स्थूल आणि सूक्ष्म देहाचा विचार आपण करीत आहोत. आता ज्या स्थूल आणि सूक्ष्म देहाला आपण जाणतो किंवा जाणू शकतो तो या जन्माशीच घट्ट निगडित आहे, हे आपल्याला पटकन उमगत नाही. ‘मी’ म्हणून आपल्या मनात ज्या देहाचं प्रतिबिंब विलसत असतं तो देह कसा आहे? तर या जन्मात आपली जी ओळख आहे, आपलं जे नाव आहे, आपली जी कौटुंबिक पाश्र्वभूमी आहे आणि आताचा जो काळा-गोरा, उंच-बुटका, देखणा-कुरूप, धडधाकट-लेचापेचा देह आहे तोच या ‘मी’चा ठोस भाग आहे. तेव्हा हा स्थूल आणि सूक्ष्म देह या जन्माशी जखडलेला आहे.

पण अपूर्त वासनांची ओढ न संपणारी, न शमणारी आहे. त्या अपूर्त वासनेतूनच पुन्हा जन्म आहे आणि जन्माचं कारण ठरणारा जो देह आहे तोच कारणदेह आहे! समर्थानी ‘दासबोधा’च्या १७व्या दशकाच्या आठव्या, नवव्या आणि दहाव्या सामासात या देहांची सखोल चर्चा केली आहे तसेच आपण नेमकं काय साधायचं आहे, याचंही मार्गदर्शन केलं आहे. त्या विस्ताराकडे थोडं वळू.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
bhakri stomach health marathi news, chapati stomach health marathi news
Health Special: भाकरी, पोळी की चपाती – पोटासाठी काय चांगले?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ

समर्थ सांगतात की ही सृष्टी म्हणजे पंचमहाभूतांचा खेळ आहे, पसारा आहे. आकाश, वायू, तेज, आप अर्थात जल आणि माती अर्थात पृथ्वीतत्त्व ही ती पंचमहाभूते आहेत. आपला जो सूक्ष्म देह आहे त्यात प्रत्येक तत्त्वाचे पाच घटक आहेत. म्हणजे मूळ स्फुरण, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे आकाश तत्त्वाचे अंत:करण पंचक आहे. मग समर्थ वायू तत्त्वांची प्राणपंचकं मांडताना म्हणतात की, ‘‘सर्वागी व्यान नाभीं समान। कंठीं उदान गुदीं अपान। मुखीं नासिकीं प्राण। नेमस्त जाणावा।।’’ तेज तत्त्वानं ज्ञानेंद्रिये कार्यरत आहेत. श्रवण साधणारे श्रोत्र, स्पर्शातून शीत-उष्णपणा जाणवून देणारी त्वचा, रूपदर्शन घडवणारे चक्षु, रसास्वादन करणारी जिव्हा आणि घ्राण क्षमता असलेली नासिका; ही ती ज्ञानेंद्रिय पंचकं आहेत. आप अर्थात जलतत्त्वापासून उच्चारासाठीची वाचा, कर्म-आचारासाठी हात, विचरणासाठी चरण, मूत्रविसर्जन आणि रतीभोगासाठी शिस्न आणि मलोत्सर्गासाठी गुद; ही पाच कर्मेद्रिय लाभली आहेत.

पृथ्वी तत्त्वाची पाच विषयपंचकं आहेत. समर्थ सांगतात, ‘‘शब्द स्पर्श रूप रस गंध। ऐसे हे विषयपंचक।।’’ समर्थ म्हणतात, ‘‘अंत:करण प्राणपंचक। ज्ञानेंद्रियें कर्मेद्रिये पंचक। पांचवें विषय पंचक। ऐसी हीं पांच पंचकें।। ऐसे हे पंचविस गुण। मिळोन सूक्ष्म देह जाण।।’’ आता स्थूल देहाचं विवेचन करताना समर्थ या पंचमहाभूतांचे कोणकोणते रूपघटक त्यात आहेत हे सांगतात.

ते म्हणतात, ‘‘काम क्रोध शोक मोहो भय। हा पंचविध आकाशाचा अन्वय। पुढें पंचविध वायो। निरोपिला।। चळण वळण प्रसारण। निरोध आणि आकुंचन। हे पंचविध लक्षण। प्रभंजनाचें।। (म्हणजे वायूचे) क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन। हे तेजाचे पंचविध गुण। आतां पुढें आप लक्षण। निरोपिलें पाहिजे।। शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद। हा पंचविध आपाचा भेद। पुढें पृथ्वी विशद। केली पाहिजे।। अस्थि मांस त्वचा नाडी रोम। हे पृथ्वीचे पंचविध धर्म। ऐसें स्थूल देहाचें वर्म। बोलिले असे।। पृथ्वी आप तेज वायो आकाश। हे पांचाचे पंचविस। ऐसे मिळोन स्थूळ देहास। बोलिजेतें।।’’ कारण आणि महाकारण देहाचं वर्णन मात्र समर्थ केवळ एका शब्दात करतात. ते म्हणतात, ‘‘तिसरा देह कारण अज्ञान। चौथा देह महाकारण ज्ञान।’’ अपूर्त अवास्तव इच्छांचा पाया अज्ञान हाच असतो आणि त्यापायीच ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्’ हा कर्म चालू राहतो. त्यामुळे हा कारण देहच अज्ञान आहे.