मना सज्जना भक्तिपंथेचि जावे.. सज्जनांची भेट हवी असेल तर ज्या वाटेनं त्यांची वाटचाल सुरू आहे, त्याच वाटेनं गेलं पाहिजे! ही वाट आहे भक्तीची.. हे मना, आजवर विभक्तीपंथानं बरीच पायपीट झाली.. भगवंतापासून दूर नेणाऱ्या अनंत वाटा बऱ्याच तुडवल्या गेल्या.. पण समाधान काही लाभलं नाही. कारण एका परमात्म्याचं होण्यावाचून समाधान लाभणं शक्य नाही. त्या परमात्म्याचं व्हायचं तर त्याचे निजजन, संतजन ज्या वाटेनं जात आहेत त्या वाटेनंच गेलं पाहिजे.. ही भक्ती कशी आहे? पू. बाबा बेलसरे या भक्तीमध्येच ज्ञान, प्रेम, कर्म आणि योग अभिन्नत्वानं समाविष्ट असल्याचं सांगतात. अगदी बरोबरच आहे ते. कारण या जगात एक भगवंतच खरा आपला आहे, हे कळणं हेच खरं ज्ञान आहे! आपण कितीजणांना आपलं मानत राहातो आणि त्यांच्यासोबतचं आपलेपण टिकविण्याची धडपड करीत राहातो. प्रत्यक्षात जो तो स्वत:चा असतो आणि स्वत:पुरतच जगत असतो. यात कुणाचाच दोष नाही कारण आपणही तसेच आहोत. केवळ सद्गुरूच जगावर अहेतुक प्रेम करतात. मग ते खरे माझे आहेत, हे कळणं हेच ज्ञान आहे. मग जे खऱ्या अर्थानं माझे आहेत त्यांच्यावर प्रेम जडणारच ना? आणि प्रेम काही निष्क्रिय असू शकत नाही. ते स्वस्थ बसू देत नाही. प्रेम म्हणजे समर्पण. जे माझं आहे ते त्यांच्या चरणीं वाहून टाकणं. त्याचप्रमाणे जे त्यांना आवडतं ते अंगी बाणवणं आणि जे त्यांना आवडत नाही ते सोडून देणं.. माझ्या चिंता, माझं दु:खं, माझा विचार, माझ्या कल्पना, माझे विकार.. जे जे माझं आहे ते वाहून टाकण्याचं आणि धैर्य, सोशीकपणा, सहनशीलता, सावधानता, सहजता हे जे जे सारं त्यांचं आहे त्याचा स्वीकार करीत ते अंगी बाणवण्याचं कर्म या प्रेमामुळेच तर होऊ लागतं. जेव्हा त्यांचा विचार आणि माझा विचार, त्यांची भावना आणि माझी भावना, त्यांची कल्पना आणि माझी कल्पना, त्यांची धारणा आणि माझी धारणा यातलं अंतर संपतं.. माझा सर्व संकुचितपणा संपून त्यांचं व्यापकपण केवळ उरतं तेव्हाच ऐक्य होतं.. हाच तर योग आहे! तेव्हा भक्तीच्या वाटेनं खरी वाटचाल सुरू झाली तर हे ज्ञान, प्रेम, कर्म आणि योग साधत विभक्त असलेले आपण खरे भक्त झाल्याशिवाय राहाणार नाही! ही वाट कशी आहे? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत. त्यांचा विस्तृत मागोवा ‘भावदिंडी’तही घेतला होताच आणि त्याला मानसशास्त्राचीही जोड होती. अगदी संक्षेपानं आणि नव्यानं आपण या नऊ पायऱ्यांचा थोडक्यात विचार करू. श्रवण ही सर्वसाधारणपणे जन्मल्यानंतरची पहिली क्रिया आहे! सभोवतालच्या लोकांचं आणि विशेषत: आईचं बोलणं मूल ऐकू लागतं. त्यानंतर ते स्वत:देखील बोबडं का होईना बोलू लागतं. हे बोलणं सोपं नसतं. कारण त्यात कित्येक शब्द लक्षात ठेवावे लागतात! मूल मोठं होऊ लागतं तसतसं शब्दांची संख्या वाढत जाते आणि वाक्यच्या वाक्य ते बोलू लागतं.. हे स्मरणक्षमतेशिवाय साधूच शकत नाही. साधना पथावरची पहिली पावलंही अशीच तर पडतात! सज्जनांचं सांगणं आपण ऐकू लागतो आणि मग त्याचं आकलन स्वत:च्या आवाक्यानुसार करू लागतो. मग जे उमगलं त्याचं स्मरण राखू लागतो. इथपर्यंतची वाटचाल तशी वेगानं होऊ शकते. कारण या तिन्हींत शाब्दिक भाग मोठा असतो. आणि आपलं जगणं हे शब्दमयच असल्यानं शब्दांचा हा आधार कठीण वाटत नाही. अगदी नामस्मरण जरी सुरू झालं तरी सुरुवातीला त्याचं शाब्दिक अंगच जास्त जाणवत असतं. त्या शब्दांचा आत्मा जेव्हा प्रकटू लागतो तेव्हाच पादसेवनापासून आत्मनिवेदनापर्यंतची खरी अंतर्यात्रा सुरू होते.
– चैतन्य प्रेम

loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
issues of society
शब्द शिमगोत्सव
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!