श्रीसद्गुरू जिवाला व्यापक करतात म्हणजे काय करतात? या प्रक्रियेची सुरुवात कुठून होते? तर इच्छेपासून होते! जिवाचं मन अनंत चांगल्या-वाईट इच्छांनी सदोदित हिंदकळत असतं. या इच्छा भ्रामक ‘मी’शी जखडलेल्या असतात. मनातल्या विकारवृत्तीही या इच्छांच्या पूर्तीसाठी सदोदित उसळत असतात. श्रीसद्गुरू तर ‘‘नसे मानसीं नष्ट आशा दुराशा’’ या सहज वृत्तीत वावरत असतात. त्यामुळे साधकाची वृत्तीही तशीच घडावी, इथून या व्यापकीकरणाची सुरुवात ते करतात. श्रीनिसर्ग दत्त महाराज जे म्हणत की, ‘‘इच्छेत काही गैर नाही, तिचा संकुचितपणा वाईट आहे. तुमच्या इच्छा इतक्या व्यापक करा की त्यांच्या पूर्तीसाठी तुम्हाला व्यापकच व्हावं लागेल.’’ यात या प्रक्रियेचंच सूचन आहे. एक बोधकथा सर्वानाच माहीत असेल. एका राजानं एक रेघ ओढली आणि म्हणाला की, न खोडता, न पुसता ही रेघ लहान करून दाखवा. सर्व जण विचारात पडले. एक दरबारी मात्र चतुर होता. त्यानं त्या रेघेशेजारीच तिच्याहून मोठी अशी रेघ काढली. आपोआप आधीची रेघ लहान झाली! आपल्या मनातल्या समस्त इच्छा त्या अमीट रेघेसारख्या आपल्या हृदयावर कोरल्या गेल्या असतात. ती रेघ अवघं जगणंच व्यापून टाकत असते. त्या इच्छांचा जोर, प्रभाव, बळ इतकं असतं की ती रेघ ना आपल्याला पुसता येते, ना ओलांडता येते! नव्हे, त्या इच्छांच्या पूर्तीसाठीच अध्यात्माच्या मार्गावर पहिलं पाऊलही पडतं! अध्यात्माच्या मार्गावर पहिला अडथळा या जीवइच्छेचाच असतो. माझ्या अंतरंगातील या फोल इच्छा सद्गुरूही फेटाळत अथवा धुडकावत नाहीत. या इच्छेच्या रेघेच्या बाजूलाच ते ‘आत्मसाक्षात्कार व्हावा’ या व्यापक इच्छेची मोठी रेघ ओढतात! आपल्याही मनात येतं की, एकदा का आत्मसाक्षात्कार झाला, देवाचं दर्शन झालं की सर्व कटकट मिटेल. जीवन मग पूर्ण आनंदी होईल. आता पूर्ण आनंदाची आपली कल्पनाही संकुचितच असते बरं का! आपल्या सर्व संकुचित इच्छा सदोदित पूर्ण होत राहणं, हीच आपली ‘पूर्ण आनंदाची’ कल्पना असते. तेव्हा त्या अपूर्त इच्छांच्या पूर्तीसाठी आपण आत्मसाक्षात्कार घडवून देणाऱ्या साधनेकडे वळतो. एका साधकानं एक मार्मिक प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे अपूर्त इच्छा आणि अतृप्त इच्छा यात काही भेद आहे का? तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, इच्छा तृप्त झाली, असं आपण म्हणतो खरं, पण इच्छा पूर्ण होऊ  शकते, तृप्त नाही! तृप्ती किंवा अतृप्ती हा मनाचा स्थितिदर्शक गुणधर्म आहे. साधं उदाहरण घ्या. आपलं घर असावं, ही इच्छा जोवर घर होत नाही तोवर अपूर्त असते. घर झालं की ती पूर्ण होते. पण मनाची तृप्ती होत नाही! मग आणखी चांगलं आणि मोठं घर असावं ही इच्छा निर्माण होते. तेव्हा इच्छा पूर्ण होऊ  शकते, पण मन तृप्त होत नाही. त्यामुळे नवी इच्छा लगेच उत्पन्न होते. साधना करीत असतानाही मनाचा हा ‘ऐच्छिक’ खेळ आपल्याला ‘अनिवार्य’च वाटतो. त्या इच्छांनी मनाची होणारी घालमेल आणि फरपट थांबली नसतानाच, आणखी जप व्हावा, आणखी ध्यान व्हावं, आणखी योगसाधना व्हावी अशी मोठी होत जाणारी रेघ मनात उमटू लागते! सद्गुरूंचा बोधही जाग आणत असतो. अपूर्तच नव्हे तर पूर्त इच्छांचीही नश्वरता, क्षणभंगुरता जाणवू लागते. जग हे आपल्या दु:खाचं कारण नव्हे, तर हे जगच अखंड सुख देईल, ही आपली मनोनिर्मित इच्छाच आपल्या परावलंबित्वाचं आणि म्हणूनच दु:खाचं कारण आहे, हे उमगू लागतं. ‘‘जे मनोनिर्मित आहे त्याचा नाश मनानेच केला पाहिजे,’’ हे उमगू लागतं. लहान रेघ ओलांडता येत नाही, पण तिचा संकुचितपणा, हिंस्रपणा जाणवू लागतो. मोठी रेघ खुणावू लागते.

-चैतन्य प्रेम