दृश्य – अर्थात व्यक्त जग – जे आहे ते खरं वाटतं, त्याचा जिताजागता अनुभव येतो. भगवंताचा मात्र तसा प्रत्यक्ष अनुभव नसतो, त्यामुळे तो ‘आहे’ असं मानत असतानाही तो ‘आहेच’ असा अनुभव नसल्यानं अनुभवानं मनात पक्क्या रुतलेल्या जगाचा प्रभाव केवळ त्याच्या नामानं दूर होईल, ही गोष्टसुद्धा मनाला पटत नाही! त्यामुळे मुखानं भगवंताचं नाम सुरू आहे, पण मन मात्र त्याच्याकडे नव्हे तर जगाकडेच घसरत आहे, हाच अनुभव येतो. त्यामुळे मन नामस्मरणातच टाळाटाळ करतं. अशा या मनाला समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ९१व्या श्लोकात समजावीत आहेत. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू, मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा  आहे:

नको वीट मानूं रघुनायेकाचा।

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

अति आदरें बोलिजे राम वाचा।

न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा।। ९१।।

प्रचलित अर्थ : हे मना, नामस्मरणाचा कंटाळा करू नकोस, अत्यादरपूर्वक वाचेने रामनाम घेत जा. यात तुझे काहीच वेचत नाही, खर्च होत नाही. उलट अनायास रामाची भेट होते. मुखानं सीतापती रामाचा जयघोष कर, म्हणजे त्याची प्राप्ती होईल.

आता मननार्थाकडे वळू. नामाचा प्रभाव काय आहे, ते आपण गेल्या काही भागांत पाहिलं. भगवंताचं सगुण रूप आणि भगवंताचं निर्गुण रूप यांच्यातला दुवा नाम आहे. ते नाम आपल्याला सगुणाच्या जाणिवेपासून निर्गुणाच्या जाणिवेपर्यंत नेतं. सुरुवातीला नाम सुरू असताना ते ज्यानं प्रथम सांगितलं त्या सद्गुरूंची जाणीव मनात असते, त्या जोडीला ते नाम ज्या इष्ट देवाचं आहे त्याची जाणीव असते. त्याचबरोबर आपल्या दृश्य जगातील दृश्य प्रपंचातील समस्या, अडीअडचणी याही ‘दिसत’ असतातच! त्यांची बोचरी जाणीव सर्वात अधिक असते. मग हळूहळू क्वचित असंही होतं की सद्गुरू स्मरण वगळता अन्य सर्व जाणिवा क्षणार्धासाठी लोप पावतात. तेवढय़ाशा क्षणार्धातही मनावरचं बोचऱ्या जाणिवेचं ओझं दूर होत असल्याने मनाला जो चिंतामुक्त स्थितीचा अनुभव येतो तोही मोठा हवाहवासा वाटतो. काही जण म्हणतात की जप असा सुरू झाला की झोप येते! याचं कारणही ही चिंतामुक्त अवस्थाच आहे! कारण मनावरचा ताण इतका दूर होतो की तोवर जाणिवेच्या ओझ्यानं दबलेल्या आणि तळमळत असलेल्या मनाला खरी विश्रांती लाभते. याच वेळी आळसानं आपल्या मनाचा ताबा घेऊ  नये यासाठी मात्र जागरूक राहावं लागतं. अशा जागरूक मनाला मग जगाचं खरं रूप उमगू लागतं. एकदा जगाचं अशाश्वत रूप मनाला उमगू लागलं की मनाचं त्यामागे फरफटत जाणंही कमी होऊ  लागतं. भवरोग दूर होऊ  लागतो. पण त्यासाठी नामाचा मार्ग दृढपणे अनुसरला पाहिजे. त्यात चिकाटी हवी, धैर्य हवं. म्हणूनच समर्थ सांगतात, ‘‘नको वीट मानूं रघुनायेकाचा। अति आदरें बोलिजे राम वाचा।’’ अर्थात सद्गुरूंनी जे सांगितलं आहे, जे नाम दिलं आहे, जी साधना सांगितली आहे, तिचा वीट मानू नकोस. अत्यंत आदराने, प्रेमपूर्वक, आवडीने, भावपूर्वक त्या रामाचं नाम घे. ‘वाचा’ म्हणजे व्यक्त होणं! माणूस हा त्याच्या आचार-विचारावरून जोखला जातो. त्याची ओळख त्यातून होते. तेव्हा तुझी प्रत्येक कृती म्हणजेच तुझं व्यक्त होणं, हे सद्गुरू स्मरणात असू दे, तुझ्या वागण्या-बोलण्याला शाश्वताच्या जाणिवेचा स्पर्श असू दे, जे ऐकशील त्यातलं शाश्वत तत्त्व ग्रहण करण्याचं वळण मनाला असू दे! थोडक्यात जे जे शाश्वत आहे त्याचा आदर, त्याची ओढ, त्याची आवड मनाला असू दे. जे जे अशाश्वत आहे त्याची उपेक्षा साधू दे. रामनामात वाचा अशी सिद्ध झाली पाहिजे!