माणसाच्या जीवनावर भावनेचाच मोठा पगडा आहे. जशी भावना तशी त्याची जीवनदृष्टी आहे. ज्या गोष्टींत भावनिक प्रेम वाटतं त्या गोष्टींना जीवनात सर्वोच्च मूल्य असतं. मग निर्थक गोष्टींना सर्वोच्च मूल्य दिल जाऊ लागलं की जीवनही निर्थक गोष्टींत सरू लागतं. अशाश्वत गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आलं की अशाश्वताच्याच प्राप्तीचा आणि जपणुकीचा हव्यास मनात निर्माण होतो. श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वचन आहे आणि त्याचा आशय असा की, जे अस्थिर आहे त्याला स्थिर करण्याची धडपड माणूस अखंड करीत राहतो, पण जे स्थिर आहे त्याकडे त्याचं लक्षही जात नाही! अस्थिर काय आहे? तर मुळात जीवनच अस्थिर आहे! जीवन सदोदित बदलतं आहे. त्यात अनंत चढ-उतार आहेत. ते जसं आहे तसं स्वीकारावं लागतं. अस्थिरता म्हणजे जीवन आत्ता जसं आहे तसंच कायम राहू शकत नाही. निसर्गदत्त महाराज म्हणत त्याप्रमाणे जीवनाच्या नदीचे सुख आणि दु:ख हे दोन काठ आहेत. केवळ एकाच काठाचा आग्रह प्रवाह धरू शकत नाही. केवळ एकाशीच ते थबकू पाहतं तेव्हा प्रवाहित होणं थांबतं. जगण्याला डबक्याची अवकळा येते. तेव्हा प्रत्यक्षात सुखाला आणि दु:खाला महत्त्व नाही. तर सुख आणि दु:ख या दोन प्रवाहातून ज्याचं जगणं वाहतं आहे, त्याला महत्त्व आहे. संकुचित जाणिवेत त्यानं न जखडण्याला महत्त्व आहे. अशाश्वत, अस्थिर, निर्थक गोष्टींत मन चिकटलं तर मनालाही शाश्वत समाधान लाभू शकत नाही, मन स्थिर राहू शकत नाही, मनाच्या क्षमतांचं सार्थक होऊ शकत नाही. या मनाला शाश्वत समाधान हवं असेल तर ते शाश्वत तत्त्वाशी एकरूप झाल्याशिवाय मिळणार नाही. मन जर स्थिर राहावं असं वाटत असेल तर जो सदोदित स्थिर आहे अशा परमात्म्याशीच त्याचा सहज आणि अखंड संयोग व्हावा लागेल. राघव अर्थात सद्गुरू हेच ते परमतत्व आहे. त्याच्याशी एकरूप होण्याची भावनाच मनात रुजावी लागेल. ती भावनाच परमपावन करणारी आहे. म्हणून समर्थही म्हणतात, ‘‘मना पावना भावना राघवाची!’’ हे मना, तो जो राघव आहे, तो जो सद्गुरू आहे त्याच्याशी भावनिक ऐक्य निर्माण व्हावं, असाच प्रयत्न कर. कारण त्याचीच भावना ही जीवनाला व्यापक करणारी आहे. सर्व संकुचित मनोधारणांच्या बंधनातून मनाला सोडविणारी आहे. आता सद्गुरूंची भावना करायची, सद्गुरुंशी भावनिक ऐक्य करायचं म्हणजे काय? तर त्यांची जी भावना तीच माझी भावना करायची. त्यांच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टींना भावनिक महत्त्व आहे, भावनिक मूल्य आहे त्या त्या गोष्टींशी भावबंध जुळावा, यासाठी प्रयत्न करणं. जिथं त्यांचं सहज भावनिक ऐक्य आहे तिथं भावनिक एकरूपता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणं. हीच तर साधना आहे! उपासना आहे! ते साधायचं तर काय करावं लागेल? तर आज ज्या ज्या गोष्टींशी माझी भावनिक जखडण आहे त्या त्या गोष्टींचं खरं भावनिक मूल्य मला तपासावं लागेल. आज सभोवतालचं सदोदित बदलत असलेलं आणि म्हणूनच संतांनी मिथ्या मानलेलं जे जग आहे त्या जगाशीच माझी भावनिक जखडण आहे. या अशाश्वत जगाच्या मोहानं, आसक्तीनं माझं अंत:करण, माझं मन व्याप्त आहे. या मोह-आसक्तीचाच भवसागर या अंत:करणात, या मनात पसरला आहे. मन ओलांडता येणं अर्थात मनाच्या सवयी ओलांडता येणं कठीण असल्यामुळे हा भवसागर ओलांडता येणं कठीण आहे. ते आपल्या आवाक्यात नाही! हे कठीण काम सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या जोरावर अर्थात त्यांची आज्ञा अमलात आणूनच साधू शकेल. त्या आज्ञेनुसार मनाला वळण लावायचा प्रयत्न करावा लागेल. आज माझं भावनिक ऐक्य या देहाशी, प्रपंचाशी, जगाशी आहे. त्यामुळेच या देहाची, प्रपंचाची आसक्ती आहे, मोह आहे, चिंता आहे. हा देह, हा प्रपंच, हे जग सोडू नकोस. केवळ त्यांच्यासाठी मनात असलेली चिंता सोड, ही सद्गुरूंची मुख्य आज्ञा आहे! समर्थही सांगतात, ‘‘मना पावना भावना राघवाची, धरीं अंतरीं सोडिं चिंता भवाची!’’

 

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…