अजामिळाच्या आयुष्याच्या अखेरीस जो ‘मुक्तिदाता’ क्षण आला त्याकडे वळण्याआधी ‘श्रीमद्भागवता’त पापकर्म आणि प्रायश्चित्त याबाबत जो उहापोह झाला आहे, तो लक्षात घेऊ. राजा परीक्षिताला शुकदेव हे ‘भागवत’ सांगत आहेत. शुकदेव सांगतात की, मन, वाणी आणि शरीर या तीन माध्यमांद्वारे माणूस तीन प्रकारचं पाप करतो. अर्थात मानसिक, वाचिक आणि कायिक पापं माणसाच्या हातून होत असतात. आता ही पापं काय असतात? आपण सर्वसाधारणपणे मानतो की, मनात वाईट विचार येणं, हे मानसिक पाप आहे. मुखानं वाईट बोलणं, हे वाचिक पाप आहे आणि शरीरानं वाईट कृत्य करणं, हे कायिक पाप आहे. यात मानसिक पाप आपण सर्वात कमी प्रतीचं आणि कायिक पाप हे सर्वात वाईट मानतो. त्यातही मेख अशी की, हे ‘वाईट’  म्हणजे नेमकं काय, हे सांगता येत नाही. कोणतं कृत्य ‘वाईट’ , कोणतं बोलणं ‘वाईट’  आणि कोणते विचार मनात येणं ‘वाईट’ ; याबद्दल अनंत मतमतांतरे आहेत. आपण साधनपथावर आहोत आणि त्यामुळे साधनेपुरता विचार करायचा तर श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेला मापदंडच आपण स्वीकारायला हवा – ‘भगवंतापासून दूर करते ती ‘दुर्बुद्धी’ आणि त्या दुर्बुद्धीनुसार भगवंतापासून मला दूर करणारं जे काही मानसिक, वाचिक आणि कायिक कृत्य असेल ते पापच’! आता ही व्याख्या निश्चित केली तरी तेवढय़ानं मनात येणारे पापविचार, पापकल्पना थोपवता येतात का? काहीजण म्हणतील की, काम, क्रोध, मोह, लोभादि भाव स्वाभाविक आहेत. मग त्यानुसार मनात येणारे विचार वा घडणारी कृत्यंही स्वाभाविक का मानू नयेत? त्यांच्यावर ‘पापा’चा किंवा ‘वाईटा’चा शिक्का कशाला? पण वर सांगितल्याप्रमाणे, आपण साधनपथावर आलो आहोत हे जाणूनच या ‘पाप’ संकल्पनेचा विचार करावा लागतो. मूळ गोष्ट अशी की, साधनपथावर येण्याआधी या जन्मातही आणि आजवरच्या अनंत जन्मातही आपण आपल्या मनाचंच तर ऐकलं! मनाच्या ओढीनुसारच तर जगत गेलो.. पण आपल्याप्रमाणेच प्रत्येकाला स्वतंत्र मन आहे, प्रत्येकाची आकलनाची, जाणिवेची, संवेदनेची पातळी वेगवेगळी आहे. प्रत्येकजण ‘मी’भावानंच जगतो आहे. अर्थात ‘मी’ हाच प्रत्येकाच्या जगाचा आणि जगण्याचा केंद्रबिंदू आहे. अर्थात दुसऱ्यानं माझ्या मनाजोगतं वागावं, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. या इच्छेच्या हट्टाग्रहातूनच दुसऱ्याच्या मनाला दुखवणारं किंवा त्याला व आपल्यालाही मोहभ्रमात गुंतवणारं जे जे कृत्य घडतं ते ‘पाप’च आहे. कारण ते भगवंतापासून आपल्याला मनानं दूर करणारं, आपला आयुष्यातला मोलाचा काळ वाया घालविणारं आणि शाश्व्तात मनाची लय साधण्याच्या उद्दिष्टापासून आपल्याला वंचित ठेवणारं कृत्य आहे! बरं, हे सगळं उमगलं तरी तेवढय़ानं मनाला नियंत्रित करता येत नाही. त्यासाठीचा उपायच या पापचर्चेच्या अखेरीस उलगडणार आहे. असो. तर अजामिळाचीही हीच मनोशरण अवस्था झाली होती. त्याला वेदज्ञान नव्हतं का? शास्त्रार्थ माहीत नव्हता का? तरीही ही गत झाली तिथं आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा? मानसिक, वाचिक आणि शारीरिक पातळीवर आपल्याकडूनही अशी कृत्यं घडतात आणि त्याचं आपल्यालाही वाईट वाटतं. यामुळे कष्टी होणाऱ्या मनाला समाधान वाटावं, या भूमिकेतूनच प्रायश्चित्ताचा उगम झाला! ‘श्रीमद्भागवत’ सांगतं की, माणूस आजारी पडला तर व्याधीच्या लहान-मोठय़ा स्वरूपानुसार तो तात्काळ उपचारही करून घेतो. त्याप्रमाणे पापाच्या लहान-मोठय़ा स्वरूपानुसार त्यानं प्रायश्चित्तही तात्काळ घेतलं पाहिजे. मग इथं अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो हा की, पाप हेही कर्म आणि त्याचं प्रायश्चित्त हेही कर्मच. ही दोन्ही कर्म करणारा जीव अज्ञानीच असतो. तेव्हा अज्ञानातून होणाऱ्या प्रायश्चित्त कर्माद्वारे पापकर्माचा निर्बीज नाश होऊ शकतो का? अज्ञानी जिवाचं पाप कायमचं नष्ट होतं का?

 

Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?