‘देहच मी’, हा देहभाव काल्पनिक आहे. त्या कल्पनेतूनच देहबुद्धीनं आपला पाया बळकट केला आहे. त्यामुळे ते देहभान विसरल्याशिवाय खरं आत्मसुख लाभणार नाही, असं अध्यात्म सांगतं. मग काहींना वाटतं की, देहच मी, हा देहभाव जसा काल्पनिक आहे, तशीच देहभान विसरणं, ही सुद्धा कल्पनाच नाही का? उलट देह असताना देह नसल्याचं मानणं ही तर सरळसरळ कल्पनेची परिसीमाच नाही का? तर याचा थोडा विचार करू. देहभान विसरणं म्हणजे देह नाकारणं नाही. देह माझा आहे, पण देहच मी नाही, या वास्तवाचं भान आणणं आहे! देहाशिवाय या जगात क्षणभरही जगता येत नाही आणि जगणं सुखाचं व्हावं म्हणून देह निरोगी राखण्याचा आपला प्रयत्न असतो. मग असं असताना, देहाचं इतकं महत्त्व असताना, या देहाला अपायकारक अशी व्यसनंही आपण का करतो? मग देहाचं खरं महत्त्वच आपल्याला माहीत नाही, असंच म्हणावं लागेल. खूप मागे दृष्टी जात असलेला एक तरुण भेटला होता. त्याच्या आप्तांची प्रामाणिक इच्छा ही होती की प्रार्थनेनं तो बरा व्हावा. त्यांना समजावलं, असं होऊ शकत नाही. प्रार्थना ही परिस्थितीचा स्वीकार करून तिला सामोरं जाण्यासाठी मनाची शक्ती मिळवण्यासाठी असते. परिस्थिती बदलण्यासाठी नव्हे. आणि जिथे देहाचा प्रश्न आहे तर त्यावर योग्य वैद्यकीय उपचारांनाच प्राधान्य द्यायला हवं. पण जेव्हा दृष्टीच जात आहे आणि ती परत येणं अशक्य आहे, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत तर थोडा विचार करा. ही गोष्ट आपल्याही बाबतीत घडू शकत नाही का? जर अशी दृष्टी जाऊ लागली, कानांची श्रवणक्षमता ओसरू लागली, पायांची चालण्याची ताकद मंदावू लागली, तर आपण काय करू शकतो? वैद्यकीय उपचार निष्प्रभ ठरले तर आपणही काहीच करू शकत नाही. बरं कृत्रिम अवयव बसवता येतो तिथे लाखोंचा खर्च होतो. या शरीरात हात, पाय, डोळे, कान वगैरे अवयवांत काही बिघाड झाला तर प्रत्येक कृत्रिम अवयवासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मग हा देह आपल्याला काय किमतीला मिळाला? तर फुकटच मिळाला! आणि जी गोष्ट फुकट मिळते तिची किंमत कळत नाही.. तर देहभान विसरणं ही कल्पना वाटत असेल तर देह असताना त्याच्या खऱ्या उपयोगाचं भान न बाळगता मनोभावाप्रमाणे देह वापरून मोहभ्रमयुक्त देहभाव जोपासण्याची कल्पनाच जास्त घातक नाही का? तर देहभान विसरणं म्हणजे देहच मी, या कल्पनेचा प्रभाव कमी करणं. त्या कल्पनेनुसार भ्रम आणि मोहानुसारचं जगणं कमी करणं. जागेपणीच्या साऱ्या चिंता या देहालाच चिकटून असतात. झोपी गेल्यावर हा देहही विसरला जातो , ‘मी’ आणि ‘माझे’चं भानही कमी होतं आणि चिंताही काही काळ जणू विसरल्या जातात. चिंता आणि काळजीनं झाकोळले असतानाही जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपलं मन थोडं हलकं होतं, याचं कारण हेच की त्या झोपेच्या अवधीपुरतं तरी देहभान विलयाला गेलं असतं, मनावरचं ओझं गेलं असतं! जर झोपेत हे साधू शकतं तर जागेपणी ते का साधू नये? ते साधणं कठीण भासत असलं तरी अशक्य नाही, असा संतांचा सांगावा आहे. समस्त साधनेचा अभ्यास त्याचसाठी तर आहे. साधनाभ्यासाचा हेतूच देहभावाचा आणि मनोभावाचा प्रभाव कमी करणं हाच आहे. मी मला जे मानतो त्या संकुचित वर्तुळातून व्यापक परीघात मला नेणं आहे. त्यासाठी देहच मी ही संकुचित कल्पना सोडून आत्मस्वरूपच मी, ही (भले या घडीला कल्पनाच का वाटेना, पण तरीही) व्यापक अशी संकल्पना जवळ करायची आहे. काटय़ानं काटा काढावा त्याप्रमाणे ‘देहच मी’ या कल्पनेचा काटा ‘आत्मस्वरूपच मी’ या संकल्पनेच्या काटय़ानं काढायचा आहे.
-चैतन्य प्रेम

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान