News Flash

१०८. मायपोटी

आपला प्रत्येकाचा जन्म झाला असला तरी त्या जन्मकाळच्या वेदनांचं ‘स्मरण’ आपल्याला या क्षणी नाही.

आपला प्रत्येकाचा जन्म झाला असला तरी त्या जन्मकाळच्या वेदनांचं ‘स्मरण’ आपल्याला या क्षणी नाही. मग जर ते स्मरणच नाही तर त्या वेदनांचं दु:ख किती मोठं आहे आणि ते चुकविण्यासाठी तरी प्रपंचातून विरक्त झालंच पाहिजे, हेदेखील प्रकर्षांनं पटणं कसं शक्य आहे? मग ‘‘बहू िहपुटी होइजे मायपोटीं। नको रे मना यातना तेचि मोठी। निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी।।’’ या श्लोकाचा काही वेगळा रोख आहे का? बरं यातले मायपोटी, गर्भवासी, बाळक हे शब्द जन्मकाळचंच वर्णन करतात, हे खरंच. त्यामुळे त्याचा प्रचलित अर्थही योग्य आहेच. पण साधकासाठीचा आणखी काय अर्थ असावा, याचं चिंतन करताना ‘मायपोटी’ हा शब्द वेगवेगळ्या अर्थछटांसह प्रकाशित झाला! मायपोटी म्हणजे आईच्या पोटी हा जसा एक अर्थ आहे तसाच माय म्हणजे माया हा अर्थ मानला तर मायपोटी म्हणजे मायेच्या पोटी, मायेच्या मुळे किंवा मायेच्या पोटात, अशी संगती लागते. साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत मिथ्या सोडण्याचा आणि सत्याचा स्वीकार करण्याचा अभ्यास सुरू होतो. मिथ्या जे आहे त्याचं भ्रामक रूप आणि त्यात गुंतण्यापायी वाया जाणारा वेळ, वाया जाणारी शक्ती आणि क्षमता यांची जाणीव झाली असते. जे सत्य आहे त्याच्या धारणेनं जीवन योग्य दिशेनं प्रवाहित होईल, हेदेखील जाणवलं असतं. तरीही जे मिथ्या आहे, मायिक आहे त्यातून सुटणं साधत नसतं! जे सत्य आहे त्याची धारणा टिकवणं साधलेलं नसतं! अशा साधकाला समर्थ सांगत आहेत की, मायेच्या पायी अनंत यातना भोगाव्या लागतात. मायेच्या कह्य़ात राहून जी दु:खं वाटय़ाला येतात त्यामुळे खिन्नता येते. आता ही जी दु:खं आहेत ती मानसिकच आहेत आणि मानसिक दु:खांइतकी मोठी दु:खं माणसाला माहीत नाहीत! माणूस एकवेळ देहदु:खं सहन करू शकतो, पण मनाचं निराश्रित होणं, एकाकी होणं, अपमानित होणं, उपेक्षित होणं, दुर्लक्षित होणं सहन करू शकत नाही! आणि हे सारं घडतं मायेच्याच पोटी.. मायेनं वेढून जगत असताना ती मायाच दिशाभूल करीत राहाते. त्यामुळे ज्या वाटेनं जाऊन दु:खच वाटय़ाला येणार आहे त्याच वाटेनं अनंतकाळ जात, ठेचकाळत राहूनही आपण सुखाचाच शोध घेत राहातो. त्यामुळे दु:खाच्या महासागरात आपण सुखाचे तरंग शोधण्याचा आणि टिकविण्याचा प्रयत्न करीत राहातो. ‘‘बहू िहपुटी होइजे मायपोटीं। नको रे मना यातना तेचि मोठी।’’ हा चरण जणू हेच यातनादु:खं सांगतो. साधनपथावर पहिली पावलं टाकत असतानाही मायेचं बोट सुटलेलं नसतं! उलट सत्याचा शोध घेत असल्याचं भासवत आपण साधनेच्या जोरावर असत्यच सुरक्षित ठेवण्याची इच्छाही जोपासत असतो. शाश्वत आत्मसुख हवं असल्याचं तोंडी म्हणत असतानाही अशाश्वताच्या आधारावर सुख शोधण्याची आपली धडपड थांबलेली नसते. तेव्हा मायेचं हे स्वरूप, तिचा प्रभाव आणि त्यापायी वाटय़ाला येणारी शाश्वत यातना ओळखायला समर्थ सांगत आहेत. यापुढचा ‘‘निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी।।’’ हा चरणही मोठा अर्थगर्भ आहे. सत्य उमगल्याचं भासत आहे आणि असत्यही सुटत नाही, शाश्वत आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी क्षीण का होईना, प्रयत्न सुरू आहेत, पण अशाश्वत सोडण्याचीही भीती वाटते, स्वबळावर विकार, वासना, वृत्तींचा निरोध अर्थात नियमन करण्याची धडपडही सुरू आहे, पण अंतर्मनाच्या गर्भात दडपलेलं वासनेचं बीज काही नष्ट झालेलं नाही, अशा अवस्थेतल्या यातनापूर्ण मनोदशेचं हे चित्र आहे! आणि ‘अधोमूख’ हा शब्द तर किंचित जागृत झालेली कुंडलिनी शक्ती या स्थितीमुळे उलटय़ा प्रवासाला निघाली तर ओढवणाऱ्या धोक्याचं सूचनही करतो!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 2:39 am

Web Title: samarth ramdas philosophy 20
Next Stories
1 १०७. जन्मदु:ख!
2 १०६. कल्पनांचे काटे
3 १०५. मिथ्य सोडूनि द्यावे
Just Now!
X