रामाचं नाम नुसतं मुखानं घेत आहोत म्हणून विश्राम लाभणार नाही. तर रामाला साजेसा आचार, विचार आणि उच्चार होत नाही तोवर खरा विश्राम नाही! तेव्हा नाम घेताना ज्याचं नाम घेत आहोत त्याच्याशी एकरूप होण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय त्या नामात प्रेम, गोडी आणि आपलेपणा येणार नाही. तो जोवर येत नाही तोवर त्या नामानं खरं समाधान अर्थात खरा आंतरिक विश्राम लाभणार नाही. ज्याला असा खरा विश्राम लाभतो तोच सदानंदाचा आनंद सेवू शकतो. आता हा सद्गुरूच खरा सदानंदरूप शिवस्वरूप आहे! जी गोष्ट नित्य आनंदाची असते तीच नित्य आनंद देऊ  शकते. सुख-दु:खमिश्रित गोष्ट शाश्वत आनंद देऊ  शकत नाही. त्यामुळे शाश्वत परमात्म्याशी एकरूप असा सदानंदरूप सद्गुरूच खरा आनंद कोणता आणि तो कसा मिळवता येतो, हे सांगू शकतो. त्यासाठी ‘सेऊनी राहे’ साधलं पाहिजे! अर्थात त्याच्या बोधाचं सेवन आणि त्याची खरी सेवा म्हणजे त्या बोधानुरूप आचरण साधलं पाहिजे. तरच ज्या आनंदात तो सदा निमग्न आहे त्या आनंदाचं सेवन करता येईल. मग समर्थ त्या रामावीण जे जगणं आहे ते किती दु:खानं भरलं आहे हे सांगतात..

‘तयावीण तो सीण संदेहकारी। निजधाम हें नाम शोकापहारी।।’ पू. बाबा बेलसरे यांनी यातील तिसऱ्या चरणाचं अर्थविवेचन करताना म्हटलं आहे की, ‘संदेह शब्दामध्ये दिह धातू आहे. दिह म्हणजे माखणे, लेप लावणे, भ्रष्ट करणे, अपवित्र करणे, खराब करणे. सम् अधिक दिह म्हणजे संशय घेणे, अनिश्चितपणा येणे. स्वानंदाचे स्वच्छ प्रतिबिंब पडण्यासाठी अंत:करण स्थिर व स्वच्छ पाहिजे. संशयी वृत्तीने ते तसे राहू शकत नाही. अस्थिर व मलिन अंत:करणातील आनंद आपोआप लोपतो. जेथे आनंद नाही तेथे केवळ शीणच उरतो.’ थोडक्यात, नामानं जो आनंद उत्पन्न होतो तो अंत:करणात स्थिर व्हायला हवा असेल तर अंत:करणही स्थिरच हवं. नाम घेताना नामाविषयी संशय, ज्याचं ते नाम आहे त्याच्याविषयी संशय, ते ज्यानं दिलं त्याच्याविषयी संशय असेल तर ते नाम तरी स्थिरचित्तानं कसं घेतलं जाणार? आता कुणी म्हणेल, आम्हाला असा संशय कुठे आहे? तर नाम घेताना अंतरंगात अहंभावयुक्त इच्छा, अपेक्षांच्या पूर्तीची ओढ असण्यातच या संशयाचं बीज आहे! कारण मग प्रत्येक इच्छेची पूर्ती होत आहे की नाही, हे तपासलं जाणार. ती पूर्ती होत नसेल, तर इतकं नाम मी घेतो तरी असं का व्हावं, माझ्या मनासारखं का होऊ  नये, असा संशय उत्पन्न होणारच! मग मन नामात न लागता इच्छांची पूर्ती होत आहे की नाही, याकडेच लागणार. मग ते सतत शीणच प्राप्त करणार. या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर त्या नामाला नि:स्वार्थपणे चिकटलं पाहिजे. कारण समर्थ म्हणतात, ‘निजधाम हें नाम शोकापहारी!; हे नामच त्या रामाचं, त्या सद्गुरूचं ‘निजधाम’ आहे.. म्हणजे त्यांचा निवास या नामातच आहे! नामाशी ते सदोदित एकरूप आहेत. भगवंतांनीही गीतेत म्हटलं आहे ना? की जिथे माझं नाम आहे तिथे मी आहे! आणि जिथे सर्वसमर्थ सद्गुरू आहे तिथे शोक, दु:ख, क्लेश असू शकेल का हो? कारण बरंचसं दु:ख हे ‘मी’पणातूनच वाटय़ाला येतं. अज्ञान, मोह, भ्रम यामुळेच वाटय़ाला येतं. जिथे सद्गुरू आहेत तिथे भ्रम, मोह, अज्ञान यांना थारा नाही. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात दु:ख नाही. त्यांचं सान्निध्यच शोकापहारी आहे! म्हणून हे मना, ज्या नामात त्यांचा नित्य वास आहे त्या नामातच तूही निवास कर. त्या नामाचाच आधार खरा वाटू दे. सद्गुरूंचा हा जो नामातला वास आहे, तो सूक्ष्मच असतो. नाम घेता घेता मन सूक्ष्म झालं.. अर्थात स्थूल जगाच्या आसक्तीचा प्रभाव दूर होत गेला की आपलं मनही नामात एकाग्र होतं. म्हणजेच तेही सूक्ष्म होत जातं.