समर्थ सांगतात की, अत्यंत आदरानं, प्रेमानं भगवंताच्या नामाचा घोष केला पाहिजे. तसं झालं की काय घडतं? तर, ‘‘गिरीकंदरीं जाइजे दूर दोषें!’’ आता गिरिकंदर म्हणजे डोंगरातल्या गुंफा.. गुहा. आता नाम घेतल्यानं आपल्या अंत:करणातले दोष जंगलातल्या गुहांमध्ये पळून जातील, हे ऐकायलाही कसं वाटतं? याचा अर्थ नामानं दोष दूर होणार नाहीत तर पळून जातील, असाही होत नाही का? आणि दोषांनी गिरिकंदरीच का जावं? तेव्हा या चरणाचा गूढार्थ फार वेगळा असलाच पाहिजे आणि तो आहेही! त्यासाठी या श्लोकाचे हे पहिले दोन चरण पुन्हा वाचू. समर्थ म्हणतात, ‘‘अती आदरें सर्वही नामघोषें। गिरीकंदरीं जाइजे दूर दोषें।’’ अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं जेव्हा मुखानं नामघोष सुरू होईल आणि सर्व इंद्रियंही हळूहळू नाममय होऊ  लागतील तेव्हा काय घडेल? हे जाणण्यासाठी नाम घ्यायला लागण्याआधी अंत:करण कसं होतं, हे पाहिलं पाहिजे. तर ते एखाद्या निबीड अरण्याप्रमाणे होतं! कामक्रोधादि विकाररूपी श्वापदांच्या संचाराने, दुर्गुणांच्या दऱ्याखोऱ्यांनी ते अधिकच भयाण झालं होतं. हे मनही अंधाऱ्या गुहांनी अधिकच अंधारलं होतं. मनाच्या या गुंफांमध्ये खोलवर जहरी विचारांचे साप, विंचू सरपटत आणि वावरत होते. पण एकदा मुखानं नामोच्चार सुरू झाला आणि चित्र पालटू लागलं. आधी अंतरंगातल्या निबीड जंगलाची जाणीवच नव्हती. ती आता होऊ लागली. मनाच्या गुंफेतल्या श्वापदांचं हिंस्रपण उमगू लागलं. हा नामघोष मनाच्या खोल गुंफांमध्ये अगदी खोलवर, दूरवर झिरपू आणि पसरू लागला आणि दोषांना हादरे बसू लागले! नुसत्या नामघोषानं दोष दूर होत नाहीत बरं का, पण त्यांची जाणीव होऊ लागते. त्या दोषांपायी मनाची होणारी फरफट जाणवू लागते. कामक्रोधादि विकारांच्या प्रभावानं मन त्यांच्या ताब्यात कसं सहज जातं, ते उमगू लागतं. स्वबळानं यातला एकही दोष दूर करता येत नाही. उलट जितका प्रयत्न करावा तितका तो दोष उग्र रूप धारण करून आपल्यावर सत्ता गाजवू लागतो. यावरही एकच उपाय, नाम! कारण नाम घेत असतानाच आपलं विकारी आणि विखारी अंतरंग जाणवू लागतं. त्या जाणिवेत एक धोका असतो तो म्हणजे त्या जाणिवेमुळे नाम सुटू शकतं! मी इतका विकारी असताना नाम कसं घेऊ, असा विचार अडसर बनून नामाच्या आड उभा ठाकतो. त्यावर उपाय एकच, नाम हट्टानं घेत राहणं! वासनेतच आपला जन्म आहे त्यामुळे वासना स्वाभाविकपणे आपल्या सोबत आहेच. त्या वासनांचं विधिवत शक्य तेवढं शमन करावं, पण वासनापूर्ती हेच जीवनाचं लक्ष्य होऊ नये. कारण या लक्ष्याची पूर्ती अशक्य आहे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘‘वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. खरे म्हणजे खेळ जुनेच, पण आपली वासना मात्र नवीन असते.’’ तेव्हा देह आहे म्हटल्यावर त्या देहाची सावली असायचीच, त्याचप्रमाणे देहासोबत देहवासनाही असायचीच. पण रस्त्यानं चालताना आपण देहाची काळजी घेतो, सावलीची काळजी करीत नाही.. अगदी त्याचप्रमाणे साधनापथावर चालताना देहवासनांना आपण अग्रक्रम देत नाही. वासनापूर्ती हेच या पथावर येण्याआधीचं जीवनाचं लक्ष्य होतं. या पथावर आल्यावर वासनापूर्तीसाठीचा मनाचा सुप्त हट्टाग्रह नामघोषानं हळूहळू क्षीण होऊ  लागतो. वासना नष्ट होत नाहीत, पण त्यांची पकड सैल होऊ लागते. सद्गुरू बोधानुरूप जीवन जगण्याच्या अभ्यासाला जो जितकं प्राधान्य देईल त्या प्रमाणात ही प्रक्रिया वेगानं होते आणि निराश होण्याचं कारण नाही! कारण कधी चुकणं आणि कधी बरोबर येणं, यालाच तर अभ्यास म्हणतात. त्यामुळे कधी वासना उग्र रूप धारण करून मनाला खेचू लागेल तर कधी निर्वासन होण्याची इच्छा बलवत्तर होईल! पण मनापासून नामघोष सुरू राहिला तर त्याचे पडसाद अंत:करणातील जंगलातल्या मनोरूपी गुंफांमच्ये उमटतील. दोषांमधलं विषही शोषू लागतील!

-चैतन्य प्रेम