पराकोटीचं ज्ञान जरी झालं तरी एका अहंकारामुळे ते फोल ठरतं. ही स्थिती टाळायची असेल तर एका सत्संगतीशिवाय तरणोपाय नाही, हे सूत्र ‘मनोबोधा’च्या ११३व्या श्लोकात प्रकट होत आहे. कितीही ज्ञान मिळालं, पण त्याच्यासोबत अहंकाराचं वारं लागलं तर तमोगुणात अडकण्याची भीती कशी असते, हे वामनपंडितांच्या कथेतूनही जाणवतं. त्या कथेचा संकेतही या श्लोकात आहे. वामनपंडितांनी जसा समर्थाच्या संगतीचा लाभ घेतला तसा सत्संग लाभल्याशिवाय ज्ञानाचा, शक्तीचा, क्षमतेचा, पैशाचा मद ओसरूच शकत नाही, हेच हा श्लोक सूचित करतो. आता या श्लोकात ज्या वामनपंडितांकडे संकेत आहे ते ‘यथार्थदीपिका’ रचणारे वामनपंडित नव्हेत, असं समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी नमूद केलं आहे. पण मुख्य गोष्ट काय? तर सत्संगतीशिवाय ज्ञान्यालाही गती नाही! बरं हा ‘ज्ञानी’ तरी खरा ज्ञानी असतो का हो? गुरुजींचा एक दोहा आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘अभीतक जो समझा वो सीमाही समझा, सीमा समझना समझना नहीं हैं!’’ जो तो ‘ज्ञान’ कमावतो ते एका मर्यादेपर्यंत.. आणि जेवढं तो जाणतो तेच सर्वज्ञान आहे, अशा तोऱ्यात तो वावरू लागतो. तेव्हा एका मर्यादेपर्यंतच झेप घेतली आणि तेवढय़ा परिघालाच पूर्ण ज्ञान समजू लागलो तर ते पूर्ण नव्हे, अपूर्ण ज्ञानच आहे. मग खरं पूर्ण समाधान किंवा पूर्ण ज्ञान कशानं होऊ  शकतं? ‘मनोबोधा’चा ११३वा श्लोक सांगतो.. ‘मना सर्व जाणीव सांडूनि राहें!’ हे मना सर्व जाणीव सांडून राहा!! आता आपल्याला वाटेल की सर्व जाणीव सांडून राहणं हा उपाय आहे की सत्संगती हा उपाय आहे? तर हा एकच उपाय आहे. सत्संगतीशिवाय ही ‘सर्व जाणीव’ ओसरणं अशक्य आहे. पण मुळात ही सर्व जाणीव सोडून राहायचं, म्हणजे तरी काय? तर आज या घडीला आपलं सर्व काय आहे? आपलं सर्वस्व काय आहे? तर ‘मी’ आणि ‘माझे’ हेच सर्वस्व आहे. त्या ‘मी’ आणि ‘माझे’पलीकडे आपल्या जाणिवेची झेप नाही. गुरुजींनी विचारलं, ‘‘हे मी आणि माझे निर्माण का झाले?’’ एकानं उत्तर दिलं, ‘‘अहंकारामुळे.’’ गुरुजींनी विचारलं, ‘‘अहंकार तरी का उत्पन्न झाला?’’ सर्व जण गप्प झाले. गुरुजी म्हणाले, ‘‘द्वैतामुळे ‘मी’ वेगळा झाला आणि हे द्वैत विस्मरणामुळे निर्माण झालं!’’ हे ‘तू’चं विस्मरण आहे. परमतत्त्वाचं विस्मरण आहे. या विस्मरणामुळे आपल्या अनमोल आयुष्याच्या कालमर्यादेचं विस्मरण आहे. मरणाचं, अर्थात हे जग सोडून आपल्याला कधी ना कधी जायचंच आहे, या वास्तवाचं विस्मरण आहे.  त्यामुळे आपल्या मनात मर्यादेबाहेर, आवाक्याबाहेर इच्छा फोफावत राहतात. त्या पूर्ण करण्यापलीकडे दुसरा कसला विचारच मनाला शिवत नाही. त्या इच्छांच्या फोलपणाचंही हे विस्मरण आहे. साधनमार्गावर आल्यावर तरी विस्मरणाची ही सवय मोडण्याचा आणि वास्तवाचं, शाश्वताचं स्मरण रुजविण्याचा अभ्यास झाला पाहिजे. हा अभ्यास, अर्थात ‘मी’ आणि ‘माझे’चं विस्मरण आणि शाश्वताचं स्मरण सत्संगाशिवाय अशक्य आहे. कारण सत्संगतीशिवाय ‘मी’ आणि ‘माझे’ची भ्रामकता आपण जाणूच शकत नाही. दासबोधाच्या सातव्या दशकातील ‘द्वैतकल्पना निरसन’ या पाचव्या समासात समर्थानी म्हंटलं आहे की, ‘‘जयास द्वैत भासलें, ते मन उन्मन जालें!’’ ज्या मनाला या द्वैताची जाणीव झाली म्हणजेच आपण द्वैतभावात अडकल्यानं जीवनात द्वंद्व कसं निर्माण झालं आहे, हे उमगलं तरच मन द्वैताच्या पकडीतून सुटेल.. आणि ही प्रक्रिया सत्संगतीशिवाय असाध्य आहे. जर तसं घडलं नाही आणि आपण ‘ज्ञानी’ झाल्याच्या तोऱ्यात वावरू लागलो, मुखानं ज्ञानाच्या गप्पा मारू लागलो, तर ते नुसतं निर्थकच नव्हे तर घातकही कसं आहे, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या ११४व्या श्लोकात सांगणार आहेत.