सज्जनांचा सहवास लाभूनही जो सत्संगतीचं खरं महत्त्व जाणत नाही आणि भौतिक दु:खाचंच ओझं वाहात भौतिक परिस्थितीच्या सुधारणेतच कृपेची तपासणी करतो त्याची गत काय होते हे समर्थ रामदास स्वामी मनोबोधाच्या ६२व्या श्लोकात सांगत आहेत. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला।

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

बळें अंतरीं शोकसंताप ठेला।

सुखानंद आनंद भेदें बुडाला।

मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला।। ६२।।

प्रचलित अर्थ : सज्जनांशी घडणाऱ्या या एकांगी वादविवादामुळे चार मोठे तोटे होतात. पहिला तोटा म्हणजे निजध्यास अर्थात स्वरूपानुसंधान राहात नाही. दुसरा तोटा म्हणजे आपण होऊन दु:खशोकाला अंतरंगात स्थान देतो. तिसरा तोटा हा की भेदबुद्धीमुळे सुखानंदाचा आनंद लोपतो आणि चौथा तोटा म्हणजे चित्तात विक्षेप झाल्याने आत्मनिश्चय उडून जातो.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात गेला, ठेला, बुडाला आणि उडाला हे चार शब्द नुसते यमकासाठी आलेले नाहीत! पहिल्या चरणातला गेला हा शब्द दाखवतो की निजध्यास या हृदयात आलाही होता. दुसऱ्या चरणातला ठेला शब्द दाखवतो की आधी या चित्तात शोक आणि संताप नव्हता तो अधिक बळपूर्वक नुसता आलाच नाही तर पाय रोवून बसला. तिसऱ्या चरणात सुखानंद बुडाला म्हटलंय याचाच अर्थ आधी हा जीव त्या आनंदतरंगांवर तरंगत होता आणि चौथ्या चरणातला उडाला शब्द हे दाखवतो की आधी हा निश्चय मनात रुजू पाहात होता तो उडाला. आता पुन्हा एकवार या चरणांच्या अनुषंगानं विचार करू. पहिला चरण सांगतो की, निजध्यास तो सर्व तूटोनि गेला.. निजज्ञान, आत्मज्ञान प्राप्तीच्या ध्यासाचा जो तंतू प्रयत्नपूर्वक या हृदयात कुणीतरी विणला होता, तो तुटून गेला! हा विणणारा कोण? तर संतसज्जन-सद्गुरूच. माझं चित्त त्या परमतत्त्वाशी जोडलं जावं यासाठीचा प्रेमतंतू माझ्या अंतरंगात कधीच नव्हता. तो त्यांनीच निर्माण केला. त्या प्रेमतंतूनं मी परमात्म्याशी जोडलं जाणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मी जगाशी स्वत:ला जोडून घेण्याचीच धडपड केली. त्या जगातल्या प्रेमात, अनुकूलतेत मी माझ्या साधनेच्या फलिताचं मोजमाप करीत असेन तर मग आत्मज्ञानासाठी मी या मार्गावर आहे, हे बोलणं म्हणजे ढोंगच आहे. मग जेव्हा भौतिकात काहीच माझ्या मनाजोगतं घडत नसेल तर या आत्मज्ञानासाठी जो प्रेमतंतू माझ्या हृदयात विणला गेला आहे तो उसवणारच.. तुटणारच.. मग ज्या अंतरंगात मनाची साथ नसतानाही मी भगवंताचं स्मरण रुजवण्याची धडपड करीत होतो त्या अंतरंगात शोक आणि संताप त्याच्या पूर्ण बळानिशी पाय रोवणारच.. या जगात त्या एका परमात्म्याचीच सत्ता आहे, मी त्याचाच अंश आहे, या भावनेनं सुरू झालेली साधना द्वैतबुद्धीनं भेदयुक्तच होणार. नव्हे, मी जर परमात्म्याच अंश आहे तर मग माझ्या मनाजोगत्या गोष्टी का घडत नाहीत, असा प्रश्नच हा भेद आणखीनच वाढविणार. या भेदबुद्धीमुळे परमात्मसुखाच्या आनंदविचारांच्या तरंगावर जे तरंगणं होतं ते संपणार आणि भेदाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात बुडण्याची पाळी येणार.. मग मन खेदानं भरून जाणार.. त्या खेदाच्या प्रभावामुळे मनातला आत्मज्ञानासाठी साधना करण्याचा जो निश्चय होता तो उडून जाणार! मग अशी गत येऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, मनाची धारणा काय असली पाहिजे, बुद्धीची धारणा काय असली पाहिजे, चित्ताच्या चिंतनाचा विषय काय असला पाहिजे, हे समर्थ मनोबोधाच्या पुढील चार श्लोकांत समजावून सांगत आहेत आणि या मनाला राघवाकडे पुन्हा वळवीत आहेत. त्या श्लोकांकडे वळू.

चैतन्य प्रेम