श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं हेच खरं ‘हरिकीर्तन’ आणि ‘हरी गुणगान’ आहे आणि समर्थ म्हणतात की, या कीर्तनाचा आणि गुणगानाचा मला छंद जडला पाहिजे! हा छंद कधी जडेल? तर ‘‘हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां’’! त्यांच्या बोधावर आधी विश्वास जडला पाहिजे. मग त्या बोधानुसार स्वत:चं आचरण सुधारता येईल. असं घडलं तरच त्यांचे गुण आत्मसात करीत आपल्या कृतीतून ते सहज उतरविण्याचा म्हणजेच खऱ्या ‘गुणगाना’चा छंद मला जडेल!

आज आपण ‘मी’च्या कीर्तनात आणि ‘मी’च्या अहंभावमग्न गुणगानात मग्न आहोत. त्याच ‘मी’केंद्रित कीर्तन आणि गुणगानाचा छंद मला जडला आहे. ‘मी असं केलं, मी तसं केलं,’ किंवा ‘मी होतो म्हणून ते शक्य झालं’ असा त्या गुणगानाचा सूर असतो. अशा स्थितीत आपण श्रीसद्गुरूंकडे जातो. ते जे सांगतात ते आपण ऐकतो खरं, पण त्यांचा बोध ग्रहण मात्र करीत नाही. त्यामुळे ते खरं ‘ऐकणं’ नसतंच. खरं ऐकणं किंवा खरं श्रवण तेच असतं ज्यानुसार कृती सुरू होते. हा बोध आपण ऐकूनही न ऐकल्यासारखं करतो, कारण हा बोध आपल्यातल्या ‘मी’पणाला धक्का देणारा असतो. या बोधानुसार वागायचं तर ‘मी’च्या दुराग्रहाला, सवयींना आणि आवडींना मुरड घालावी लागेल, ही जाणीव मनात धास्ती निर्माण करीत असते.

श्रीगोंदवलेकर महाराज यांनी म्हटलं आहे की, ‘‘माझ्या सांगण्याचा परिणाम न व्हायला दोन कारणे असतील- एक कारण असे की, तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती माझ्यामध्ये नसेल किंवा दुसरे कारण असे की, तुम्ही अभ्यास करीत नसाल!’’ यातले दुसरेच कारण खरे आहे. आपल्या ‘मी’ला धक्का लावणाऱ्या अभ्यासाची आपल्याला भीतीच वाटते. पण या ‘मी’च्या इच्छांची सदोदित पूर्ती व्हावी, या हट्टाग्रहामुळे इतरांच्या ‘मी’पणाशी आपला संघर्ष उद्भवतो. यामुळेच आपल्या जीवनात द्वंद्व उद्भवते. श्रीसद्गुरूंचा बोध कृतीत उतरविण्याचा प्रामाणिक अभ्यास जेव्हा सुरू होईल तेव्हा हा ‘मी’पणा हळूहळू क्षीण होत जाईल. या बोधाचं पायाभूत किंवा मुख्य सूत्र काय आहे? तर.. ‘राम चिंतीत जावा’.. आपल्या संकुचित जगण्यापलीकडे जे व्यापक तत्त्व आहे, त्याचंच चिंतन, मनन, स्मरण करीत राहायचं आहे.

या चिंतन, मनन आणि स्मरणासाठीचा वरकरणी तरी सर्वात सोपा भासणारा, कुणालाही आणि कधीही सहजप्राप्य असलेला नाम हाच एकमेव आधार आहे. साधनेच्या पठडीनुसार नामस्मरण म्हणजे ठरावीक संख्येचा जप, विशिष्ट मंत्राचा वारंवार उच्चार असा गृहीत धरला जातो. पण नामाशी स्मरण जोडलं असेल तर ज्याचं नाम सुरू आहे त्याची प्रेरणाही अंत:करणात रुजत जाते. या प्रेरणेचं बीज जेव्हा अंतरंगात रुजतं तेव्हाच वासनाबीज नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा नाम आणि त्याची प्रेरणा अंत:करणात स्फुरत राहते. ती जीवनाचा परीघ रुंदावत ते व्यापक करू लागते. तेव्हा तो साधक नाम ‘घेताना’ दिसत असेलच असेही नाही. ही पळवाट मात्र नाही बरं का! अशी सहजस्थिती प्राप्त झाली नसताना ती प्राप्त झाल्याच्या भ्रमात नामाचा आधार उपेक्षिणे हा आत्मघातच आहे!

श्रीगोंदवलेकर महाराज यांचे एक खुबीदार वचन आहे की, ‘‘मुक्ती लाभल्यानंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच!’’ आता जगतानाच मनानं मुक्त झाल्याची स्थिती इथं अभिप्रेत आहे. जो मनानं खऱ्या अर्थानं मुक्त झाला त्याला ‘मी मुक्त झालो,’ हे तरी भान असेल का?  जर ते भान उरलं असेल तर तो खऱ्या अर्थानं मुक्त नाही!

– चैतन्यप्रेम