त्या रामाचं, त्या सद्गुरूचं जे स्मरण आहे ते कसं करायचं आहे? तर, ‘‘अतिआदरें बोलिजे राम वाचा!’’ ते नुसत्या आदरानं नाही, तर अत्यंत आदरानं करायचं आहे. मागेच आपण पाहिलं की ‘वाचा’ म्हणजे व्यक्त होणं, हा अर्थ घेतला की ‘‘अतिआदरें बोलिजे राम वाचा,’’ याचा अर्थ तुझ्या वागण्या-बोलण्यात आणि आंतरिक धारणेत म्हणजेच आचार, विचार आणि उच्चारात एका रामाच्या अर्थात शाश्वताच्या जाणिवेचा स्पर्श असला पाहिजे. आणि ही गोष्ट अत्यंत आदरपूर्वक झाली पाहिजे! म्हणजेच जगात वावरताना याआधी आपण ‘मी’पणानं वावरत होतो. कोणत्याही प्रसंगात ‘मी’ दुखावला गेलो की आपण अविचाराने ग्रासत होतो. ‘मी कोण आहे माहीत नाही? माझ्याशी ही वर्तणूक? आता दाखवतोच की मी कोण आहे ते!,’ या आविर्भावात आपण जगत होतो. आता शाश्वताची जाणीव झाल्यावर, शाश्वताचं भान वाढू लागल्यावर ‘मी’चं क्षुद्रत्व, ‘मी’चं सामान्यपण लक्षात येईल. सद्गुरुचं असामान्यत्व, व्यापकत्व किंचित का होईना जाणवू लागेल. मग ‘मी’ कोण आहे यापेक्षा ‘मी कोणाचा आहे?’ याला अधिक महत्त्व येईल. ते महत्त्व अधिक लक्षात येऊ लागेल. ‘मी कोणाचा आहे?’ या धारणेनुसार, जाणिवेनुसार जगणं सुरू आहे का, याची आंतरिक तपासणी होईल. जर ते महत्त्वच उमगलं नसेल तर जगातला वावर त्यांची उपेक्षा, अनादर करणाराच असेल. अर्थात तो ‘मी’पणानंच असेल. तेव्हा समर्थ सांगत आहेत की, ‘मी’ ज्या सद्गुरूंचा आहे त्यांच्या बोधाची जाणीव जितकी वाढत जाईल तितकी ‘मी’पणाची जाणीव क्षीण होत जाईल. त्या बोधानुरूप आचरण व्हावं, असा प्रयत्न अत्यंत आदरपूर्वक सुरू होईल तेव्हाच त्या ‘मी’पणाचा लोप होत जाईल. या प्रक्रियेची सुरुवात आहे तोंडानं, वैखरीनं नाम घेण्यापासून! अनंत फुटकळ गोष्टी बोलण्यात आपण आपली वाचाशक्ती, आपला वेळ वाया घालवत असतो. त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. साधी गोष्ट घ्या. राजकारणावर आपण किती वेळ तावातावानं समरसून चर्चा करतो. त्या चर्चेनं काही बदल घडतो का? आपल्या आकलनात काही भर पडते का? विचाराची कक्षा रुंदावली, असं होतं का? तरी त्या चर्चेची गोडी वाटते. पण तेच नाम घ्यायची गोष्ट काढा! तोंडानं नुसतं नाम घेऊन काय होणार आहे, असा प्रश्न हमखास फेकला जातो! नाम घेऊन वेळ कशाला वाया घालवायचा, असंही काही जण बेलाशक म्हणतात! अशांना समर्थ खडसावतात की, ‘‘न वेचे मुखी सांपडे रे फुकाचा। करीं घोष त्या जानकीवल्लभाचा।।’’ मुखानं नाम घ्यायला तुला कसले कष्ट आहेत? तुझा काही खर्च का होतो त्यात? उलट तो अनायास प्राप्त होतो, अनायास त्याची भेट होते. म्हणून त्या सीतापती रामाचा मुखानं घोष कर.. त्याचा नामघोष कर.
आता, ‘‘न वेचे मुखी सांपडे रे फुकाचा,’’ याची आणखीही एक अर्थच्छटा आहे. ती म्हणजे, मुखानं नुसतं नाम घेणंही कामाचं नाही बरं का! ‘न वेचे मुखी,’ त्याला नुसतं मुखानं नामोच्चार करून वेचता येत नाही, मिळवता येत नाही.. तो ‘सांपडे रे फुकाचा’ आहे! तो सहज भावानं जगल्यास सहज मिळतो! आता हे सहज भावानं जगणं म्हणजे ‘मी’पणा फुंकून टाकणंच आहे! जोवर ‘मी’पणा टिकवायची धडपड आहे तोवर जगणं सहज नाही! त्या जगण्यात इच्छा, अपेक्षांचा ताण आहेच. तेव्हा नुसतं तोंडानं नाम घेऊन नव्हे तर त्या जोडीला ‘मी’पणा फुंकून टाकण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे सुरू ठेवल्यास तो राम, तो सद्गुरू सहजपणे मिळतो, फुकट मिळतो! म्हणून त्याचा घोष करायला सांगितलं आहे. इथं ‘जानकीवल्लभ’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे, कारण सीतेचं अवघं जीवन हे रामाशिवाय दुसरं काहीच नव्हतं! तशी अनन्यता इथं अभिप्रेत आहे.
–चैतन्य प्रेम
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 3:37 am