मन जसजसं सूक्ष्म होत जाईल तसतसा सूक्ष्मातच ज्यांचा निवास आहे त्या सद्गुरूंशी खरा आंतरिक संग सुरू होईल. आता सद्गुरूंचा सूक्ष्मात निवास आहे म्हणजे काय, हे जाणण्यासाठी आधी आपला स्थूलात सततचा जो निवास आहे, तो जाणला पाहिजे. आपल्या अवतीभवतीचं, आपल्याला जाणवणारं जग कसं आहे? तर ते स्थूल आहे. स्थूलमानानंच ते आपण जाणतो. त्यामागचं सूक्ष्म तत्त्व आपल्याला माहीत नाही. आता या स्थूल जगाची सततची ओढ ही बाह्य़ाकडेच आहे. बाह्य़ पसारा वाढविण्याकडेच आहे. त्यामुळे या स्थूलाच्या प्रभावानं मनही बाह्य़ प्रभावात अडकलं आहे. सद्गुरूंचं अंत:करण हे सदोदित सूक्ष्म अशा परमतत्त्वातच विलीन आहे. त्यामुळे त्यांच्या चित्तावर बाह्य़ जगाचा, त्यातील चढउतारांचा कोणताही प्रभाव पडत नाही. स्थूल चराचरामागचं सूक्ष्म तत्त्वच ते जाणतात आणि सदोदित त्यातच रममाण असतात. जेव्हा आपल्यावरचा बाह्य़ जगाचा प्रभाव कमी होतो, ओसरतो तसतसं आपलं मनही सूक्ष्म होत जातं आणि मग त्या सूक्ष्माशीच एकरूप अशा सद्गुरूंशी आपला आंतरिक संग सुरू होतो. मग त्या संगानंच भ्रम, मोह आपोआप दूर होऊ लागतात. कोणत्या परिस्थितीत काय करायला हवं, कोणाशी कसं वागायला हवं, ते कळत जातं. आचार, विचार आणि उच्चार यातली विसंगती त्यामुळे संपते. ती संपल्यानं शोकाचं कारणच उरत नाही. म्हणून समर्थही म्हणतात, ‘‘निजधाम हे नाम शोकापहारी!’’ आता मनोबोधाच्या पुढील म्हणजे ८७व्या श्लोकात या नामानं सर्व कामनांचा कसा निरास होतो आणि भक्तात एक विलक्षण धैर्य कसं निर्माण होतं, हे समर्थ सांगतात. त्याचबरोबर ते रामाशी आणि नामाशी सदा एकरूप अशा मारूतीचाही फार सूचक उल्लेख करतात. त्या श्लोकाकडे आता आपण वळू. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना।

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना।

हरीभक्त तो शक्त कामास मारी।

जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी।। ८७।।

प्रचलित अर्थ : ज्याच्या मुखी रामाचं नाम आहे त्याला कामाची पीडा होत नाही. नामसंकीर्तनाच्या योगाने (गुणें) विषयवासनांशी झगडण्यात त्याचे धैर्य चळत नाही. म्हणजे तो सर्व अंतर्बाह्य़ रिपूंवर विजय मिळवतो. हरिभक्त हा हरिभक्तीच्या गुणेंकरून मोठा बलिष्ठ असतो व म्हणून तो कामादिकांस जिंकतो, असे ब्रह्मचारी मारूतीराय धन्य होत!

आता मननार्थाकडे वळू. मनाच्या श्लोकांचं विवेचन करणाऱ्या बहुतेक सर्वच जाणकारांनी या श्लोकातील ‘काम’ म्हणजे कामवासना म्हणूनच गृहित धरलं आहे. प्रत्यक्षात या श्लोकात काम म्हणजे कामना, असाच व्यापक रोख आहे. तरीही माणसाच्या जीवनावर सर्व वासनांमध्ये कामवासनेचा प्रभाव सर्वाधिक असतो. कामवासनेची जीवनावर अंमल गाजवण्याची शक्ती मोठी व्यापक असते आणि मनाच्या जडणघडणीच्या काळापासून कामवासनाही मोठा प्रभाव टाकत असल्यानं माणसाच्या अनेक कृतींच्या तळाशी सुप्त आणि त्यालाही उमगणार नाहीत अशा कामहेतूंचे संस्कारही असतात. त्यामुळे कल्पना, विचार आणि चिंतनाच्या सूक्ष्म मार्गानं प्रवेश करीत मनावर, बुद्धीवर आणि चित्तावर प्रभाव टाकणाऱ्या कामवासनेला सामोरं कसं जावं, हे प्राथमिक टप्प्यात साधकाला उकलत नाही. नव्हे अगदी शेवटच्या टप्प्यावरही या वासनेतून मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे या कामवासनेतून नव्हे तर तिच्या प्रभावातून स्वतंत्र कसं व्हावं, हा साधकाच्या मनातला मोठा प्रामाणिक प्रश्न असतो. या प्रश्नाचं एकच एक उत्तर नसलं तरी ज्याला त्याला मनातला हा सूक्ष्म गुंता सोडवावाच लागतो.

चैतन्य प्रेम