12 December 2017

News Flash

३९३. धुक्यातला शोध

अर्थात नुसतं पृष्ठभागावर तरंगत राहणं म्हणजे जीव वाचणं नव्हे.

चैतन्य प्रेम | Updated: July 19, 2017 2:30 AM

आध्यात्मिक वाटचालीच्या पहिल्या टप्प्यावरची आपली स्वतच्या बळावर, स्वतच्या आकलनानुसार सुरू असलेली साधना म्हणजे बुडणाऱ्यानं जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड असते. पोहता येत नसताना पाण्यात पडलोच, तर गप्प राहून काही साधतं का? ‘वाचवा वाचवा’ म्हणून तरी ओरडतोच ना आपण? बरं नुसतं ओरडूनही भागत नाही! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!! नुसतं ‘वाचवा वाचवा,’ ओरडलो, पण  निष्क्रिय राहिलो, तरी काही उपयोग नाही. कुणीतरी वाचवायला येईलच, ही आशा ठेवताना स्वतलाही हात-पाय हलवावेच लागतात ना? वाचवणारा येईपर्यंत हात-पाय मारत पाण्याच्या पृष्ठभागावर राहण्याची धडपड करावीच लागते ना? तसं भवसागरात गटांगळ्या खात असलेल्या मला यातून वाचविणारया नेमक्या उपायाचा आधार लाभेपर्यंत अज्ञाताला हाका माराव्या लागतात आणि त्या भवसागरात बुडून जीव गुदमरू नये यासाठी समजेल त्या, जमेल त्या ‘साधने’ची धडपड करावीच लागते. आपल्याकडूनही ही गोष्ट नकळत सुरूच असते, हे लक्षात येईल. मुळात जगण्यातल्या अशांतीमुळं तरी आपण या मार्गाकडे वळतो किंवा या मार्गावर आल्यावर जगण्यातली अशांती जाणवते आणि ती नकोशी वाटते. मग जगात वावरतानाही व्यक्तिगत जगण्यातल्या प्रतिकूलतेचा त्रास आपल्याला होऊ नये, ही आपली भावना होते. मग ज्या योगे आपण रक्ताच्या किंवा त्याहून अधिक मानलेल्या नात्यांमध्ये भावनिकदृष्टय़ा अडकतो आणि अखेरीस त्याचा आपल्यालाच त्रास होतो, अशा नात्यांबाबत आपण हळूहळू सजग व्हायला लागतो. अशा गुंत्यात अडकू नये म्हणून काय करता येईल, याचा विचार करू लागतो. असा विचार करणं, असा प्रयत्न करणं म्हणजेच भवसागराच्या पृष्ठभागावर तरंगण्याची धडपड करणं!

अर्थात नुसतं पृष्ठभागावर तरंगत राहणं म्हणजे जीव वाचणं नव्हे. कारण कधी एखादी मगर झपाटय़ानं पुढय़ात येईल आणि आपल्याला गिळंकृत करील, याचा नेम नसतो. म्हणजे कोणता वासना तरंग कधी उत्पन्न होईल आणि तो भवसागराच्या तळाशी नेईल, याचा काही नेम नसतो. तेव्हा वाचविणाऱ्याला धाव घ्यावीच लागते. तो येईपर्यंत मी त्या भवसागरात पुन्हा बुडू नये, त्या भवसागराच्या पृष्ठभागावरच मला तरंगत धडपड करता यावी, यासाठी समर्थ सांगत आहेत, ‘‘विचारें तुझा तूंचि शोधून पाहे!’’ ज्या ‘मी’ आणि ‘माझे’मुळे मी या भवसागरात बुडालो होतो त्या ‘मी’चा शोध आणि यातून वाचविणाऱ्या ‘तू’चा हा शोध आहे. आता पाण्यात पडलो असताना वाचविणाऱ्याचा शोध घ्यायला मी कुठं जाऊ का शकतो? माझ्या हाका ऐकून वाचविणाराच धाव घेतो ना? तेव्हा खरा भर आहे तो ‘मी’चा शोध सुरू  करण्यावरच. ज्या ‘मी’च्या इच्छा, अपेक्षा, आग्रह आणि हट्टांच्या पूर्ततेसाठी मी या भवसागरात गटांगळ्या खात होतो, ज्या ‘मी’ला मी खरा मानत होतो तो तसाच आहे का, याचा प्रामाणिक शोध सुरू होईल तेव्हाच या ‘मी’वरच्या भ्रमाच्या खपल्या पडू लागतील. मग जग आघात करत नाही, जगाकडूनच्या आपल्या भ्रामक अपेक्षाच आघाताला कारणीभूत होत्या, हे  समजू  लागेल तेव्हा शुद्ध विचाराची पहिली ठिणगी पडेल! मी त्या परमात्म्याचाच अंश असेन, तर तो आनंदनिधान आणि मी दुखी का, याचं कोडं सुटण्याची प्रक्रियाही अलगद सुरु होईल. मग ‘मी’ आणि ‘तू’च्या शोधाचा विचार तीव्र होईल. या शोधाची प्रक्रिया कशी आहे, या शोधाची पूर्वतयारी आणि जोडतयारी काय आहे आणि या शोधाची अखेर किंवा परिपूर्ती काय आहे, या तीन महाप्रश्नांची अत्यंत स्पष्ट उत्तरं समर्थ पुढील श्लोकात देत आहेत. अगदी सावधचित्त होऊन वाचा. कारण आपण आता ‘मनोबोधा’च्या हृदयाकाशाच्या वेशीवर पाऊल टाकत आहोत!

First Published on July 19, 2017 2:30 am

Web Title: samarth ramdas philosophy 265