26 September 2020

News Flash

२८१. मारुती

'मनोबोधा'च्या ८७व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणात प्रभु रामचंद्रांचा निस्सीम भक्त असलेल्या हनुमंतांचा उल्लेख आहे.

‘मनोबोधा’च्या ८७व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणात प्रभु रामचंद्रांचा निस्सीम भक्त असलेल्या हनुमंतांचा उल्लेख आहे. ‘हरीभक्त’ आणि ‘ब्रह्मचारी’ असं त्याचं वर्णन समर्थानी केलं आहे. ‘हरी’ आणि ‘ब्रह्म’ या दोन व्यापक संकल्पनांचा विस्तृत मागोवा आपण ‘हरिपाठा’वरील ‘अनादि-अनंत’ या सदरात आणि ‘गुरुगीते’वरील ‘पूर्ण-अपूर्ण’ या सदरात घेतला आहेच. हरी म्हणजे जिवाच्या समस्त भवदु:खाचं हरण करणारा सद्गुरू. त्या हरीनं जीवन कसं जगावं, कसं व्यतीत करावं, हे सांगण्यासाठी जो पाठ जिवाला दिला आहे, जो बोध केला आहे तो म्हणजे ‘हरिपाठ’! ‘गुरुगीते’त तर सद्गुरू हाच साक्षात अर्थात डोळ्यांना दिसणारं ब्रह्म आहे, असं भगवान शंकरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पार्वतीमातेनं भगवान शंकरांना प्रश्न केला की, “हे स्वामी! असा कोणता उपाय आहे की ज्यायोगे देही म्हणजे देह लाभलेला मनुष्य ब्रह्ममय होईल?” या प्रश्नाचं व्यापक उत्तर म्हणजे ‘गुरुगीता’! पार्वतीमातेच्या या प्रश्नावर शिवजी म्हणाले की, “देहात असलेला मनुष्य ब्रह्ममय कसा बनेल, हे जाणण्याआधी मुळात ब्रह्म म्हणजे काय, हेच जाणलं पाहिजे!” आणि मग भगवान शंकरांनी सद्गुरुशिवाय ब्रह्म अन्य नाहीच असं त्रिवार सांगितलं.. गुरुविना न ब्रह्म अन्यत् सत्यम सत्यम वरानने! प्रभु रामचंद्र हेच मारुतीला सद्गुरूस्थानी होते आणि त्यामुळे सद्गुरुंच्या सेवेत अखंड रममाण असलेला मारुती हा निस्सीम हरिभक्तीचं प्रतीक आहे. परब्रह्मस्वरूप अशा सद्गुरुंच्या बोधानुरूप विचरण करणारा, त्या सद्गुरूभावातच जीवन जगणारा मारुती हा खरा ब्रह्मचारी आहे. असा जो सद्गुरू भावात स्थित होईल त्याच्या अंत:करणातील कामना आपोआप ओसरतील, यात काय शंका? भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या बोधाच्या आधारे प्र. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मनोबोधामृत’ या पुस्तकात या चरणात ‘मारुती’चा वेगळाच अर्थ दिला आहे आणि तोही मार्मिक आहे. त्यात म्हटलं आहे की, ” सद्गुरूंना शरण गेलेला भक्त श्वसोच्छवासाबरोबर नामस्मरण करून आत्मानुभव मिळवतो. तो आत्माच वायुपुत्र मारुती! परब्रह्मामध्ये राहणारा हा ब्रह्मचारीच जगात धन्य होय.” आता ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ८८व्या श्लोकात या नामाचा महिमा पुन्हा सांगितला आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू, मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

बहू चांगलें नाम या राघवाचें।

अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें।

करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें।

जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें।। ८८।।

प्रचलित अर्थ : ‘राम’ हे नाम फार चांगले आहे, मधुर आहे. ते फार सुंदर, साजिरेआहे. ते स्वल्प म्हणजे अवघे दोन अक्षरांचे आहे. ते सोपे आहे आणि फुकट मिळालेले आहे. असे असूनही ते भवाचे मूळ निर्मूळ करते. म्हणजे जन्माचे मूळ अशी जी वासना तिचे बीजच जाळून टाकते. मानवांना नाम हेच कैवल्य आहे.

आता मननार्थाकडे वळू. नाम किती साधं, सोपं आणि सहज घेता येईल असं आहे, पण ते किती व्यापक कार्य करतं, हे या श्लोकात सांगितलं आहे. यात एक फार मोठा अर्थगर्भ शब्द आला आहे, तो म्हणजे ‘कैवल्य’! कैवल्याचं बरच विवरण अनेक जाणकारांनी आजवर केलं आहे. कैवल्य म्हणजे स्वानंदाची प्राप्ती, असाही अर्थ आहे. पण ‘कैवल्य’ शब्दात ‘केवळ’ हाच अर्थ प्रस्फुटित होतो! केवळ एका सद्गुरुभावात जे विलीन करतं ते कैवल्य! आणि नाम हा अनुभव दृढ करतं. या राघवाचं, या सद्गुरुचं नाम कसं आहे? ते सोपेपणानं मिळालेलं आहे आणि ते फुकट आहे! मीराबाईंनीही एका भजनात म्हंटल आहे की, या अनमोल रामनामाचा मला काहीच मोल खर्चावं लागलं नाही!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 2:37 am

Web Title: samarth ramdas philosophy 181
Next Stories
1 २८०. कामना-बाधा
2 २८०. साधक-बाधक
3 २७८. नाम-धाम
Just Now!
X