News Flash

२५६. वृत्तिविश्वास

हरीकीर्तनात आणि त्याच्या गुणगानात वृत्ती दृढपणे स्थिरावली की त्याचाच छंद जगण्यातलं सर्व द्वंद्व संपवितो.

 

श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’तील ७७वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

करी काम नि:काम या राघवाचें।

करी रूप स्वरूप सर्वा जिवांचें।

करी छंद निर्द्वद हे गूण गातां।

हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां।। ७७।।

प्रचलित अर्थ : या राघवाचे काम म्हणजे कामना भक्ताला निष्काम करते. या राघवाचे स्वरूप चित्तात ठसले की सर्व जीवमात्रांत त्याचेच रूप दिसते. हरीकीर्तनात आणि त्याच्या गुणगानात वृत्ती दृढपणे स्थिरावली की त्याचाच छंद जगण्यातलं सर्व द्वंद्व संपवितो.

आता मननार्थाकडे वळू. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती एका राघवाच्या म्हणजेच सर्व भवभयाचं हरण करणारा असा जो हरी अर्थात सद्गुरू, त्याच्या भक्तीनं कशा सहजसाध्य आहेत, याचं प्रकटन या श्लोकात आहे. सलोकता म्हणजे माझ्या जीवनावर श्रीसद्गुरूंचीच सत्ता आहे, या जगावर त्यांचीच सत्ता आहे, हा वृत्तिविश्वास! समीपता म्हणजे जर हे जीवन त्यांचंच आहे आणि मी त्यांच्या कृपाछायेत आहे तर जीवनात द्वंद्व ते कोणतं, या भावनेतून दृढ झालेला वृत्तिविस! सरूपता म्हणजे मी त्यांचाच अंशमात्र आहे आणि या जगातही तेच भरून आहेत, या जाणिवेनं चराचरात त्यांचंच दर्शन होण्याचा वृत्तिविश्वास! सायुज्यता म्हणजे खरी निष्कामता!! आता या चारही टप्प्यांचा या श्लोकाच्या आधारे विचार करू. माझ्या जीवनावर आणि या जगावर सद्गुरूंचीच सत्ता आहे, हे वाक्य आध्यात्मिक साधनेशी अपरिचित अशा कुणालाही पटणार नाही! पण मुळात हे जग आणि स्वत:चं जीवन तरी नेमकेपणानं कुणाला उमगतं का हो?

द्वैतमताच्या एका उपासकानं विचारलं की, ‘‘हे जग भगवंताची लीला असताना त्याला मिथ्या कसं मानता येईल? आणि द्वैत स्पष्ट असताना अद्वैतालाच कसं मानता?’’ आवाका नसल्याने अशा तत्त्वचर्चेपासून मी शक्यतो लांबच राहतो. तरीही म्हणालो, ‘‘हे जग मिथ्या म्हणजे खोटं नाही, तर मला ते जसं भासतं तसंच ते असत नाही, या अर्थानं ते मिथ्या आहे. प्रत्येक वर्तुळाचा एक केंद्रबिंदू असतो. त्या केंद्रबिंदूभोवती वर्तुळ असतं, त्याप्रमाणे ‘मी’ हा केंद्रबिंदू आहे आणि त्यानुसारच्या परिघात आहे ते ‘माझं’ जग आहे! एकाच कागदावर अनंत वर्तुळं असावीत त्याप्रमाणे या एकाच जगात जो तो आपापल्या जगात जगत आहे! दोघे शेजारी शेजारी झोपले आहेत आणि दोघांना स्वप्न पडत आहे. तरी अगदी शेजारी झोपले असूनही एकमेकांना एकमेकांची स्वप्नं उमजतही नाहीत. दुसऱ्यानं स्वप्न सांगितल्यावर ते कल्पनेनं तेवढं जाणता येतं, अनुभवानं नाही! तसंच माझ्या अनुभवाचं जग दुसऱ्याला जाणता येत नाही. जग जर एकच असतं तर जगाचं हित कशात आहे, यावरही एकमतच झालं असतं ना? दुसरी गोष्ट  द्वैत खरं असलं तरी माणसाला अद्वैताचीच ओढ आहे. ‘माझंच इतरांनी ऐकावं,’ ही भावनाच दाखवते की दोनपणा कुणालाच आवडत नाही!’’ तर माझंच इतरांनी ऐकावं, या ठाम इच्छेमुळेच जीवनात द्वंद्व आहे. जिथं-तिथं ‘मी’ आणि ‘माझे’लाच अग्रक्रम देण्याची आस आहे म्हणून जगण्यात द्वंद्व आहे!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:56 am

Web Title: samarth ramdas philosophy 156
Next Stories
1 २५५. वृत्तिपालट
2 २५४. मध्यांतर!
3 २५३. नित्यनेम: ४
Just Now!
X