पाच यम आणि पाच नियम हा अष्टांग योगसाधनेचा पाया आहे. नामानं ते कसे साध्य होतात, याचा आता संक्षेपानं विचार करू. कोणत्याही साधना मार्गाला, साधना पद्धतीला आणि साधकाला मी कधीच कमी लेखत नाही. प्रत्येक साधना मार्गाचा आणि साधना पद्धतीचा मूळ हेतू हा साधकाला व्यापक करीत अखेर परम तत्वात विलीन करण्याचाच असतो. ‘खुद’ भावात जगून दु:ख भोगणाऱ्याला ‘खुदा’मध्ये विलीन करणं असो किंवा जीवभावात जगून अनंत दु:ख भोगणाऱ्याला शिवभावात विलीन करणं असो, दोन्हींचा हेतू एकच आहे. हे कधी साध्य होईल? तर आंतरिक भाव शुद्ध झाल्यावरच! कारण आपण पाहिलं की, माणसाची बुद्धी आणि कार्यक्षमता ही त्याच्या भावस्थितीनुरूपच राबविली जाते! भाव अशुद्ध असल्यानं बुद्धी आणि कार्यक्षमतेचा वापर अशुद्ध होतो. संकुचित स्वार्थ आणि संकुचित हेतूंसाठीच भावप्रधानता असल्यानं बुद्धी आणि कार्यक्षमतेच्या योगे संकुचिताचीच प्राप्ती होते. जे संकुचित आहे, अपूर्ण आहे, खंडित आहे त्यानं माणसाची खरी अखंड शाश्वत पूर्ण तृप्ती कधीच होत नाही. त्यामुळे साधना कोणतीही असो, तिच्या योगे माझा भाव शुद्ध झाला पाहिजे. तरच ती साधना योग्य मार्गानं सुरू आहे, त्या साधनेबाबतचं माझं आकलन योग्य आहे, असं म्हणता येईल. नामसाधनेचं वैशिष्टय़ असं की, नाम घेण्याआधी त्या नामानं काय साध्य होतं हे मला उमजत नसलं तरी नाम माझ्यात सूक्ष्मपणे पालट घडवू लागतं. ‘बघा मी रोज पन्नास माळा जप करतो..’ किंवा ‘शंभर माळा जप करतो,’ असा संख्येचा भाग सोडला तर ‘नाम घेण्या’त कर्तृत्व शोधायला किंवा त्याचा प्रचार करायला मला वावच नसतो. त्यातही मोठं वैशिष्टय़ असं की, माळेप्रमाणेच जप मानसिकही अर्थात मनातल्या मनातही करता येतो. एक ज्ञान धारणेचं चिंतन सोडलं तर बाकी कोणतीही साधना मनातल्या मनात करता येत नाही आणि माळेवर होणाऱ्या जपाइतकाच मानसिक जपही अत्यंत प्रभावी असतो. बरेचदा होतं काय, की साधना कोणतीही असो, त्या साधनेच्या कालावधीत साधकाची मनोभूमिका उच्च पातळीवर असते. साधनेचा कालावधी संपला आणि साधक जगात वावरू लागला की हळूहळू साधनेचा प्रभाव ओसरू लागतो आणि मग अनेकदा साधना वेगळी आणि जगणं वेगळं, अशी गत होऊ  लागते. ती गत होऊ  नये यासाठीच तर यम-नियमांसकटचा अष्टांग योग अवतरला आहे! पण नामजप हा माळेप्रमाणेच मानसिकही होऊ  शकत असल्यामुळे होतं काय की साधनेचा कालावधी संपला तरी नामजप सुरूच राहू शकतो. अर्थात साधनेनंतरही नाम साधकाचा हात सोडत नाही! जगणं वेगळं आणि साधना वेगळी, असं नाम वाटू देत नाही. कारण आपण जगात वावरत असतानाही ते नाम सतत जगाच्या आणि आपल्या मध्ये उभं ठाकत असतं! साधनेच्या हेतूचं ते सतत स्मरण करून देत असतं. नाम काय करतं? ते स्थूलात, बाह्य परिस्थितीत कोणताही बदल लगेच करीत नाही. ते सूक्ष्मात बदल सुरू करतं. मनाच्या धारणेत, आकलनात, दृष्टिकोनात पालट सुरू करतं. आणि स्थूलापेक्षा, दृश्यापेक्षा सूक्ष्मांतला, अदृश्यातला बदल हा पटकन जाणवत नाही. तसंच हेही खरं की, सूक्ष्मात होणारा बदल हाच खरा चिरस्थायी असतो. सूक्ष्मांतील या पालटाद्वारे पाचही यम आणि नियम साधण्याची अतिशय अवघड प्रक्रिया सुरू होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पाच यम आहेत, हे आपण पाहिलं. त्यांच्या व्याख्याही आपण पहिल्या आहेतच. यात पहिली आहे अहिंसा. काया, वाचा आणि मनानं कुणालाही न दुखावणं ही आहे खरी अहिंसा! आता ही अहिंसा साध्य होणं सोपं का आहे? त्यातही कायेनं म्हणजे प्रत्यक्ष शरीरानं आपण कुणाला एकवेळ दुखावणार नाही, शारीरिक हिंसा करणार नाही, पण वाचेनं दुसऱ्याचं मन दुखावणं ही हिंसाच आहे, हे आपल्याला जाणवतही नाही.

 

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…