ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटलं आहे, ‘‘ राशब्दो विश्ववचनो मश्चापीश्वरवाचक:। विश्वानामीश्वरो यो हि तेन राम: प्रकीर्तित:।।’’ रा शब्दो विश्ववचनो म श्च अपि ईश्वरवाचक! ‘रा’ हा शब्द परिपूर्ण अशा चराचराचा बोधक आहे आणि ‘म’ शब्द ईश्वरवाचक आहे. विश्वानाम ईश्वरो यो हि.. या विश्वात भरून राहिलेला जो ईश्वर आहे.. तेन राम: प्रकीर्तित:.. त्याला राम म्हणतात! तर या चराचरात जी जीवनशक्ती भरून आहे, प्राणशक्ती भरून आहे ती रामच आहे. ही प्राणशक्तीच आपल्या जीवनाचा आधार आहे आणि प्राण हाच संकल्प आहे! प्रत्येक श्वासागणिक जगण्याचाच संकल्प सोडला जात आहे. परमात्मा हा सत्यसंकल्पी आहे. म्हणजेच परमात्म्याचा प्रत्येक संकल्प हा सत्यात उतरतोच. जीव हा त्याच परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे त्याचाही प्रत्येक संकल्प सत्यात उतरलाच पाहिजे. फरक इतकाच आहे की जिवाचा संकल्प प्रत्यक्षात उतरण्यासाठी काळाची आणि परिस्थितीची साथ लागतेच. मात्र हेदेखील खरं की काळ आणि परिस्थितीची साथ लाभेपर्यंत तो संकल्प ज्याप्रमाणे पूर्ण होत नाही, त्याचप्रमाणे तो तोवर नष्टही होत नाही! याचाच अर्थ संकल्प करणाऱ्याचा प्रत्येक  संकल्प पूर्ण होत नाही तोवर त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रात राहावंच लागतं! थोडक्यात संकल्प ही शक्ती असूनही तिच्याचमुळे आपण बद्ध आहोत!! शारदामाता सांगत की बर्फीचा अर्धा तुकडा खाण्याची इच्छा जरी उरली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो! मग विचार करा, आपल्या मनात क्षणोक्षणी किती इच्छा निर्माण होत असतात.. या इच्छांच्या अपूर्तीतून किती दु:खं आपण भोगत असतो.. अमुक एक गोष्ट मनासारखी होत नाही, हेच दु:ख माणसासाठी सर्वात मोठं दु:ख असतं.. न होता मनासारिखे दु:ख मोठे, असं समर्थही सांगतातंच ना? तेव्हा संकल्पाची ही शक्तीच आपल्याला पुन्हा पुन्हा संकल्पपूर्तीसाठी जन्म घ्यायला भाग पाडत असते. म्हणून समर्थ म्हणतात, ‘‘उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेंचि आहे।’’ अरे बाबा! मनात उमटणाऱ्या प्रत्येक संकल्पाच्या पूर्तीची क्षमता जीवनशक्तीत आहे. असं असताना मनात वाईट संकल्प का आणतोस? त्यायोगे मनाला वाईट विचारातच सदा का गोवतोस? कारण जसा संकल्प तसे विचार असतात. वाईट संकल्प हे स्वार्थातून प्रसवतात. ते काम, क्रोध, लोभ-मोहादि विकारांनाच वाव देतात. मग ‘जे जे इच्छावे ते ते पावावे,’ अशी क्षमता असलेल्या संकल्पशक्तीचा दुरूपयोग माणसानं करू नये. या संकल्पवृक्षाखाली जर तो संकुचित, स्वार्थकेंद्रित विचारच करीत राहिला तर त्याच्या वाटय़ाला दु:खच येणार. त्यातून मग सज्जनांची संगत लाभूनही अहंभावानं त्यांच्याशीही वादच घालावेसे वाटणार. मग भविष्यातही मागचाच शोक वाटय़ाला येणार! समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर,   ‘‘जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा। पुढें मागुता शोक जीवीं धरावा।।’’ सज्जनांशी वाद वाढवावा, अशीच खुमखुमी मनात येत राहाणार. त्यांनी कितीही समजावलं तरी माझ्या मनाजोगतं घडेल, अशी ग्वाही मिळत नाही तोवर मी शांत होत नाही! मी देवाचं इतकं करतो, इतकं नाम घेतो, इतकी पूजाअर्चा करतो, इतक्या तीर्थयात्रा करतो तरीही माझ्यावरच हे संकट का? माझ्याच जीवनात हे दु:ख का? याच प्रश्नातून हे अनंत वाद उद्भवतात. जणू सद्गुरूंनी स्मरण, चिंतन, मनन केवळ आपल्याच भौतिक अडचणींचं, दु:खांचं करावं आणि सदोदित त्या दूर करीत राहावं आणि सारं काही आपल्या मनासारखं करीत जावं! तसं घडत गेलं तरच त्यांची कृपा आहे!! भौतिकातल्या सुरळीतपणातच जे कृपेची तपासणी करतात त्यांची अवस्था काय होते, हे समर्थ मनोबोधाच्या पुढील ६२व्या श्लोकात स्पष्टपणे सांगत आहेत. त्या श्लोकाकडे आता वळू.

चैतन्य प्रेम

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन