News Flash

२७७. अंतकाळ

केवळ श्रीसद्गुरूंच्या आधारानं ते सोसता येतं.

प्रपंचदु:खाचं हलाहल केवळ शिवभावानं पचविता येईल, पण आपल्याच अंतरंगातील इच्छा-अपेक्षांचं मरण सोसणं एवढं सोपं नसतंच. केवळ श्रीसद्गुरूंच्या आधारानं ते सोसता येतं. समर्थ म्हणूनच म्हणतात, ‘‘तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं!’’ हा अंत म्हणजे जसा मृत्यू आहे, तसाच हा अंत आहे इच्छांचा! श्रीगोंदवलेकर महाराज यांनीही ‘इच्छामरण’ या शब्दाची फोड इच्छांचं मरण, अशीच केली आहे. या चरणातला अंतकाळ म्हणजे मृत्यू आहे आणि तो मनातल्या इच्छा, वासना आणि अपेक्षांमुळेच त्रासदायक होतो, असं पू. बाबा बेलसरे यांनीही नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘सामान्यपणे जीवनात माणसाच्या सर्व वासना तृप्त होत नाहीत. त्या आज ना उद्या तृप्त होतील या आशेमध्ये तो जगतो. जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा अतृप्त  वासना त्यास मागे खेचतात, पण आयुष्य संपल्याकारणाने त्याला देह सोडावाच लागतो. या ओढाताणीमध्ये जीवाचे हाल होतात. जो माणूस भगवंताचे नामस्मरण अभ्यासतो त्याच्या एकंदर वासना मुळातच क्षीण होतात. शिवाय मृत्यू पावणाऱ्या जीवास पुढील जीवनक्रम दाखविण्याची व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेच्या नियमानुसार भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या जीवाला वरचा वर्ग मिळतो. त्याचा उल्लेख समर्थानी या दोन श्लोकांत (क्र. ८४ व ८५) केला आहे.’’ (सार्थ मनाचे श्लोक, श्रीसमर्थ सेवा मंडळ प्रकाशन, पृ. ७७, ७८). आता अंतकाळी वासनांचा, इच्छांचा कल्लोळ जीवाला अडकविणारा असतोच, पण मृत्यू फार दूरची गोष्ट झाली, जर हा इच्छा आणि अपेक्षांचा कल्लोळ जगत असतानाच ओसरला, तर किती बरं होईल! माणसाच्या मनातला इच्छांचा हा गुंता सुटणं मात्र फार कठीण असतं. केवळ सद्गुरू बोधानुसार जीवन जगण्याचा अभ्यास करीत गेलं, तरच इच्छांचा हा अंतकाळही आनंदानं स्वीकारता येतो. तेव्हा हा रामच, हा सद्गुरूच तुम्हाला त्या ‘अंतकाळी’ सोडवू शकेल, असं समर्थ सांगतात. त्यामुळे इच्छा-अपेक्षांत गुंतविणाऱ्या नश्वर जीवांच्या स्मरण, चिंतन, मनन आणि गुणगानात रमण्यापेक्षा या इच्छा-अपेक्षांतून सोडविणाऱ्या सद्गुरूचिन्तनात खरा आराम आहे, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ८६व्या श्लोकात सांगतात. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

मुखीं राम विश्राम तेंथेंचि आहे।

सदानंद आनंद सेऊनि राहे।

तयावीण तो सीण संदेहकारी।

निजधाम हें नाम शोकापहारी।। ८६ ।।

प्रचलित अर्थ : मुखात राम असेल तरच चित्तात विश्राम असतो. म्हणून हे मना, अखंड नामस्मरणाने तू निजानंदात रत होऊन राहा. रामावांचून बाकी सारे श्रमच आहेत. नाम हेच परमात्म्याचे निजधाम म्हणजे घर असून सर्व दु:ख आणि शोकाचे हरण करणारे आहे.

आता मननार्थाकडे वळू. समर्थ म्हणतात मुखी राम विश्राम तेथेची आहे.. ज्या मुखात रामाचं नाम आहे त्या जीवाला खरं मनाचं समाधान लाभतं. आता ती म्हण प्रसिद्धच आहे की, ‘मुख में राम बगल में छुरी!’ म्हणजे तोंडानं एका रामाचं नाम घ्यायचं, पण बगलेत नेहमीच त्या रामापासून दूर करणारी द्वैताची सुरी बाळगायची! अशाला खरा विश्राम मात्र लाभणार नाही. तेव्हा ‘मुखी राम’ म्हणताना ज्या रामाचं नाम मी घेत आहे त्या रामाला साजेसे माझे विचार आहेत का, त्या रामाला शोभेल असं माझं आचरण आहे का, हेसुद्धा अंतर्मुख होऊन तपासलं पाहिजे ना? लोक म्हणतात की नामात लक्ष लागत नाही! कसं लागेल? कारण मुखानं नाम घेत असताना मनात जर अहंभावयुक्त इच्छा, वासनांचाच रवंथ सुरू असेल तर त्या नामात विक्षेप येणारच. ते नाम अस्थिर होणारच. खरं तर नाम नव्हे, आपलं मनच अस्थिर असतं. तेव्हा नाम घेताना ज्याचं नाम घेत आहोत त्याच्याशी एकरूप होण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय त्या नामात प्रेम, गोडी आणि आपलेपणा येणार नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:46 am

Web Title: samarth ramdas philosophy 177
Next Stories
1 २७६. समुद्रमंथन!
2 २७५. चुकीचा नेम
3 २७४. राम-भजन
Just Now!
X