मागेच आपण पाहिलं होतं की, कामवासनाच नव्हे तर सर्वच आंतरिक वासना ऊर्मीचं जोवर सहज नियमन होत नाही, तोवर मनाची शक्ती गोळा होऊन मन एकाग्र होत नाही. मोठमोठे शोध ज्यांनी लावले, समाजाला दिशा देणारी उत्तुंग कार्ये ज्यांनी उभारली, कलेमध्ये स्वत:ला विरघळवून टाकून ज्यांनी प्रातिभ झेप घेतली; त्यांनाही मनाच्या एकाग्रतेशिवाय ते साधलेलं नाही. मग साधना पथावरही त्याची गरज नाही का? मन एकाग्र होणं म्हणजे मनाचा विसर पडणं! मनाचा विसर पडणं म्हणजे तरी काय? तर जी गोष्ट करीत आहोत त्या गोष्टीशी इतकं तल्लीन होणं, एकरूप होणं की मनातल्या इच्छा, अपेक्षांचा पूर्ण विसर पडणं. ‘मी’ आणि ‘माझे’ यांच्याशी जखडलेल्या सर्व कामना, वासना यांचा विसर पडणं. जेव्हा मन ‘मी’ आणि ‘माझे’च्या संकुचित जाणीव-जोखडांतून मुक्त होतं, तेव्हाच ते अत्यंत व्यापक होत सर्वव्यापी होऊ  लागतं. सर्व तऱ्हेच्या व्यग्रतेतून ते मोकळं होतं आणि सहज एकाग्र होऊ  लागतं. जोवर मनात कामनांचा जोर आहे तोवर मन व्यापक आणि एकाग्र होणं शक्य नाही. हा कामनांचा जोर ओसरण्यासाठी मनाच्या मननाचा, चित्ताच्या चिंतनाचा, बुद्धीच्या बोधाचा आधारही तेवढाच व्यापक हवा. ‘राम’ अर्थात परमतत्त्व सद्गुरू हाच तो आधार आहे! म्हणून समर्थ म्हणतात की, ‘‘मुखी राम त्या काम बाधू शकेना!’’ आता ‘मुखी राम’ म्हणजे नुसतं तोंडानं रामनाम घेणं नाही बरं का! हे ‘मुख’ म्हणजे नुसतं तोंड नव्हे! तर ज्या ज्या मार्गानी बाहेरचं दृश्य जग मी आत घेतो, त्या जगाचे संस्कार ग्रहण करतो ते सारे मार्ग ‘मुख’च आहेत! अर्थात ज्या डोळ्यांनी मी जगाचं दृश्यरूप ग्रहण करतो, ज्या कानांनी मी जगाचं श्राव्यरूप ग्रहण करतो, ज्या बुद्धीनं मला या जगाचा बोध होतो.. हे सारे ‘बाहेरून आत’ जाणारे मार्ग ‘मुख’च आहेत. तेव्हा ज्याच्या मुखी राम आहे, म्हणजेच ज्या ज्या इंद्रियांद्वारे आपण जगाशी संलग्न होतो त्या त्या इंद्रियद्वारांशी त्या सद्गुरूचीच जाणीव स्थापित असेल तर आपल्याला कामनांची बाधा होणार नाही.. कामनाबाधेचं कोणतंही भय नाही! मग समर्थ म्हणतात, ‘‘गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना!’’ या चरणाचा अर्थ फार व्यापक आहे. हा चरण सांगतो की, ज्याचं मन सद्गुरूंशी संलग्न होत आहे अशा साधकाचे कोणतेही गुण त्याच्या इष्टप्राप्तीसाठी आवश्यक अशा धैर्याच्या आड येत नाहीत! सद्गुरूंच्या सांगण्यानुसार जगणं, हे जर माझ्या जीवनाचं ध्येय असेल तर ते जगण्याच्या आड माझ्यातले जे जे गुण येतात ते दूर सारणं मला साधलं पाहिजे. यासाठी जे धैर्य लागतं ते त्याच्यात सहजपणे येतं. आता हे गुण म्हणजे सत्, रज आणि तम! रजोगुण आणि तमोगुण माझ्या इष्टप्राप्तीच्या आड येतात, रजो आणि तमोगुणांमुळे माझं अनिष्टच अनेकदा ओढवतं, हे आपल्याला पटतं, पण सत्त्वगुण बाधक कसा काय होऊ  शकतो, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर प्रत्यक्षात रजो आणि तमोगुणातून एक वेळ सुटणं सोपं आहे, पण सत्त्वगुणाच्या पकडीतून सुटता येणं फार कठीण आहे. सत्त्वगुणामुळे माणूस दुसऱ्यासाठी कष्ट करतो, पण त्यातून कर्तृत्वाचा सात्त्विक अहंकार उत्पन्न होण्याचा मोठाच धोका असतो. सात्त्विक अहंकाराच्या पकडीत माणूस अडकला की ‘मी’ आणि ‘माझे’ची पकडही घट्ट होते. हट्टाग्रह, दुराग्रह पक्का होत जातो. जे इष्ट आहे त्याचा विसर पडून माणूस अनिष्ट तेच करतो. यावरही उपाय एकच.. ‘मुखी राम’ असलाच पाहिजे! जग आणि आपल्यामध्ये सद्गुरूंची जाणीव जागती पाहिजे! तरच व्यापक होण्याच्या मार्गात जे जे आड येत असेल ते ते ओलांडून पुढं जाण्याचं धैर्य, धारिष्ट त्याच्यात निर्माण होईल.

चैतन्य प्रेम

(चूकभूल : मंगळवार अंकातील साधक-बाधकया लेखांकाचा क्रमांक २७९ असा हवा होता. तो चुकून २८०सा छापलेला आहे. )