पुढील विवेचन सुरू करण्याआधी एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. केवळ एका सद्गुरूचा पूर्ण आधार प्राप्त झाला तर आणि तरच अध्यात्म पथाचं ध्येयशिखर गाठता येणं शक्य आहे. सद्गुरूंच्या सहवासात असूनही त्याच्या सर्वव्यापी सत्तेचं भान विसरलेल्या ‘साधकां’ना जाग आणण्यासाठी आणि खरी साधना काय असते, हे बिंबवण्यासाठीच ‘मनोबोधा’चा अर्थात ‘श्रीमनाचे श्लोकां’चा जन्म झाला आहे; पण सद्गुरू तत्त्वाचं ‘मनोबोधा’तील विराट दर्शन घडायला आणखी २५ श्लोक वाट पाहायला लागणार आहे! पण हे सारे श्लोक ‘योगिराणा’ असलेल्या त्या सद्गुरूच्याच दिशेनं अलगद प्रवाहित होत आहेत. म्हणूनच गेल्या अनेक श्लोकांच्या विवेचनात ‘सद्गुरू’ हा शब्दही आला नाही, तर साधू-संत आणि सत्पुरुष असाच उल्लेख आला आहे आणि त्यांच्याच अनुषंगानं विचारमंथन झालं आहे.. आणि हेसुद्धा अगदी जसं घडतं तसंच आहे! एकदम सद्गुरूंकडे आपण कुठे पोहोचतो? आपण अनेक साधुजनांच्या दर्शनाचा प्रयत्न करतो. भगवंताची भक्ती करीत असलेल्या सत्पुरुषाचा सहवास मिळावा, असा प्रयत्न करतो. अध्यात्माच्या नावावर तेजीत असलेल्या बाजारात खऱ्या साधूचं दर्शन होणं, हे कठीण आणि जो स्वत: परमतत्त्वाच्या भक्तीत बुडाला आहे अशा साधूचा किंवा सत्पुरुषाचा सहवास मिळणं, हे तर महाकठीण.  सद्गुरू भक्तीत रममाण अशा या खऱ्या महापुरुषांच्या सहवासानं जगण्याची रीत पालटू लागते. मनावर भक्तीचे संस्कार होऊ  लागतात. मुख्य म्हणजे सद्गुरूची भेट व्हावी, ही ओढ निर्माण होते. हे सर्व खरं असलं तरी सद्गुरूप्राप्तीनं समस्त अपूर्णत्व ओसरून पूर्णत्व लाभण्याची जी विराट अंतिम प्रक्रिया सुरू होते ती या संगानं साधू शकत नाही, हेही खरं. तेव्हा आपण आता ज्या सत्संगाचा विचार करीत आहोत तो सद्गुरूप्राप्तीच्या वाटेवर चालण्याचा हुरूप आणणारा संग आहे, हे लक्षात ठेवावं. गेल्या म्हणजे १०७व्या श्लोकात समर्थानी मनाला बुद्धीसह साधुसंगात वस्ती करायला सांगितलं आहे. त्यानं ‘मोक्षभागात वाटेकरी’ होता येईल, असं फार सूचक विधान केलं आहे. हे मोठं अर्थगर्भ विधान आहे बरं का! इथं मोक्ष प्राप्त करशील, असं म्हटलेलं नाही. उलट नीट लक्षात घ्या, मोक्षात नव्हे, तर मोक्षभागात वाटेकरी होता येईल, असं म्हटलं आहे! म्हणजेच वर उल्लेख केल्याप्रमाणे सद्गुरू भक्तीत रममाण असलेला सत्पुरुष मुक्ती भोगत असतो, त्या मुक्तीच्या अनुभवाचा थोडासा वाटा तेवढा आपल्या वाटय़ाला येतो. त्या मुक्त जगण्याच्या अनुभवात आपल्याला मर्यादितपणे वाटेकरी होता येतं. सद्गुरू भक्तीत रममाण सत्पुरुष हा फकिरासारखा बेफिकीर असतो. व्यावहारिक जीवनातील चढ-उतार, लाभ-हानी यांच्याकडे तो समत्व भावानं पाहतो. तो निर्भय, नि:शंक असतो. अशा सत्पुरुषांच्या सहवासात असताना आपल्यावर व्यावहारिक संकट आलं तर आपण या सत्पुरुषाकडेच धाव घेतो. तो संकट दूर करीत नाही किंवा मी ते दूर करू शकतो, असा दावाही करीत नाही. मात्र अशा प्रसंगात मन खंबीर कसं ठेवावं, हे तो शिकवतो. त्याच्या आधारावर आपण प्रतिकूल प्रसंगांनाही सकारात्मक वृत्तीनं सामोरं जातो आणि जितकी काळजी आपण करत होतो आणि या प्रसंगाला सामोरं जाणं टाळत होतो, ती भीती अनाठायी होती, हे आपल्याला उमगतं. या अनुभवानंही हायसं वाटतं. मुक्तपणे जगता येऊ  शकतं, याचा अनुभव येतो. ‘मोक्षभागातला वाटा’ हा असा असतो! एकदा असा साधुसंग प्राप्त होऊ  लागला, की जीवन जसं आहे तसं ते स्वीकारण्याचा अभ्यास सुरू होतो. दुसऱ्यांविषयीची कटुता ओसरू लागते. कामक्रोधादी विकार नष्ट होत नाहीत, पण त्यांचा आवेग मंदावू लागतो. त्यांचा संग सुटू लागतो.