रामनाम आणि नित्यनेम यावर आपण आता विचार करणार आहोत, पण त्याआधी ‘‘मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा,’’ ही समर्थाची सूचनाही लक्षात घेतली पाहिजे. मद आणि आळस सोडला नाही, तर हा अभ्यास होणं कठीण आहे! मद म्हणजे गर्व. मी तर आता सद्गुरूंचा झालो, त्यांचा आधार लाभला आहे, आता जीवनातल्या अडीअडचणींची भीती उरलेली नाही, मग साधनेची खटपट काही माझ्यासाठी नाही, हा भाव मदापोटी जन्माला येतो. आळस तर असतोच. तेव्हा नाम आणि नित्यनेमाच्या आड हा मद आणि आळस येतो. आळस आला की दीर्घसूत्रीपणा येतो. दीर्घसूत्रीपणा म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं. जाऊदे आज नाम झालं नाही, आज साधना झाली नाही, आता उद्या पाहू, असं होतं. तर आधी मनातला मद आणि आळस झटकला पाहिजे आणि मग हे जे नामस्मरण आहे आणि हा जो नित्यनेम आहे, त्याचाही सूक्ष्म विचार केला पाहिजे. या वर्षीच्या या सदराचा हा अखेरचा सप्ताह आहे आणि जणू मनाच्या श्लोकांच्या आधारावर आजवर जे आपण जाणलं त्याचं हे एक प्रकारचं सिंहावलोकन आहे. मनाचे श्लोक २०५ आहेत आणि त्यातले ७० आपण या वर्षी जाणले. आनंदाची गोष्ट ही की आता पुढील वर्षी म्हणजे २०१७मध्येही आपण ‘मनोयोग’ या सदरातून साधत असलेला सत्संग कायम ठेवणार आहोत. तर या टप्प्यावर या सप्ताहात ७१ ते ७६ या उरलेल्या सहा श्लोकांच्या आधारे आपण भगवंताच्या नामाचं महात्म्य आणि नित्यनेम जाणून घेणार आहोत. आता या आठवडय़ापुरती श्लोकानंतर प्रथम प्रचलित अर्थ मांडण्याची आणि मग मननार्थाचं विवरण करण्याची रचना थोडी बाजूला ठेवून थेट श्लोक आणि त्याच्या मननार्थाचा विचारही आपण करू. तर भगवंताचं नाम कसं आहे? समर्थ रामदास‘मनोबोधा’च्या ७१व्या श्लोकात सांगतात :

जयाचेनि नामें महादोष जाती।

जयाचेनि नामें गती पाविजेती।

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।। ७१।।

सदोदित नाम घ्यावं आणि नित्यनेम सुरू ठेवावा, असं समर्थ सांगतात. त्या नामाचं खरं रहस्य आणि त्या नित्यनेमाचा खरा अर्थ उकलत नसला तरी आपल्या मनात येतं की माझ्यात तर अनंत दोष भरले आहेत. मी तर इतका पापी आहे. मग साध्याशा नामानं ते नष्ट होऊन मला आध्यात्मिक गती प्राप्त होणं शक्य आहे का? त्यामुळे या ७१व्या श्लोकात समर्थ सांगतात की, ‘‘अरे ज्याच्या नामानं महादोष नष्ट होतात, उत्तम गती प्राप्त होते, पुण्याचा ठेवा निर्माण होतो त्या रामनामाचं आध्यात्मिक वाटचालीच्या सुरुवातीला अत्यंत प्रेमादरानं चिंतन करावं.’’ आता हे महादोष नष्ट होतात म्हणजे तरी काय? नाम घेणं आपल्याला आवडत नाही, यातूनच नामाचं हे कर्तृत्व खरं तर प्रकाशित होतं! आपल्यातले दोष म्हणा विकार म्हणा, हे कशामुळे उत्पन्न झाले असतात? तर देहबुद्धीच्या आधारावर. देहच मी या कल्पनेतून देहाच्या सुखासाठी अग्रक्रमानं जे आपण जगू लागतो त्यातून अनंत दोष निर्माण होतात. साधी गोष्ट आहे. इतर अनंत गोष्टी बोलण्यात किंवा अनंत गोष्टींचा विचार करण्यात आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. हे सारं ब ोलणं, मनात घोळणारे सारे विचार हे शब्दांद्वारेच सुरू असतात. त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही, पण काही शब्दांचंच बनलेलं जे नाम आहे ते वारंवार घेण्याचा आपल्याला कंटाळा येतो! कारण इतर सर्व गोष्टी या देहबुद्धीशी म्हणजेच ‘मी’पणाशी निगडित असतात, ‘मी’पणाला पोसणाऱ्या, जपणाऱ्या असतात, पण भगवंताशी अखंड जोडलेलं, त्याचं स्मरण करून देणारं नाम हे ‘मी’पणालाच छेद देणारं असतं! दोषांवर आघात करणारं असतं!

चैतन्य प्रेम