माणसाच्या जन्माला येऊन अंत:करण व्यापक झालं नाही, तर काय उपयोग? माणसाव्यतिरिक्त या जगात अनंत प्राणी, पक्षी आणि जलचर जन्माला येतात. त्या त्या जन्मात मरणभयाच्या निसर्गप्रदत्त सूक्ष्म अंत:प्रेरणेनुसार ते जगत असतात. भूक शमवण्यापुरती बुद्धी त्यांना लाभलेली असते. निवारा तयार करण्याचे कौशल्य काही पक्षियोनींत आढळते. प्रजननक्षम कालावधीपुरती कामवासना त्यांच्यात दिसते. असे असले तरी, ‘सुख’ वा ‘दु:ख’ भोगताना ‘मी’ म्हणजे अमुक, अशी स्वत:ची जाण त्यांना नसते! जन्मत:च आपल्याला नाव दिलं जातं. आपला जन्म सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा विविध स्तरांवरचा असतो. तरीही त्या नावाची व त्या स्तरानुसार आपण ‘गरीब’ आहोत की ‘श्रीमंत’, ‘संपन्नावस्थेत’ आहोत की ‘विपन्नावस्थेत’ आहोत, याची जाण नसते की भानही नसते. ‘समज’ येऊ  लागते तसे प्रथम आपल्याला दुसऱ्या कुणी तरी दिलेल्या नावाशी अखंड सौख्य निर्माण होते. मग मला जे नाव दिलं आहे, माझं जे आडनाव आहे ते धारण करणारा तोच मी, हे ‘मी कोण?’ या प्रश्नाचे कायमचे स्वाभाविक उत्तर होते. मग माझा जो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर असतो किंवा मी प्रयत्नांनी साध्य करतो तो स्तर हादेखील माझी ओळख ठरतो. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्ष्याला ‘ओळखी’चं असं ओझं घेऊन जगावं लागत नाही! मग माझी जी ओळख होते किंवा जी मला भावते ती टिकावी, हाच माझ्या जन्माचा हेतू आहे, असं मला वाटतं. सगळं जगणं त्याभोवतीच आणि त्यापुरतंच केंद्रित होतं. देहाच्या आणि अंत:करणाच्या सगळ्या क्षमता त्यापुरत्याच सदोदित राबवल्या जातात. हाच माझ्या जन्माच्या मूळ उद्दिष्टाचा, माझ्या विलक्षण क्षमतांचा संकोच असतो.

जगात व्यावहारिकदृष्टय़ा मी त्या जन्मदत्त ओळखीनुरूप वागण्यात काहीच गैर नाही, पण त्या ओळखीपलीकडे मनाच्या मननक्षमतेला, चित्ताच्या चिंतनक्षमतेला आणि बुद्धीच्या बोधक्षमतेला जाता येत नसेल तर जीवनधारणा संकुचित होते. ‘अहं’भावात जीव जगतच असतो तो ‘सोहं’भावात, ‘अहं ब्रह्मास्मि’ या भावात स्थिर व्हावा हाच अंतर्यात्रेचा.. ‘काशीयात्रे’चा हेतू आहे. संकुचिताला व्यापक करण्यासाठीच हा मार्ग आहे. जेव्हा ही व्यापकता खऱ्या अर्थानं वाढू लागेल तेव्हा ‘सोहं’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ यातला अहंदेखील गळून पडेल! पण ही झाली आज कल्पनातीत वाटणारी फार पुढची अवस्था. निदान मी त्या परम तत्त्वाचाच अंश आहे, त्यामुळे माझ्या जगण्यातला सगळा संकुचितपणा लयाला जावा, अशी इच्छा होणं हाच या काशीयात्रेत मोठा पल्ला गाठणं आहे! आणि व्यापक शुद्ध स्थितीत स्थिर असलेल्या अंत:करणरूपी ‘वाराणसी’त प्रवेश झाला नसला आणि ‘काशीयात्रे’चा पल्ला इतपत पार केला असला तरीही समर्थ ‘मनोबोधा’च्या ९९व्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात सांगतात ती स्थिती प्राप्त होऊ  लागते. ही स्थिती म्हणजे.. ‘‘तयेमाजिं जाता गती पूर्वजांसी!’’ आता हे ‘पूर्वज’ कोण? तर, ‘पूर्व-ज’ म्हणजे पूर्वी जन्मलेले. जन्मापासून या ‘काशीयात्रे’च्या मार्गावर येण्यापूर्वी माझ्या मनात ज्या ज्या इच्छा, जे जे वासनातरंग उत्पन्न झाले होते ते! या मार्गावर येताच त्यांना गती लाभू लागते. अर्थात ते हळूहळू मावळू लागतात. इच्छांना ऊध्र्व गती लाभते. आधी संकुचित इच्छा होत्या, त्या व्यापक होऊ  लागतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या वासनांनाही ऊध्र्व गती लाभते. आता ‘मोक्षप्राप्ती’ची कामना होते, त्या मार्गात अडसर ठरणाऱ्या आपल्यातील उणिवांबद्दल क्रोध वाटू लागतो, सद्विचार ग्रहण करण्याचा लोभ आणि मोह होतो. या मार्गावर असल्याचा मद आणि आपल्यापेक्षा काही सहसाधकांची वेगानं प्रगती होत असल्याचा मत्सरही उत्पन्न होऊ  लागतो!

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ