19 November 2017

News Flash

३५०. प्रारंभ

हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी

चैतन्य प्रेम | Updated: May 19, 2017 4:02 AM

समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०३ व्या श्लोकाचं चिंतन आपण सुरू करीत आहोत. आधीच म्हटल्याप्रमाणे या श्लोकात श्रवण, मनन आणि प्रत्यक्ष आचरण; अशी त्रिसूत्री मांडली आहे. ती कशी?

तर, ‘‘हरीकीर्तनें प्रीति रामीं धरावी,’’ हा चरण श्रवण नेमकं कोणतं करावं आणि त्यानं काय साधायचं आहे, हे सांगतो. निरूपणाच्या मननातून काय साधायचं, हे ‘‘देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी,’’ हा चरण सांगतो. तर, ‘‘परद्रव्य आणीक कांता परावी। यदर्थी मना सांडि जीवीं करावी॥’’ हे अखेरचे दोन चरण प्रत्यक्ष आचरण कसं असावं, हे सांगतात.

आता असं पाहा.. खऱ्या सद्गुरूची भेट काय सोपी गोष्ट आहे का? किती जण विचारतात की, ‘‘वयाची पस्तीस-चाळीस र्वष उलटून गेल्यावर सद्गुरू जीवनात आले. एवढा विलंब का झाला असावा? ते आधीच आले असते तर बरं झालं नसतं का?’’ मी मनात हसून म्हणतो, एवढय़ा उशिरा येऊनही त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास नाही, मग आधी येऊन काय उपयोग

होता?

आणि खरंही हेच आहे. आपल्यापेक्षा भेटीची खरी तळमळ तर त्यांनाच असते, पण ते योग्य वेळेची वाट पाहात असतात. योग्य वेळ म्हणजे अशी वेळ की जेव्हा ते जे सांगू इच्छितात ते आपण निदान ऐकून तरी घेऊ! किमान तेवढा विश्वास असेल.

‘‘मी अमक्या कंपनीतून बोलतोय, एक चांगली योजना आहे,’’ असे दूरध्वनी आपण तात्काळ खंडित करतो ना? मला रस नाही, मला ऐकून घ्यायलाही वेळ नाही, असं म्हणतो ना? तेव्हा त्यांचं ऐकून घ्यायलाही आम्हाला जर आधी वेळ नसेल, तेवढा वेळ त्यांना द्यावा असं वाटत नसेल, त्यांच्यापेक्षा जगावर अधिक विश्वास असेल, तर त्यांच्या येण्याचा काय उपयोग झाला असता?

बरं खरा सद्गुरू मिळावा, असं वाटू लागलं समजा, तर तो का मिळवायचा, याचीही जाण असली पाहिजे ना? खरा सद्गुरू मिळावा, असं वाटलं आणि तो मिळालाही, पण तरी हाच खरा आहे, हा विश्वास स्थिर तर झाला पाहिजे ना? त्यामुळे ज्या क्षणी मला या मार्गात यावंसं वाटतं त्याच क्षणी माझ्या मनाच्या जडणघडणीची प्रक्रिया सद्गुरू सुरू करून देतात!

त्यांच्या भेटीचा खरा लाभ मला घेता यावा यासाठी माझी मानसिक, भावनिक, वैचारिक बठक पक्की करायला ते सुरुवात करतात. त्यातून भगवंतावर प्रेम असलेली काही सत्प्रवृत्त माणसं आयुष्यात येऊ लागतात. संतसत्पुरुषांची भावोत्कट पुस्तकं वाचनात येतात. मनातले तर्क-वितर्क, विकल्प यांच्या झंझावातातही एखाद क्षण कानावर पडणारे भगवद्प्रेमाचे काही शब्द, वाचलं जाणारं एखादं वाक्य अंतरंगात खोलवर दबलेल्या भगवद्प्रेमाला अवचित स्पर्श करतं. अचानक डोळ्यांच्या कडा पाणावतात.

तर या मार्गाची सुरुवात काही पुस्तक वाचून सहसा होत नाही. कारण पुस्तकाचा विषय आपल्या आवडीचा नसतो ना! पण भगवंताच्या प्रेमानं भारलेला एखादा माणूस आयुष्यात अवचित येऊ शकतो. त्याच्या समाधानी असण्याची, निर्भय, नि:शंक असण्याची मोठी छाप मनावर पडते. आपणही असंच निर्भय व निश्चिन्त व्हावं, असं आपल्याला वाटतं. ती स्थिती कशी साधते, हे त्याच्याकडून जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या मुखातून सुरू होतं निव्वळ ‘हरिकीर्तन’! आपल्याला त्यात विशेष गोडी नसते! कानावर शब्द पडत असतात, पण मन त्यांना अपेक्षित भावनिक प्रतिसाद देत नाही.

बरं काही जण मात्र आधीपासूनच भगवंताच्या विचारानं तळमळत असतील आणि सज्जनांच्या भेटी आणि ग्रंथांचं पारायण, परिशीलन सश्रद्ध मनानं करीत असतीलही, पण इथं सर्वसाधारण माणसाची या मार्गावरची साधारण सुरुवात मांडली जात आहे, हे लक्षात घ्या.

 

First Published on May 19, 2017 4:02 am

Web Title: samarth ramdas philosophy 232