाराजही म्हणत की, इच्छेत काही गैर नाही, तिचा संकुचितपणा गैर आहे. ते म्हणत की, तुमच्या इच्छा एवढय़ा व्यापक करा, की त्यांच्या पूर्तीसाठी तुम्हालाही व्यापकच व्हावं लागेल! तर या संकुचित, ‘मी’केंद्रित इच्छा याच बंधन आहेत आणि त्यापासून मोकळं होणं, निरिच्छ होणं हीच मुक्ती आहे! ‘जगाचं कल्याण व्हावं,’ ही सत्पुरुषाचीही इच्छा असते, पण कल्याणाची जगाची कल्पना आणि सत्पुरुषाची धारणा यात महदंतर असते. सत्पुरुषाला त्याची जाण असते आणि म्हणूनच तो माझ्यावर सक्ती करीत नाही तर माझीही धारणा घडवण्याची प्रक्रिया सुरू करतो! आपापल्या काल्पनिक जगात आसक्त भावानं गुंतलेल्या जीवाला तो केवळ व्यापक करू लागतो. जीव जसजसा आंतरिक स्तरावर व्यापक होऊ  लागतो तसतसं त्याचं जगणंही व्यापक होऊ  लागतं!

चैतन्य प्रेम