सत्त्प्रवृत्त साधकांच्या संगतीतही आपलं परम तत्त्वाचं भान वाढण्याऐवजी शाब्दिक ज्ञानचर्चेचीच लालसा वाढू लागते. तेव्हा संत असोत की सत्त्प्रवृत्त साधक; आपल्या संकुचितपणाचं भान जिथं ओसरत नाही तिथं व्यापक परमतत्त्वाचं भान कुठून यावं? त्यामुळे ‘जनी’ म्हणजे संत-सत्पुरुष आणि सत्प्रवृत्त साधकांच्या संगतीतही वाचेनं नाम वदावं, असं समर्थ सांगतात. आता ही जी वाचा आहे तीसुद्धा स्थूल आणि सूक्ष्म आहे. प्रकट आणि अप्रकट आहे. व्यक्त आणि अव्यक्त आहे. अर्थात वैखरीनं जे व्यक्त बोलणं आहे ते आणि मनातल्या मनात सुरू असलेलं जे अव्यक्त बोलणं आहे ते.. या दोन्ही पातळ्यांवर परमतत्त्वाचंच चिंतन, मनन, धारणा साधायला समर्थ सांगत आहेत.  आता हे परमतत्त्व म्हणजेच सद्गुरूंनी सांगितलेला जो बोध आहे तो.. त्यांचं सांगणं, त्यांचं वागणं, याचं हे चिंतन आहे. आता पुढचा शब्द आहे ‘भोजनी’! भोजनी म्हणजे जेवताना, हा अर्थच घेतला जातो. पण हे जे ‘जेवण’ आहे, भोजन आहे, अन्नग्रहण आहे ते फार व्यापक आहे. पण आपण काय खातो, यालाही महत्त्व आहेच. सकस अन्न ग्रहण आपण करीत असू तर त्यानं शरीर पुष्ट होतं. निकृष्ट, दूषित अन्न आपण सेवन करीत असू तर त्यानं शरीर प्रकृतीवर वाईट परिणाम होतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांचेही विविध आहार सुरू असतात! कान, नाक, डोळे आदिंनी बाह्य़ जगच तर आपण आत घेत असतो. जर या जगातलं हिणकस, अशाश्वत जे आहे तेच आपण ग्रहण करीत गेलो तर त्यानं मन पुष्ट होणार नाही. उलट मन अधिकाधिक दूषित आणि हीन होत जाईल. अगदी त्याचप्रमाणे जर या बाह्य़ जगात.. या अशाश्वत जगातही जे शाश्वत आहे त्याचंच ग्रहण या इंद्रियांवाटे होत गेलं तर मन भावपुष्ट होत जाईल. आता पू. बाबा बेलसरे म्हणतात त्याप्रमाणे, आपल्याला ऐकायची हौस असतेच, पण त्याचबरोबर आपल्याला इच्छा नसलेलं ऐकावं लागतं ते वेगळंच. आपल्याला पाहायची हौस असते, पण त्याचबरोबर इच्छा नसतानाही पाहावं लागतं ते वेगळंच. अर्थात आपल्या इंद्रियांना खरी विश्रांती अशी नाहीच. त्यांचं ‘भोजन’ इच्छा असो की नसो, सतत सुरूच आहे. मग ते भोजन करतानाही समर्थ सांगतात.. नाम वाचे वदावे! या ‘भोजना’लाही नामाची जोड असावी. नामाचा अर्थात सद्गुरूबोधाच्या चिंतनाचा, मननाचा आधार असावा. कारण आज बाह्य़ जगात अनंत मार्गानी विखारी, विकारी गोष्टी आपल्या इंद्रियद्वारांशी येऊन थडकत असतात. मन त्यात रमतही असतं आणि त्यानुरूप मनाची घडणही घडत-बिघडत असते. हा प्रभाव थोपवणं सोपं नाहीच. त्यामुळे इंद्रियांना त्यांचे त्यांचे विषय यथायोग्य मार्गानी आणि यथातथ्य प्रमाणात भोगू देऊन मन हळूहळू त्यांच्या प्रभावातून दूर व्हायला हवं असेल तर ते केवळ सद्गुरूबोधानुसारच घडेल. जीवनाची खरी अशाश्वतता समजली तर जगताना स्वार्थप्रेरित आनंद मिळवण्यासाठीच्या अट्टहासातील फोलपणा उमगू लागेल. त्यासाठी सद्गुरू धारणेचं भान, ध्यान आणि जाण आवश्यक आहे. ‘भोजनी’ या शब्दाची आणखीही एक अर्थछटा आहे. सार्वजनिक समारंभात भोजनाच्या पंगतीत बरेचदा अनोळखी माणसंही आपल्या जोडीला असतात. अगदी त्याचप्रमाणे या जीवनातही अनंत माणसांशी आपला अल्पसंबंधही येतो. त्या संबंधांमध्ये वावरतानाही परम तत्त्वाचं भान जपता आलं पाहिजे. माझ्या जन्माचं उद्दिष्ट काय, उद्देश काय, मी का जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे, हे जसजसं नेमकेपणानं उमगू लागेल तेव्हा खरी अंतर्यात्रा सुरू होईल. मी कशासाठी जगलं पाहिजे, हे कळत गेलं तर माझं जगणं त्यानुसार सुरू आहे का, याची आंतरिक तपासणीही प्रामाणिकपणे होऊ लागेल. ही तपासणी सुरू झाली की खरा स्वाध्याय सुरू होईल.

चैतन्य प्रेम