19 November 2017

News Flash

३४६. चार देह : ३

या चार देहांच्या चार अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या)

चैतन्य प्रेम | Updated: May 15, 2017 3:06 AM

या चार  देहांच्या चार अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या), चार अभिमान (विश्व, तैजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा), चार स्थानं (नेत्र, कंठ, हृदय, मूर्धन अर्थात मस्तक), चार भोग (स्थूल, प्रविविक्त, आनंद, आनंदवास), चार मात्रा (अकार, उकार, मकार, अर्धमात्रा अर्थात ईश्वर), चार गुण (तम, रज, शुद्ध, शुद्धसत्व) आणि चार शक्ती (क्रिया, द्रव्य, इच्छा अर्थात अज्ञान, ज्ञान) अशा ३२ तत्त्वांचं वर्णन समर्थानी ‘दासबोधा’च्या सतराव्या दशकाच्या नवव्या समासात केलं आहे. ही ३२ तत्त्वे तसंच स्थूल आणि सूक्ष्म देहाची आधीच वर्णन केलेली प्रत्येकी २५ तत्त्वे अशा ८२ तत्त्वांनी स्थूल आणि सूक्ष्म देहाचा पसारा साकारला आहे. त्याला कारण (अज्ञान) आणि महाकारण (ज्ञान) या दोहोंची जोड आहे. समर्थ म्हणतात, ‘‘ऐसीं हीं बत्तिस तत्त्वें। दोहींचीं पन्नास तत्त्वें। अवघीं मिळोन ब्यांसि तत्त्वें। अज्ञान आणि ज्ञान।।’’ आता इथं एक विशेष गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे महाकारण देह हा ‘ज्ञान’ म्हणून उल्लेखिला असला तरी हे ‘ज्ञान’ कोणतं आहे? तर अखेरीस तेही अत्यंत सूक्ष्मपणे ‘मी’शीच बांधील आहे! तेदेखील एका देहालाच चिकटून आहे. म्हणजे कसं असावं? बघा आपला स्थूल देह आपल्याला दिसतो आणि तो असल्याचं जाणवतं. हा देह ज्या वासनातरंगांनुसार वावरतो तो वासनायुक्त असा सूक्ष्म देहही थोडाफार समजतो. माणसाला त्याच्या अपूर्त इच्छांमुळे परत परत जन्म घ्यावा लागतो, हे जन्माचं कारण असलेला ‘कारणदेह’ही उमगतो. आता ‘महाकारण देह’ म्हणजे जे ज्ञान आहे, ते कोणतं? तर आपला जन्म आनंदाची प्राप्ती करण्यासाठी झाला आहे, हे तत्त्वज्ञान सांगतं आणि आपलाही अनुभव हाच आहे की आपल्याला सदोदित आनंदच हवा असतो. दु:ख क्षणभरही नको असतं! त्या मूळ आनंदस्थितीच्या प्राप्तीसाठीच मूळ जन्म झाला असतो, पण जन्म होताच अज्ञानाची दाई मायेच्या दुलईत असं काही लपेटून टाकते की, हा आनंद नेमका कोणता तेच उमगत नाही आणि वास्तविक आनंदाची सर्व वर्णनं काल्पनिक वाटतात! जे वास्तविक आहे ते वास्तविक म्हणूनच जाणवावं आणि मायेचं निरसन व्हावं, असं आपल्यालाही वाटतंच. पण ते साधावं कसं? समर्थ म्हणतात, ‘‘ऐसीं ही तत्त्वें जाणावीं। जाणोन माइक वोळखावीं। आपण साक्षी निरसावीं। येणें रिती।।’’ वर उल्लेखलेली जी ८२ तत्त्वे आहेत ती मायिक आहेत हे ओळखावं! आता प्रश्न असा की आपण मायेत असताना, मायेच्या प्रभावात असताना तिला कुठं ओळखू शकतो? मायेचा पगडा आणि प्रभाव इतका जबरदस्त असतो की ती नाचविल तसं आपण केवळ नाचत असतो! मग या मायेचं निरसन कसं व्हावं? समर्थ सांगतात ‘साक्षी निरसावीं’.. म्हणजे साक्षीभाव ठेवला तरच मायेचं निरसन शक्य आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत त्याचा आशय असा की, तुम्ही अनवधानाने जगता त्यामुळे अनंत दु:खे वाटय़ाला येतात. अवधानाने जगू लागलात की दु:खाची अनेक कारणं दूर होतात. आपल्या जगण्याच्या रीतीकडे पाहिलं की लक्षात येईल की खरंच आपण अनवधानानं वागतो त्यामुळे अनेकदा बोलू नये ते बोलतो, वागू नये तसं वागतो. आपल्या अशा वागण्या-बोलण्यानंही अनेक प्रश्न आपणच निर्माण करतो आणि मायेची पकडही घट्ट करतो. हे अवधान म्हणजेच साक्षी भाव आहे! साक्षीभाव म्हणजे आपल्या जगण्याच्या रीतीचं निरीक्षण-परीक्षण आहे.. छाननी आहे. समर्थ म्हणतात, ‘‘साक्षी म्हणिजे ज्ञान। ज्ञानें वोळखावें अज्ञान। ज्ञानाज्ञानाचें निरसन। देहासरिसें।।’’ साक्षीभाव आला की आताच्या जगण्यातील मायेचं ज्ञान होईल. थोडक्यात आपल्या जगण्यातील जे अज्ञान आहे, त्याचं ज्ञान होईल. पण हे जे ज्ञान आहे अज्ञान आहे ते या देहालाच, देहाभोवती केंद्रित जगण्यालाच चिकटून आहे!

 

First Published on May 15, 2017 3:06 am

Web Title: samarth ramdas philosophy 230